esakal | ढिंग टांग : माझो टायम इलंय!
sakal

बोलून बातमी शोधा

Dhing Tang

ढिंग टांग : माझो टायम इलंय!

sakal_logo
By
-ब्रिटिश नंदी

‘अपना टाइम आएगा, अपना टाइम आएगा...’ गाजलेली कॉलरट्यून वाजली, आणि कणकवलीच्या फणसनगरातली शांतता भंग पावली.

‘कोण कडमडलाहा?’ दादांनी चिडून फोनकडे पाहिले. अज्ञात नंबर होता. ‘क्या आपको लोन की जरुरत है?’ अशी विचारणा करणारे फोन हल्ली फार येतात. मुंबईतले काही विरोधी पक्षातले लोक आवाज बदलून असेच विचारतात, असा दादांना दाट संशय आहे. त्यांनी फोनकडे दुर्लक्ष केले.

‘दादा, फोन वाजतोय!’ आम्ही लक्ष वेधले.

‘मी काय बहिरा नाय! ऐकू येताहा माका! समाजला?’ डोळे गरागरा फिरवत दादा म्हणाले. आम्ही गप्प बसलो.

तेवढ्यात पुन्हा फोन वाजला. तोच अज्ञात नंबर होता. संतापून फोन उचलून दादा ओरडले : ‘शिरा पडो मेल्या तुज्या तोंडार... आवशीक खाव, कोण सारको फोन करताहा?’

पलिकडून एक दीर्घ उच्छ्वास ऐकू आला. मग शब्द उमटले : ‘‘जे श्री क्रष्ण, दादाभाई! केम छो? बध्दा सारु छे ने?’

तो मधाळ, प्रेमळ आवाज ऐकून दादा थंडच पडले. ‘‘हूं दिल्लीथी वात करु छुं... हलो, दादाभाई, तमे छो ने?’ वगैरे चौकशांनी दादांचा श्वासच अडकल्यागत झाला.

फोनवर बोलता बोलता दादा उठून उभेच रवले. गडबडून म्हणाले : ‘नाय नाय तसा काय नाय! माझा चांगला चल्लाहा! तुमच्या वांगडाक इलंय, वायट कित्याक होईत?’

‘मंगळवारे बप्पोरे दिल्ली मां आवजो. तमे सपथ लेवानी छे... सांभळ्यो के?,’ एवढेच बोलून त्या दिव्य आवाजाच्या व्यक्तीने फोन ठेवला. व्यक्ती कसली? देवदूतच तो!

नेमके काय घडले आहे, हे दादांनाच कळेना! दुबईतल्या एका कामगाराला चाळीस कोटींची लॉटरी लागल्याची बातमी त्यांनी आठवडाभरापूर्वी वाचली होती. दर आठवड्याला लॉटरीचे तिकिट तो कामगार घेत असे. ऐन लॉकडाऊनच्या काळात त्याला बंपर लॉटरी फुटली! आपले असेच काहीसे झाले आहे का? हर्षवायूने त्यांना काही सुचेना!

‘‘माका मंत्री करतंत! माका मंत्री करतंत! द्येवा रवळनाथाऽऽ... रे!,’’ असे म्हणून ते मटकन खुर्चीत बसलेच. गेली काही वर्षे त्यांच्या डोळ्यासमोरुन झर्रकन निघून गेली. जिथे फुले वेचली तिथं... जाऊ दे. एकेकाचे भोग असतात. ‘‘येवाजलेला साधात तर दळीदार कित्याक बाधात?’’ दादा स्वत:शीच पुटपुटले.

दिल्लीला जायचे. साक्षात ‘देवदूता’ला भेटायचे. संध्याकाळी शपथविधीसाठी उभे राहायचे... त्याच्या आत नवाकोरा सूट शिवून होईल का? हा पहिला विचार त्यांच्या मनात डोकावला. पण एवढ्या कमी वेळात सूट शिवून मिळणे अवघडच होते. शेवटी त्यांनी जुनाच ठेवणीतला सूट काढून इस्तरी करायला घेतला.

दिल्लीत आपण सुटाबुटात शपथ घेत आहोत. भारी पेनाने सही करीत आहोत, या कल्पनेने दादांच्या अंगाला मुंग्या आल्यागत झाले. त्यांनी हाताने झटकले. मुंग्या नव्हत्या. आता कुठल्या मुंग्या? इतकी वर्षे वाट बघून बघून अंगाला वारुळ लागायची पाळी आली होती. उलट आता मुंग्या गेल्या. वारुळ फुटले! दादांना हसू फुटले...

कोटाच्या बाहीवर भराभरा इस्तरी फिरवत ते म्हणाले : ‘‘माझो टायम इलो! आता काय तां मी येकेकाक बघून घेतंय! आता दावतां बांदऱ्याक शिंधुदुर्गाचो हिसको!’’

दातओठ खात इस्तरी फिरवत ते स्वत:शीच बडबडत होते. अचानक ओरडून म्हणाले : आता कायंव होवंदे, नाणार होताला म्हंजे होतालाच!’’

इस्तरीचा चटका बसल्यागत आम्ही तिथून उठलो. कुणाचे काय तर कुणाचे काय!

loading image