esakal | ढिंग टांग : टूर निघाली... टूर निघाली..! Dhing Tang
sakal

बोलून बातमी शोधा

Dhing Tang

ढिंग टांग : टूर निघाली... टूर निघाली..!

sakal_logo
By
ब्रिटिश नंदी

महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व जे की, पु. ल. देशपांडे यांच्या सुप्रसिद्ध ‘बटाट्याच्या चाळी’तील भ्रमणमंडळ मुंबई ते पुणे अशी प्रदीर्घ यात्रा करुन आले होते, हे (काही) मराठी वाचकांना अजूनही आठवत असेल. अर्थात स्व. पु. ल. देशपांडे सोशल मीडियावर नसल्या कारणाने काही जणांना ते माहीतही नसेल! याच भ्रमणमंडळाकडून स्फूर्ती घेऊन महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचे रुपांतर हंगामी स्वरुपाच्या भ्रमणमंडळामध्ये करण्याचा प्रस्ताव जागतिक पर्यटन दिनाच्या शुभमुहूर्तावर ठेवण्यात आला, आणि माननीय मुख्यमंत्री ऊर्फ महाराष्ट्राचे कोचरेकरमास्तर यांनी तो ताबडतोब मंजूरही केला. कारण प्रस्तावही त्यांनीच ठेवला होता!

डेक्कन ओडिसी ही रेल्वेगाडी दर बुधवारी संध्याकाळी मुंबईहून निघते. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोवा, पुणे, औरंगाबाद आणि नाशिक अशी पर्यटनस्थळे करत करत पुढल्या बुधवारी सकाळी पुन्हा मुंबईला येते. गाडीत उपाहारगृहे, बार, सौना, बेडरुमा…सगळे पाच तारांकित आहे. अदबीने सेवा करणारा सेवकवर्ग आहे. भोजनासाठी टेबले आहेत, (खुर्च्याही आहेत.) ‘‘माझ्या महाराष्ट्रात पर्यटन वाढायला हवं! किंबहुना वाढवल्याशिवाय राहणार नाही. का नाही वाढवायचं? मी वाढवून दाखवीन आणि मग सांगीन, वाढवून दाखवलं…’’ अशा मोजक्या शब्दात मुख्यमंत्र्यांनी प्रस्ताव ठेवला. त्याला तिन्ही पक्षाच्या मंत्र्यांनी होऽऽ…असा होकार दिला. मुख्यमंत्री पुढे म्हणाले, ‘‘ डेक्कन ओडिसी या आलिशान रेल्वेगाडीतून प्रवास करत करत आपण साऱ्यांनी महाराष्ट्राच्या हिताचे निर्णय धडाधड घ्यायचे आणि त्याच जोडीला पर्यटनालाही प्रोत्साहनही द्यायचं, असा माझा दुहेरी प्रस्ताव आहे…’

‘तिकिटं आपापली काढायची, बर्का!,’’ अर्थमंत्री माननीय दादासाहेबांनी बजावून सांगितले. भ्रमण मंडळातले निम्मे संभाव्य सदस्य इथेच गळतील अशी स्थिती निर्माण झाली. केवळ एवढ्या एका कारणामुळे सरकार धोक्यात येईल, अशी शंका वाटल्याने अखेर, पुरवणी मागण्यांमध्ये भ्रमणमंडळ निधीला मंजुरी देता येईल, असा तोडगा काढण्यात आला. ’‘माणशी सव्वापाच लाख रुपये तिकिट आहे, साहेब! कसं जमणार?,’’ दादासाहेबांनी खोडा घालण्याचा प्रयत्न केला. ‘डेक्कन ओडिसी’ प्रवासासाठी मी स्वत: पंतप्रधान मोदीजींना स्वतंत्र पत्र पाठवून निधीची मागणी करीन, शिवाय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवेजी हे (आता) माझे चांगले मित्र झाले असून त्यांनाही तिकिटात सवलत देता येईल का, हेही विचारीन, असे मुख्यमंत्री म्हणाले, तेव्हा मंत्रिमंडळाच्या काही सदस्यांनी भिवया उंचावून एकमेकांकडे पाहिले.

‘मंत्रिमंडळाची बैठक रेल्वेच्या डब्यात घ्यायची म्हणताय…फायलींचं काय करायचं?’’ अर्थमंत्र्यांनी आणखी एक मुद्दा उपस्थित केला. फायलींसाठी ‘डेक्कन ओडिसी’ पाठोपाठ एक मालगाडी सोडण्याचा उपप्रस्ताव लागलीच मांडण्यात आला व तो मंजूरही करण्यात आला. सचिवमंडळींनी मालगाडीतूनच यावे, असेही ठरले. एकेक प्रश्न धडाधड मार्गी लागत होते. महाराष्ट्राच्या भ्रमणमंडळाचे संचालक मा. मु. ऊर्फ कोचरेमास्तर स्काऊटच्या गणवेषात तीन तास आधीच येऊन फलाटावर पोचले आहेत…त्यांच्या डोकीवर हॅट, सदऱ्याला सहा खिसे, खांद्याला रश्शी, खिशाला शिट्टी, पेन आणि डायरी, कमरेच्या विजारीला मोजून बारा खिसे, त्यात कागदाची भेंडोळी, रेल्वे गाइड, असा बराचसा ऐवज ते अंगावर बाळगून आहेत…डेक्कन ओडिसीत खायला प्यायला सर्वकाही यथेच्छ मिळते, हे कळूनही त्यांनी चिक्की, लाडू, गुळपापडीच्या वड्या, आलेपाक अशी सामग्री घेऊन ठेवली आहे…असे चित्र काही मंत्र्यांच्या डोळ्यासमोर उभे राहिले…

तेवढ्यात भ्रमणमंडळाचे बाबूकाका ऊर्फ अनिलराव परब यांनी भयंकर शंका काढली. ते म्हणाले : ‘‘ते किरीट सोमय्या तिकिटं तपासायला आले तर काय करायचं?’’

loading image
go to top