esakal | ढिंग टांग : नक्श-ए-कदम!
sakal

बोलून बातमी शोधा

Dhing Tang

ढिंग टांग : नक्श-ए-कदम!

sakal_logo
By
-ब्रिटिश नंदी

सांध्यरंगांची दिव्यशोभा न्याहाळत

पाहुणा चिनी हुकूमशहा आणि

एतद्देशीय लोकनेता असे दोघे

झोपाळ्यावर झोके घेत घेत

अनुभवत होते, अनिर्वचनीय

नि:शब्दरंगी संधिकाल.

दोन्ही सत्तासंपन्न हातात

श्रीफल धरुन शोषनळीने

निर्मलजलाचा अखेरचा घोट

शोषून घेत हुकूमशहाने

लोकनेत्याला सांगितले

नेतृत्त्वाचे गुह्य...

तो म्हणाला : ‘‘ऐका मित्रवर्य,

सत्ताधीशाचे सिंहासन

नेहमी उच्चस्थानी असावे,

जेणेकरुन रयतेचे दु:ख,

त्याला दुरुनच दिसावे.

ते सत्ताशकटाच्या मधोमध

असावे, जेणेकरुन

भ्रष्टतेचा दुर्गंध दुरुनच यावा!

सत्ता हुकूमशाही असो, किंवा

लोककल्याणकारी लोकशाही राजवट,

अखेर सत्तेचे अंतिम ध्येय

रयतेचे भले हेच असते ना?’’

लोकनेता भारावून गेला, आणि

झोपाळ्याला एक अदबीचा

झोका देत त्याने आणखी एक

लोकशाही मधुर श्रीफल

हुकूमशहाच्या हाती सोपविले...

अचानक लोककल्याणाची

तीव्र कळ येऊन तो हुकूमशहा

व्याकुळतेने उठलाच झोपाळ्यावरुन,

आणि पायाखालच्या लोकहिरवळीवर

(रत्नजडित जोड्यांसह) पदकमले

उमटवत निघाला,

थेट रयतेला भेटण्यासाठी.

त्या अतिथी हुकूमशहाला

रयतेचे व्यवस्थित निरीक्षण

करता यावे, यासाठी

म्हणून शेकडो रंजल्या-गांजल्याच्या

रंगीबेरंगी रयतेचे आयोजन

आधीच करण्यात आले होते...

त्यांच्याकडे पाहात सुहास्यवदनाने

दुरुनच आपला बळवंत हात

हलविला हुकूमशहाने.

रंगीत तालमीत ठरल्याप्रमाणे

रयतेने उचंबळून दिला त्याला

अचूक प्रतिसाद.

ते पाहून चिनी हुकूमशहाने

समाधानाने हलवली मान,

तो लोकनेत्याला म्हणाला :

‘‘राजा कनवाळू असावा,

गोरगरीबांचा आधार असावा,

भ्रष्ट विरोधकांचा कर्दनकाळ असावा.

भल्यांना कमरेचे वस्त्र,

नाठाळां माथी शस्त्र

घालणारा असावा.

लोकनेता अर्थशास्त्री असावा,

अशी काही पूर्वअट नाही,

परंतु, त्यास रोकडा व्यवहार

ठाऊक असायलाच हवा.

असे असले तरी-

आपल्या कार्याची पोचपावती

नेत्याने ताबडतोब मिळवावी.

जागोजाग स्वत:चे पुतळे उभारावेत,

बागा-पुष्करणी थाटाव्यात,

सर्वात महत्त्वाचे म्हणजे

लोकनेत्याची विचारसरणी,

त्याचे अमोलिक विचारधन,

शाळाशाळांतून शिकवायला घ्यावे,

लोकनेत्याचे आदर्शचित्र

रयतेच्या मनावर ठसायलाच हवे.

सभा-समारंभांनी युक्त असा

सुखनैव कारभार करीत राहावे.

दुतर्फा उभ्या राहिलेल्या

प्रशिक्षित रंजल्या गांजल्यांचे

अभिवादन स्वीकारत पाहुणा

चिनी हुकूमशहा धीरोदात्तपणे

राजपथावर चालू लागला...

त्याच्या पावलांवर पावले

उमटवत लोकनेता चालू लागला,

तेव्हा त्याच्या डोळ्यात

भविष्यातील लोककल्याणाची

रंगीन स्वप्नदृश्ये झोके घेत होती.

loading image
go to top