ढिंग टांग : हवेतल्या गप्पा!

दिल्लीच्या विमानतळावर सुरक्षा रक्षकाने तपासणीसाठी हातातले धातुशोधक अवजार दादासाहेबांच्या अंगावरुन फिरवले. टींटींटींटीं असा आवाज झाला.
Dhing Tang
Dhing TangSakal

स्थळ : अधांतरी! वेळ : मारुन नेलेली!

काळ : सोकावलेला!

पात्रे : समस्यापूर्तीच्या शोधातील तीन पात्रे.

दिल्लीच्या विमानतळावर सुरक्षा रक्षकाने तपासणीसाठी हातातले धातुशोधक अवजार दादासाहेबांच्या अंगावरुन फिरवले. टींटींटींटीं असा आवाज झाला. ‘‘घराच्या चाव्या आसतील हो!’’ दादासाहेबांनी उगीचच खुलासा केला. वास्तविक त्यांना कुणी विचारला नव्हता. तरीही केला! सुरक्षारक्षकाने बोर्डिंग पासावर शिक्का मारुन दादासाहेबांना पुढे पाठवले. आपण दरवेळी उगीचच खुलासे करत बसतो, या भावनेने दादासाहेबांना विषण्ण वाटले. ते विमानात जाऊन गपचूप स्वत:हून कुर्सी की पेटी घट्ट बांधून बसले. पाठोपाठ आशुक्राव नांदेडकरांनी आल्या आल्या हातातली ब्याग वरच्या कप्प्यात ढकलली, आणि हुश्श करुन त्यांच्या शेजारीच बसले.

विंडोसीटला नेहमीप्रमाणे उधोजीसाहेब बसलेच होते. (मास्कसहित) हनुवटीखाली उजव्या हाताचा पाचुंदा ठेवून विमानाच्या वीतभर खिडकीतून बाहेर बघत ते चिंतन करत होते. दादासाहेबांनी खाकरुन ‘आम्ही आहोत’ अशी जाणीव करुन दिली. त्यासरशी सावध होत त्यांनी दोघांच्याही हातावर दोन-दोन थेंब सॅनिटायझर टाकून बजावले : संपूर्ण वेळ तोंडाला मास्क लावा हं!

...विमानाने उडान भरली. विमाने ज्या दिवशी मराठीत उड्डाण करतील, तो खरा मराठी भाषा दिन अशी नोंद उधोजीसाहेबांनी मनातल्या मनात केली. पुढली फाइल नमोजीभाईंकडे मराठीतील उद्घोषणांच्या प्रस्तावाची पाठवयाचा निर्धार त्यांनी केला. आज बारा फायली नमोजीभाईंना दिल्या. ही तेरावी!

नमोजीभाईंशी झालेल्या अविस्मरणीय मुलाखतीच्या ताज्या आणि भावस्पर्शी आठवणींनी त्यांचे मन सदुसष्टाव्यांदा मोहरले. पत्रकार परिषदेत ‘‘होय, मी त्यांना भेटलो, काय चुकलं?’’ हे वाक्य उच्चारताना खरे तर त्यांना बंधूप्रेमाच्या उमाळ्याने घशात आवंढा आला होता.

सत्तेत एकत्र नसलो म्हणून काय झाले? नाते का कधी तुटते, अं? त्यांना घशात पुन्हा आवंढा आला...

‘‘विमानात हल्ली खायला प्यायला देत नाहीत काओ?’’ दादासाहेबांनी इकडे तिकडे पाहात पृच्छा केली.

‘‘ह्यांनाच विचारा! यांच्या मोठ्या भावानं सगळं विकायला काढलंय! खायला कुठून देणार?’’ आशुक्राव चिडचिड्या सुरात म्हणाले. त्याचवेळी उधोजीसाहेब चौदाव्या फायलीचा विचार करत होते. विमानात शिवभोजन योजना सुरु करण्याचा प्रस्ताव (आपले) नमोजीभाई नक्की स्वीकारतील, असे त्यांना वाटले.

‘‘दोन तास बारा भानगडी सांगून घसा सुकला! पण त्यांनी साधा चहासुद्धा विचारला नाही!’’ आशुक्राव करवादले. संतापून ते पुढे म्हणाले, ‘‘कसलं आलंय ‘७, लोककल्याण’? यापेक्षा आमचं मंत्रालयाचं क्यांटिन बरं!’’

‘‘येवढं होतं तर जायचं होतं, ‘दहा, जनपथ’ला! तरी बरं तिथंही कुणी चहा विचारत नाही तुम्हाला!’’ दादासाहेबांनी जहरी टोमणा मारला. आशुक्रावांना तो झोंबला नाही. हल्ली असल्या टोमण्यांची सवयच झाली आहे...

...त्यावेळी उधोजीसाहेबांना (बंद दाराआड) नमोजीभाईं स्वहस्ते भरवलेला खमंग ढोकळा आठवत होता.

‘‘काओ साहेब, एकदाचं काय ते सांगून टाका! आम्हाला अर्धा घंटा बाहेर बसवून तुम्ही आतमध्ये काय बोलत होता?’’ दादासाहेबांनी नेहमीच्या शैलीत थेट सवाल केला. एक घाव दोन तुकडे!

‘‘हॅ:!! टाइम वेस झाला नुसता! वेस, वेस!,’’ आशुक्रावांचा मूड काही केल्या सुधरत नव्हता.

...बंद दरवाजाआड या दोघा भावाभावांचं काय गॉटमॅट झालं आसंल? या विचाराने दादासाहेब आणि आशुक्राव हे दोघेही हैराण झाले होते. त्यावेळी खिडकीतून बाहेरचे ढग

पाहणारे उधोजीसाहेब गालातल्या गालात हसत होते.

ते एवढंच हसत म्हणाले : ‘‘आमचं ठरलंय!’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com