ढिंग टांग : दोन डॉक्‍टर, एक पेशंट!

आमचे दोन तारणहार आणि आधुनिक धन्वंतरींचे अवतार जे की डॉ. नमोजी आणि डॉ. यूबी थॅकरे यांचे आम्ही जन्मोजन्मीचे ऋणी आहो!
Dhing Tang
Dhing TangSakal

आमचे दोन तारणहार आणि आधुनिक धन्वंतरींचे अवतार जे की डॉ. नमोजी आणि डॉ. यूबी थॅकरे यांचे आम्ही जन्मोजन्मीचे ऋणी आहो! कां की त्यांच्यामुळेच आम्ही आज श्वासोच्छ्वास करतो आहो. हे दोघे वैद्यकतज्ञ नसते तर आम्ही नसतो, तुम्ही नसता आणि समस्त मानवजातीचे जगणे दुष्कर होवोन बसले असते, याची जाणीव हरेक व्यक्तीने ठेवावी.

डॉ. नमोजी हे संपूर्ण देशाचे, तर डॉ. थॅकरे हे संपूर्ण महाराष्ट्राचे फ्यामिली डॉक्‍टर आहेत. काल रोजी एक जुलै हा जागतिक डॉक्‍टर दिन असल्याची जाणीव आम्हाला अचानक पडशासारखी झाली. हल्ली पडसे म्हटले की टेन्शन येते. तसे ते आम्हाला आले! परंतु, डॉक्‍टर दिनाला आपल्या लाडक्‍या डॉक्‍टरांना मानवंदना नको का द्यायला? तर... या दोघाही आधुनिक धन्वंतरींना आमच्या मन:पूर्वक शुभेच्छा.

डॉ. नमोजी हे एक आगळे वेगळे आणि निराळेच व्यक्तिमत्त्व आहे. त्यांना आलोपाथी, होमेपाथी, नेचरोपाथी अशा अनेक पाथ्यांमध्ये प्रचंड गती आहे. आयुर्वेदात तर त्यांचा हात धरणारे दुसरे कोणीच नाही. राजधानी दिल्लीत त्यांची ओपीडी आहे. तेथूनच त्यांची अहर्निश रुग्णसेवा चालू असते. माणसाला सर्दी झाल्यास कोठले योगासन करावे, भूक लागल्यास दीर्घ श्वसनाद्वारे पोटाची खळगी कशी भरता येते, खिशात दमडी नसताना माणसाने आरोग्य कसे जपावे, हे ते प्रात्यक्षिकासह रुग्णास समजावून सांगतात. परिस्थिती कुठलीही असो, माणसाने हमेशा सकारात्मक राहावे, असे त्यांचे सांगणे असते. आम्ही त्यांचे आज्ञाधारक पेशंट असल्याने व स्वभावत:च आम्ही ‘पेशंट’ असल्याने कायम सकारात्मक राहाणे आता आम्हाला जमू लागले आहे.

डॉ. नमोजी यांनी हजार हस्तांनी आपले वैद्यक ज्ञान वाटले, आणि अनेक पट्टशिष्ये निर्माण केली. त्यांना वैद्यकाप्रमाणेच इतर अनेक विषयात असाधारण गती आहे. इतिहास, भूगोल, विज्ञान, युद्धशास्त्र, खगोलशास्त्र, जीवशास्त्र, समाजशास्त्र अशा अनेक शास्त्रांमध्ये ते पारंगत आहेत. त्यांना आमचे वंदन असो.

आमचे दुसरे आदरणीय डॉ. यूबी थॅकरे हे होत. डॉ. थॅकरे यांच्याबद्दल काय बोलावे? आदिशंकराचार्यांनी ज्यांना चर्चावादात हरवले त्या मंडनमिश्रांच्या गृहींचा पिंजऱ्यातील पोपट चारही वेद मिठूमिठू बोलत असे, असे म्हंटात. डॉ. थॅकरे यांच्या दवाखान्यातील कंपाऊंडरदेखील औषधोपचारांमध्ये इतका प्रवीण आहे की ज्याचे नाव ते!! डॉ. थॅकरे हे अतिशय कडक डॉक्‍टर आहेत. कडक म्हंजे अतिशय कडक! किंबहुना भलतेच कडक!! कडक पथ्यांशिवाय काहीही उपाय नाही, असे ते उग्र चेहरा करुन सांगू लागले की पेशंट अर्धा गारद होतो. पेशंट दगावला तरी चालेल, पण पथ्य पाळलेच पाहिजे, असा त्यांचा खाक्‍या आहे.

साथीचा रोग आटोक्‍यात येण्यासाठी माणसाने घरातच बसावे, मुळीच हालचाल करु नये, किंबहुना पलंगावरुन खालीसुद्धा उतरु नये, असे ते बजावून बजावून सांगतात. काही लोकांना ते पटत नाही. त्याचा दणका त्यांना बरोब्बर बसतो. मग डॉ. थॅकरे उग्र मुद्रेने म्हणतात : ‘‘बघा, मी आधी सांगत नव्हतो? भोगा आता फळं!’’ असो. साथरोगाबाबत त्यांचे संशोधन खूप मोठे आहे. या क्षेत्रात ते डॉ. नमोजींपेक्षा कांकणभर पुढेच आहेत. ‘डब्ल्यूएचओ’चे पदाधिकारी डॉ. थॅकरे यांचाच सल्ला शिरोधार्य मानतात. त्यांना आमचे शतश: नमन असो... सॉरी, मुजरा असो!! या दोन्ही फ्यामिली डॉक्‍टरांना जागतिक डॉक्‍टर दिनानिमित्त बिलेटेड आणि खूप खूप शुभेच्छा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com