esakal | ढिंग टांग : ...जातो नथी, जावा देतो नथी!
sakal

बोलून बातमी शोधा

Dhing Tang

ढिंग टांग : ...जातो नथी, जावा देतो नथी!

sakal_logo
By
ब्रिटिश नंदी

सदू : (फोन लावत आवाज बदलून) म्यांव म्यांव!

दादू : (कोरडेपणाने) मी ओळखतो तुझा आवाज! सदू चावटपणा बंद कर! वाघाला मांजरीचे आवाज काढून दाखवणं चांगलं नाही! किती वेळा सांगायचं तुला? तुझ्यामुळे मला अनेकजण मांजरांचे आवाज काढून विनाकारण चिडवतात!!

सदू : (खोचकपणाने) कोण वाघ?

दादू : (डरकाळून) सद्याऽऽ...!

सदू : (आणखी डिवचत) इथे डरकाळून काय फायदा? साधं घराबाहेर पडायला घाबरतोस! लहानपणापास्नं तू तसाच!

दादू : (गोरेमोरे होत्साता) ...असंच नाही काही! कालच रात्री घराबाहेर अंगणात शतपावली करुन आलो! कुरियरवाल्यालाही दार उघडलं होतं! उगीचच गर्दी केली की मग मात्र माझं डोकं औट होतं!

सदू : (शांतपणे) चल, जरा हिंडून बिंडून येऊ!!

दादू : (अंगावर शहारा आल्यागत) हिंडायला जायला मला वेळ नाही, सदूराया! खूप कामं आहेत! मी आता या महाराष्ट्राचा कारभारी आहे, हे विसरु नकोस!

सदू : (छद्मीपणाने) फू:!! तूच विसरु नकोस!!

दादू : (परिपक्वपणे) तुम्ही हसा, हसा! हसणाराचे दात दिसतील!! माझं म्हणणं एवढंच की उगीच रिस्क कशाला घ्यायचं? माणसाने होताहोईतो गर्दी टाळली पाहिजे! अजून संकट टळलेलं नाही, रात्र अजूनही वैऱ्याचीच आहे!! म्हणून मी सगळ्यांना सांगत असतो की बाबांनो, घरात बसा, मास्क लावा, अंतर पाळा, वारंवार हात धुवा!!...तू धुतोयस ना हात?

सदू : (हातातली घंटा वाजवत) घण घण घण घण...टण्ण!

दादू : (संशयानं) हा कसला आवाज? घरावरुन आगीचा बंब गेला की काय?

सदू : (निषेधाच्या सुरात) तुमच्या बहिऱ्या सरकारच्या कानाचे पडदे फाटावेत, म्हणून घंटानाद करतोय!!

दादू : (सुस्कारा सोडत) मग हरकत नाही!

सदू : (आश्चर्यानं) तुला ऐकू आला का आमचा घंटानाद?

दादू : (शांतपणे) मला फक्त कानात बोळे घातले की ऐकू येत नाही!!

सदू : (फिस्कारुन) मग काढा ना ते बोळे!!

दादू : (कर्तव्यकठोरपणाने) ...घंटनाद करा, कसलाही नाद करा, पण आमचा नाद नाय करायचा!!

सदू : (कपाळाला आठ्या...) बघून घेईन!!

दादू : (समजूत घालत) सदूराया, कितीही झालं तरी आपण भाऊ-भाऊ! तू त्या नतद्रष्ट कमळाबाईच्या नादाला लागून ही असली भलभलती आंदोलनं करु नकोस! त्यानं महाराष्ट्राचं नुकसान होईल, नवनिर्माण काही व्हायचं नाही!! (दातओठ खात) त्या कमळवाल्यांना नाहीत उद्योग! हातातोंडाशी आलेली सत्ता गेल्यापासून त्यांचा तोल गेलाय! तू कशाला त्यांच्या नादाला लागतोस?

सदू : (सात्त्विक संतापाने) त्यांच्या आशीर्वाद यात्रा चालतात, तुमच्या राजकीय सभा नि मेळावे चालतात! लग्नाचं वऱ्हाड चालतं! मंडईतली गर्दी चालते, पण देवळं आणि सणासुदी म्हटली की लगेच तुमचा पवित्रा बदलतो काय?

दादू : (थंडपणाने) माझी इच्छा विचारशील तर तीनेक वर्ष टोटल लॉकडाऊन लावण्याची आहे! तुम्ही कितीही मला डिवचलंत तरी मी निर्बंध उठवणार नाही, गर्दी होऊ देणार नाही! महाराष्ट्र हे माझं कुटुंब आहे, आणि ‘माझं कुटुंब, माझी जबाबदारी’ हे माझं घोषवाक्य आहे!

सदू : (हताशपणे) त्यांचं घोषवाक्य ‘हुं खातो नथी, खावा देतो नथी’ असं आहे, आणि तुझं ‘हुं बाहर जातो नथी, जावा देतो नथी’ असं आहे!

जय महाराष्ट्र!

loading image
go to top