esakal | ढिंग टांग : जा-सूद!
sakal

बोलून बातमी शोधा

Dhing-Tang

चंडप्रतापी महानायक महाराष्ट्ररक्षक श्रीमान माननीय राजाधिराज उधोजीमहाराज यांचे चरणारविंदी बालके संजयाजी याचे कोटी कोटी दंडवत. तांतडीचे खलित्यास कारण कां की गनिमाचा जासूद कार्यरत जाहला असून राज्यशकटास दगाफटका संभवतो. ऐसियास काळजी बरतणे ही प्रार्थना.

ढिंग टांग : जा-सूद!

sakal_logo
By
ब्रिटिश नंदी

चंडप्रतापी महानायक महाराष्ट्ररक्षक श्रीमान माननीय राजाधिराज उधोजीमहाराज यांचे चरणारविंदी बालके संजयाजी याचे कोटी कोटी दंडवत. तांतडीचे खलित्यास कारण कां की गनिमाचा जासूद कार्यरत जाहला असून राज्यशकटास दगाफटका संभवतो. ऐसियास काळजी बरतणे ही प्रार्थना. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

गनिमाचे गोटातून निघालेला जासूद प्रेषिताचा अवतार म्हणोन प्रकट जाहला असोन अडल्या नाडल्यांस, रंजल्या गांजल्यांस बशीत बसवोन यूपी-बिहारात, त्यांच्या मायभूमीस धाडणेच्या कामी पुढाकार घेवोन रयतेची बहुतखूब दुवा मेळवीत आहे, ऐसी खबर आहे. सदर जासूद गनिमाचे गोटांतील आहे, हे अन्यथा सांगणे न लगे. गुदस्ता सदर जासूदाचा पर्दाफाश होता होता राहिला होता, याचे नम्रपणे स्मरण देत आहे. सदर जासूद ‘सूद’ या नावानेच सामाजिक कार्याचे नावाखाली दगाफटका करील, ऐसे भय वाटते. जे कार्य खुद्दांस जमले नाही, तेच म्या विनासायास केले ऐसे दाखविण्याचा हा खेळ आहे, ऐसे स्पष्ट संकेत आहेती. खेरीज, सदर सूद नामे जासूदांस दिल्लीश्वर मोंगलांचे यथास्थित पाठबळ लाभले असल्याने अर्थपुरवठ्यास गणती नाही. सबब संभावित जासूद डोईजड जाहला. खुद्दांची बदनामी या येकमेव हेतूने प्रेरित या जासूदाचा वेळीच बंदोबस्त करावा, एवढे सांगणे. बाकी भेटीअंती. पुनश्‍च एकवार लक्ष लक्ष दंडवत आणि मानाचा मुजरा. 
आपला येकनिष्ठ आणि नेकदिल पाईक. संजयाजी. 

ता. क. : सदर जासूदाचा बंदोबस्त आम्ही परस्पर करीत आहो. परंतु, काही मखलाशी करोन तो आपल्या मातोश्रीगडापर्यंत पोहोचेल आणि मुजराबिजरा करोन खुद्दांस खिशात टाकेल, ऐसी खबर आहे! जाणिजे!! आपला ये. आणि ने. पाईक. संजयाजी. 

शिलेदार संजयाजी, 
आपला तांतडीचा खलिता मिळाला. एक अक्षरदेखील कळले नाही! एक तर ही असली बखरी भाषा धड कोणालाच कळत नाही. त्यात तुम्ही कायम सारे जग आपल्याविरूद्ध दगाफटका करून ऱ्हायले आहे, याच ‘मोड’मध्ये असता!! आम्ही काय अर्थ लावायचा? लोकांना जरा कळेल, पटेल असे लिहीत जा! कोण जासूद? कुठला गनीम? कसला दगाफटका? महाराष्ट्रावर वेळ कुठली आली आहे आणि तुम्ही हे काय लिहीत सुटलाय? कठीण आहे!! 

तुम्ही जासूद जासूद म्हणता, तो बॉलिवुडचा एक साधासिंपल साइडहिरो आहे, असे चिरंजीवांनी सांगितले. आमच्या दर्शनाला तो आला होता. (आल्या आल्या पल्टेदार मुजरा केलान! स्वभावाने चांगला असावा!!) आल्या आल्या त्याने अनेकांना बसमध्ये बसवून उत्तरेत कसे धाडले, याच्या सुरस कहाण्या सांगितल्या. आम्हाला वाटले की या माणसाची ‘ट्रावल कंपनी’ असेल! काही परमिटे मागायला आला असेल. त्याला ‘लागेल ती मदत करू’ असे आश्वासन तिथल्या तिथे देऊन टाकले आणि उभ्या उभ्या दोन मिनिटांत कटवला!! त्याचे नाव सूद असे आहे, जा-सूद असे नव्हे! सबब आम्ही त्याला ‘जा’ असे म्हणालो नाही, इतकेच! त्याचे पहिले नाव सोनू असे आहे, असेही कळले! एवढ्या धष्टपुष्ट माणसाला ‘सोनू’ म्हणून हांक मारणे आम्हाला थोडके जड गेले, हे खरे!! (बरेही दिसत नाही! असो!) आडनाव ‘सूद’ असे ऐकून आम्ही ‘सूद? फिर मुद्दल किधर हय?’ असे विनोदाने विचारले. आमचा विनोदी स्वभाव साऱ्या महाराष्ट्राला ठाऊक आहे. असो. 
तुम्ही फार मनावर घेऊ नका. आमच्या सिंहासनाला कुणाचीही भीती नाही.

दिल्लीश्वरांशीही आम्ही बरे संबंध राखून आहो! तुम्हीच अधूनमधून काड्या घालत असता, असा संशय आमच्या मनीं मूळ धरू लागला आहे. जाणिजे. जय महाराष्ट्र. उधोजीराजे (शिक्कासही)

loading image