ढिंग टांग : गुडघा आणि फाटकी जीन्स!

Dhing-Tang
Dhing-Tang

गुडघा हा शरीराचा अत्यंत महत्त्वाचा अवयव आहे, परंतु, त्याच्याकडे प्राय: दुर्लक्ष होते, ही दुर्दैवाची बाब आहे. गुडघे आणि ढोपरे हे फक्त फुटण्यासाठीच शरीराला फुटलेले अवयव आहेत, असे अनेकांना वाटत असावे. (खुलासा : इथे ‘फुटणे’ या क्रियापदांचे दोन्ही अर्थ भिन्न आहेत, ते भिन्नच वाचावेत! ) परंतु, मित्रहो, तसे नाही. ढोपर हा अवयव अगदीच कंडम असला तरी गुडघ्याला बरेच महत्त्व आहे. यावर फार्फार प्राचीन काळापासून संशोधन सुरु असून गुडघ्याच्या संशोधनासाठी मांडी घालून बसलेल्या अनेक ऋषिमुनींना पुढे गुडघ्याचेच विकार जडल्याचे पुराणात उल्लेख आढळतात. असो.

गुडघ्याला संस्कृतमध्ये ‘गुडघम’ असे म्हणत असावेत, असे आम्हाला बरीच वर्षे वाटत होते. परंतु, ते अज्ञानमूलक होते. गुडघ्याला संस्कृत भाषेत ‘जानू’ असे म्हणतात, हे कळल्यावर मात्र आम्ही जाम लाजलो!! - जानू! अहाहा!! किती सुंदर शब्द!! या शब्दामुळे आमचे गुडघ्याविषयी मत पार बदलून गेले. ‘जाऽऽनू…तू मेरा हिरो है, मैं तरी दिलबर हूं…’हे गीत ऐकताना सदरील नायिका (स्वत:च्या) गुडघ्यास महानारायण तेलाचे मर्दन करीत असल्याचे मानसचित्र आम्ही रंगवले होते. असो.

गुडघा या अवयवाचा महिमा म्या काय सांगावा? गुडघा जसा शरीरासाठी आवश्यक असतो, तसाच सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातही अपंरपार उपयुक्त असतो. उदाहरणार्थ, अतिशय सुसंस्कारी आणि अस्मितायुक्त, तसेच स्वाभिमान नावाची काहीएक गोष्ट कशाशी खातात, हे ठाऊक असणाऱ्या व्यक्तीस गुडघा आणि पाठीचा कणा हे दोन्ही अवयव फार्फार जपावे लागतात. एकवेळ मेंदू कार्यरत नसला तरी चालेल, परंतु गुडघा टणक लागतो. पाठीचा कणा ताठ लागतो. विशेषत: राजकारणाच्या क्षेत्रात गुडघ्याला विशेष महत्त्व आहे.

खेदाने नमूद करावे लागते, की सांप्रतकाळी काही महिला गुडघ्यावर फाटलेली जीन्स प्यांट परिधान करुन स्वत:चे आरोग्य धोक्यात घालतात. होय, हे खरे आहे! काही असंस्कृत माणसे गुडघ्यावर फाटलेली जीन्स आवर्जून घालतात. पूर्वीच्या काळी फाटकी कापडे घालणे हे दारिद्र्याचे लक्षण मानले जात होते. आजही ते कर्मदारिद्र्याचे लक्षण आम्ही मानू!
हिमाचल प्रदेशाचे नवनिर्वाचित व आजानुबाहू मुख्यमंत्री मा. तीरथसिंग रावत यांनी या जानूसमस्येकडे आमचे लक्ष वेधले. त्यांना आम्ही यापुढे प्रेमाने ‘जानूसाब’ असे म्हणणार आहो!
‘एक महिला घुटनेपर फटी जीन्स पहनकर क्या संस्कार करेगी?’’ असा जहरी सवाल त्यांनी आम्हाला ढोपराने ढोसकून विचारला. (ढोपर या अवयवाचा हा एकमेव उपयोग आहे. याउप्पर ढोपर कुठेही चालत नाही. जिज्ञासुंनी ट्राय करुन बघावा! पुन्हा असो.)

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

गुडघ्यावर फाटलेली जीन्स ही चालू फ्याशन म्हंजे निव्वळ थिल्लरपणा असून महिलावर्गाने असल्या फ्याशनी करु नयेत, असे त्यांचे मत दिसले.
‘नीचे गम बूट पहनती है, उपर देखा तो घुटनोंपर फटी जीन्स! बच्चों पर क्या संस्कार करेगी?’’ असे त्यांनी सात्विक संतापाने विचारले. आम्ही घाबरुन गप्प झालो, आणि हात पाठीमागे नेले. आता आमची प्यांट कुठे फाटली आहे, हे त्यांना कसे सांगणार? कसनुसे उभे राहिलो.
तात्पर्य एवढेच : बाकी काहीही (आणि कुठेही) फाटलेले असले तरी चालेल, गुडघ्यावर जीन्स रफू केलेलीच असावी! गुडघे जपावेत! त्यावर संरक्षक कवच हवे. निदान राजकारणात तरी!! कां की अनेक पुढाऱ्यांच्या मेंदूचा सवाल आहे. हो की नाही जानूसाब?

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com