Dhing Tang : बहुजनहिताय बहुजनसुखाय...! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ढिंग टांग : बहुजनहिताय बहुजनसुखाय...!
ढिंग टांग : बहुजनहिताय बहुजनसुखाय...!

ढिंग टांग : बहुजनहिताय बहुजनसुखाय...!

धुरळा उडवत अंधार कापत येणारे

दोन दिवे करतात

मनस्वी घरघराट,

बराच वेळाने विझून जातात,

जणू उत्तररात्री उशीरा पालवावा

घृष्णेश्वराच्या गाभाऱ्यातला नंदादीप.

कुण्या आडगावातल्या बसठाण्यावर

अंधारात येऊन उभे राहाते

लाल परीचे धूड वस्तीसाठी,

उतरतात काही गावकरी,

दिवस पाठीवर टाकून

पाय ओढत निघून जातात.

पहाटेच्या पहिल्या प्रवासाचे बेत रचत

लाल परी कण्हते मनातल्या मनात,

दाबून चिणून टाकते ऊरातले कढ,

सोडते किडूक मिडूक संसारातला

एक अर्धपोटी उसासा अंधारातच.

कांदे कंडक्टर काढतो गळ्यातला रुमाल,

भोके पडलेल्या गंजिफ्राकावर

उघडतो डबा चाळके ड्रायवरसोबत,

पसरतो रद्दी वर्तमानपत्र निगुतीने.

निर्जन बसठाण्यावर मच्छरांच्या

गुणगुणाटात रंगते पंगत,

लाल परीचे पाणावतात डोळे.

अर्धपोटी लेकरांसाठी तुटते तिचे काळीज.

ती पदरानेच पुसते गळ्याकडला घाम.

मनींचे अब्द अब्द कोंडते इंजिनात,

ठेवते हात कपाळावरच्या गोंदणावर,

आणि चाऱ्ही बाजूंनी अंगावर येणारा

घनांग काळोख झिरपतो अंतरंगात...

झाकपाक करुन गावामागून

आडवारण्याआधी गृहिणीने

जशी पालवावी, कोनाड्यातली दिवटी

किंवा खोलीतला चाळीसचा बलब,

तशी होते चटईवर आडवी लाल परी.

आठवतात तिला जुने दिवस,

काळ्यातांबड्या सडकांवरचे

खडतर प्रवास.

घाटाघाटांची दुर्घटनाग्रस्त वळणे.

मुसाफिरांचे आत्मीय संवाद,

हमरीतुमरीची चिल्लर भांडणे.

दर्वळतो वडे-काचोऱ्याचा तळकट वास,

रेंगाळते आलेपाकाची चव जिभेवर.

आठवतात चिक्कीची पाकिटे किंवा

पिवळेजर्द नळकांडी टाइमपास.

-अमक्या गावातली सोनू परणून

तमक्या गावात गेली.

-तमक्या गावातला बंटी नोकरीसाठी

दुबईला का कुठंतरी गेला.

-तळ्यामधून कमळाचं बी काढून

मुंबयला नेणारा उस्मानचाचा खस्त झाला.

-आणि शहनाझबीचं लेंढार शेवटी

हो-ना करता करता मालेगावला गेलं.

-नोकरीला लागलेला रावल्या पहिल्यांदा

परतला इंद्रायणी तांदळाची गोणी घेऊन.

-आणि तेज:पुंज गर्भार तानीबाई

बाळ घेऊन परतली हसत हसत.

वस्तीची गाडी हल्ली गावात येत नाही

बन्शीधर वडापवाला नाक्यावरती

थांबतो, खिशातल्या चुरगळलेल्या नोटा

चाचपत गुलब्याच्या पडदानशीन

दुकानात जाऊन मारतो नवटाक,

तिखटमीठाची चिमट जिभेवर टाकत

बघतो लाल परीकडे विजयी मुद्रेने.

‘बस बोंबलत म्हातारे!’ म्हणत

टाकतो अजिंक्य अडखळती पावले.

लाल परी निमूटपणे सोसत राहाते,

उभी राहाते आगारात दुर्लक्षित,

उन्हातान्हात, पावसापाण्यात.

कांदे कंडक्टर असतो आंदोलनात,

संपावरचा चाळके ड्रायवर कुण्या शेठकडे

बदली म्हणून खटपट करत राहातो...

लाल परी हल्ली गावात

वस्तीला येत नाही,

‘का येईनास गं?’ असे विचारताच

पंजा नाचवत अज्ञातात म्हणते :

‘‘न्याल तिथं जाईन बापडी,

पण कोण न्यायला बसलंय?’’

loading image
go to top