ढिंग टांग : पर्यायाला पर्याय काय?

आपण तर आता ठरवलं हाय पर्यायाला पर्यायच नाय!
Dhing Tang
Dhing TangSakal

आपण तर आता ठरवलं हाय

पर्यायाला पर्यायच नाय!

पर्याय तर शोधलाच पाहिजे

काहीतरी मार्ग काढलाच पाहिजे

कुठेतरी सुरवात केलीच पाहिजे

आपण पडलो सारेच पापभीरु

जरा बसू, बोलू, ठरवू...काहीतरी करु!

थोडे घेऊ आपले समविचारी

ज्यांनी बघितली दुनियादारी

बरेचसे घायाळ, अधांतरी

ज्यांचा पलडा (त्यातल्या त्यात) भारी

त्यांचाच सध्या हात धरु

जरा बसू, बोलू, ठरवू...काहीतरी करु!

थोडे असूद्यात लेखकबिखक

विचारवंत आणि सुधारक

हौशे गवशे नेते निवडक

काही मवाळ, काही भडक

त्यांच्याशी खेळीमेळीची चर्चा करु

जरा बसू, बोलू, ठरवू...काहीतरी करु!

मोठा कठीण आला काळ

जनतेशी तुटलीच नाळ

पायात बांधून राजरोस चाळ

नाचतोय सोडून तंत्र नि ताळ

थोडे सोडवूयात आता पायातले घुंगरु

जरा बसू, बोलू, ठरवू...काहीतरी करु!

म्हातारी मेली? छान, तिचं सोनं झालं

पण काळ नावाचं मांजर सोकावलं

ज्यात त्यात तोंड घालतंय मेलं!

तुमच्या हातातल्या बडग्याचं काय झालं?

एकमेकांना भेटून प्रेमानं विचारु

जरा बसू, बोलू, ठरवू...काहीतरी करु!

शेजारपाजारचे बोलवा

अल्याडपल्याडचे हलवा

अलबते गलबते जमवा

मग करु एकच सुलतानढवा

एकच आपला नारा-‘जिंकू किंवा मरु’

जरा बसू, बोलू, ठरवू...काहीतरी करु!

अहो, चर्चेने राष्ट्र वाढते

लोकशाहीला बाळसे येते

गप्प बसून काय साधते?

बोलणाराची माती खपते!

परिवर्तनाचे रंग हळू हळू भरु

जरा बसू, बोलू, ठरवू...काहीतरी करु!

बघा, केवढा प्रशस्त आहे हॉल

जणू हा लोकशाहीचाच मॉल

ज्याची आहे बॅट आणि बॉल

त्यालाच करुया पहिला कॉल

कॉलरट्यूनमध्येही थोडा बदल करु

जरा बसू, बोलू, ठरवू...काहीतरी करु!

बसल्याने होत आहे रे,

आधी बसलेचि पाहिजे

बोलल्याने होत आहे रे,

आधी बोललेचि पाहिजे

ठरवल्याने होत आहे रे,

आधी ठरवलेचि पाहिजे

केल्याने होत आहे रे,

आधी केलेचि पाहिजे

बोलल्यासारखे बोलू, केल्यासारखे करु

जरा बसू, बोलू, ठरवू... काहीतरी करु!

‘काहीतरी’ म्हंजे करायचे तरी काय?

‘काहीतरी’चा अर्थ तरी काय?

पर्यायाला पर्याय तरी काय?

खाली डोकं, वर पाय!

पण भेटत राहू अधूनमधून...गप्पा करु

जरा बसू, बोलू, ठरवू...काहीतरी करु!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com