ढिंग टांग : हातघाईचे राजकारण आणि योगा डे!

पत्र लिहिण्यास कारण की, आमचे पवित्र तीर्थस्थान जे की दिल्ली येथे जाऊन तुम्ही आमजे आराध्य आणि जागृत दैवत जे की मा. नमोजी यांचे दर्शन घेऊन आलात असे कळले.
Dhing Tang
Dhing TangSakal

प्रिय मित्रवर्य मा. उधोजीसाहेब, सर्वप्रथम ‘योगा डे’च्या अनेकानेक हार्दिक शुभेच्छा. फारा दिवसांनी पत्र लिहिण्याचा योग, नेमका योग दिनालाच यावा, हा किती मोठा योगायोग आहे!! गेले काही दिवस लिहू लिहू, असे म्हणत मात्र होतो. पण योग आत्ता आला!

पत्र लिहिण्यास कारण की, आमचे पवित्र तीर्थस्थान जे की दिल्ली येथे जाऊन तुम्ही आमजे आराध्य आणि जागृत दैवत जे की मा. नमोजी यांचे दर्शन घेऊन आलात असे कळले. बंद खोलीत तुमचे काय ठरले, हे आता आम्हाला (हळूहळू) कळू लागले आहे! माझा फोन सारखा वाजतो आहे. सारखी विचारणा होते आहे की, ‘साहेब, करेक्ट कार्यक्रम कधी? आम्ही तुमचेच बरं का!’ यावरुन काय तो बोध घेणे.

मा. नमोजी यांच्या दर्शनहेळामात्रे किती तरी गोष्टींपासून मुक्ती होते, याचा अनुभव तुम्हाला आता येऊ लागला असेलच! त्यांच्या दर्शनाचा महिमाच तसा आहे. दीडेक वर्षांपूर्वी तुम्ही आमचा हात सोडून भलताच ‘हात’ हाती घेतलात, आणि स्वत:चा हात पोळून घेतलात. तुमची आघाडी अनैसर्गिक आहे, हे आम्ही जगाला ओरडून ओरडून सांगत होतो. आता तुमचेच काही नेते आमच्याशी पुन्हा हातमिळवणी करण्याची भाषा करु लागले आहेत. याला म्हणतात तपास यंत्रणांचा प्रताप! तुमच्या महाविकास आघाडीच्या डोक्यावर लेटरबाँब फुटल्यामुळे धावाधाव सुरु झाल्याचे कळते. पुढले काही दिवस आपण हेल्मेट घालूनच फिरावे, अशी माझी प्रेमाची सूचना आहे.

तपास यंत्रणांचा ससेमिरा लागल्यामुळे आघाडीत धावाधाव होते आहे, हे मात्र खरे नाही. किंबहुना तुमचे काही आघाडीवीर स्वत:च तपास यंत्रणांच्या मागे धावत गेले, असे म्हणा हवे तर!! काहीही असो. ‘मी पुन्हा येईन’ या आश्वासनात थोडा बदल करुन ‘मी तुमच्यासोबत पुन्हा येईन’ असे म्हणायला माझी हरकत नाही. तसे म्हणू का? कळावे.

आपला जुना (माजी) मित्र. नानासाहेब फ.

ता. क. : योगा डेच्या निमित्ताने तुम्ही कपालभाती सुरु करा! त्यामुळे खूप फरक पडतो, असे ऐकिवात आहे!

नाना-

तुमचे पत्र मिळाले. ते तुमचेच आहे का? अशी प्रारंभी शंका आली. पण ती फिटली! कारण तपास यंत्रणेच्या अधिकाऱ्यानेच ते पत्र आणून दिले! हे तपास यंत्रणांचे नव्हे, तुमचेच प्रताप आहेत! हे तुमचे जे चालले आहे ते एक दिवस अंगलट येईल, हे जाणून असा!! असले उद्योग फार काळ सहन केले जाणार नाहीत, असा इशारा आत्ताच देऊन ठेवतो. नपेक्षा शिवप्रसाद आणि शिवथाळी खाण्याची पाळी येईल!! आणि लोक जोड्याने मारतील ते वेगळेच!

आम्ही कुठलीही गोष्ट लपवून करत नसतो. जे काही आहे ते उघड आहे. लेटरबाँबचे म्हणत असाल तर ते पत्र आमच्याच कार्यालयात आले होते, आणि आम्हीच ते पारदर्शकपणे उघड केले. असल्या फुसकुल्या लेटरबाँबने हादरणारी आमची आघाडी नाही. एकमेकांवरील प्रगाढ अविश्वासाच्या व्यापक पायावर ती उभी असल्याने आम्ही सारे अखंड सावध असतो. पाच वर्षे टिकणारच!

बंद खोलीत आम्ही २०२४ नंतरच्या निवडणुकांबद्दल चर्चा केली, हे तुम्हाला कळले का? यावरुन काय तो बोध घेणे, आणि गप्प राहाणे. इति. उधोजी. (मा. मु. म. रा.)

ता. क. : मी कपालभाती करतोच, तुम्ही तूर्त शवासन करा! हॅपी योगा डे!!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com