ढिंग टांग : वाढदिवसाचा मुरांबा!

प्रिय बंधू चि. सदू यास अनेक उत्तम आशीर्वाद आणि वाढदिवसाच्या अनेकानेक हार्दिक शुभेच्छा. शिवाजी पार्कावर येऊन तुझे अभीष्टचिंतन करायला आवडले असते, पण टाळले!
Dhing Tang
Dhing TangSakal

प्रिय बंधू चि. सदू यास अनेक उत्तम आशीर्वाद आणि वाढदिवसाच्या अनेकानेक हार्दिक शुभेच्छा. शिवाजी पार्कावर येऊन तुझे अभीष्टचिंतन करायला आवडले असते, पण टाळले! हल्ली मी खूपच बिझी असतो, आणि संकट अजूनही टळलेलं नाही, हे तुला माहीत आहेच. आपण अजूनही लेवल थ्रीला आहोत. लेव्हल टू किंवा वनला गेलो की आपण भेटू आणि एकेक प्लेट शिववडा खाऊ! ओके?

काळजीपोटी सांगतो : मास्क लाव! मास्क लाव!! मास्क लाव!!! महाराष्ट्राच्या नवनिर्माणाचं एकमेव आशास्थान म्हणून तुझ्याकडे काही लोक (अजूनही) पाहतात. वेळ मिळाला असता तर गेल्या वेळेसारखा झूम कॉल केला असता. पण नेटवर्कचे काही खरे नसते. गेल्या वेळी फार अडथळे आले. असो.

हे पत्र घेऊन येणाऱ्या व्यक्तीची आर्टीपीसीआर चाचणी झाली असून त्याच्यासोबत चार केशर आंबे पाठवलेले आहेत. हापूस मिळाले नाहीत! केशर आंबे मात्र गोड आहेत. त्याचा मुरांबा कर! मी स्वत: आंबे पोचवतो, असं मला आमचे संजयाजी राऊत म्हणाले होते. पण माझा विश्वास नाही. हा मनुष्य चांगले आंबे पेडर रोडला नेऊन देईल आणि चार बेकार आंबे तुझ्याघरी पोचवेल!! जाऊ दे. बाकी यंदा(ही) वाढदिवस साजरा करायचा नाही, असा निर्णय तू घेतलास, खरे सांगतो, अभिमान वाटला! माणसाने संकटकाळात असे समंजसपणाने वागावे. तुला उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो, ही प्रार्थना. मोठ्यांना नमस्कार आणि लहानांना दादूकाकाचा गोग्गोड पापा!

कळावे.

तुझाच. दादू.

ता. क. : आपली प्रत्यक्ष भेट कधी होईल? परमेश्वरालाच ठाऊक!

प्रिय दादूस, सप्रेम जय महाराष्ट्र. तुझे शुभेच्छापत्र मिळाले. धन्यवाद. पण तू पाठवलेले केशर आंबे पोचवणारी व्यक्ती म्हणजे तुमचे मा. संजयाजीच निघाले, हे तुला ठाऊक आहे का? तू कोणाची चाचणी केलीस आणि डिलिवरीसाठी आले कोण? हा असा सारा सावळागोंधळ तुमच्या आघाडीत चालू आहे. मग विरोधक टीका करणार नाहीत तर काय करणार? तुम्ही लोकच त्यांना संधी देता!

संकटकाळी माणसाने समंजसपणाने वागावेच, पण सावधही असावे, हेही लक्षात ठेव! तुमचे सरदार मा. संजयाजी यांनी ‘होम डिलिवरी’वाल्याचा वेष घालून ‘कृष्णकुंजगडा’वर शिरकाव साधला, असे दिसते! चार आंबे दिले, आणि चहा घेऊन गेले!! ही काय भानगड आहे? माहिती काढून ठेवणे. मी वाढदिवस साजरा करण्याच्या विरुद्ध आहे. वाढदिवसात कसले आहे नवनिर्माण? गेल्या वर्षी वाढदिवसाला आम्ही काही पेट्रोल पंपांवर फुकट पेट्रोल वाटले होते, हे आठवते आहे का? यंदा काय समाजसेवा करावी, हे ठरत नव्हते. लोकांना (वय वर्षे अठराच्या पुढे) पक्षातर्फे मोफत कोविडलसी टोचण्याचा प्लॅन होता. काही कार्यकर्त्यांनी घरोघरी ऑक्सिजन सिलिंडर पुरवावा, असे सुचवले. बहुगुणी मास्क वाटावेत, असे काही पक्षनेत्यांनी सुचवले. मी रागाने बघताच सूचना मागे घेतली. मोठ्या प्रमाणावर रक्तदान करण्यासाठी लोकांना प्रोत्साहित करण्यासाठी काही कार्यकर्ते उत्साहाने कामाला लागले होते. मी त्यांना थांबवले. रक्तदानासाठी कुणीही कुणालाही दमात घेऊ नये, असे माझे मत आहे. असो. शुभेच्छांसाठी पुन्हा एकदा धन्यवाद!

जय महाराष्ट्र. तुझा सदू.

ता. क. : प्रिय दादूराया, तुझ्या शुभेच्छांच्या केशर आंब्यांचा मुरांबा मी घालीनच, पण कोयीसुद्धा मी जपून ठेवीन. त्या कोयींमध्येच महाराष्ट्राच्या नवनिर्माणाचा अंकुर दडला आहे, असे मी मानतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com