ढिंग टांग : वजनविरहित…!

ढिंग टांग : वजनविरहित…!

फ्रॉम द डेस्क ऑफ महामॅडम, १०, जानपॅथ, न्यू डेल्ही- (टु व्हूम सो इट मे कन्सर्न)
विषय : करंट पोलिटिकल सिच्युएशन इन द स्टेट ऑफ द महाराष्ट्रा अँड जनरल हेल्थ ऑफ द ग्रेटेस्ट पार्टी (रीड : काँग्रेस)
डिअर कुलीग्ज, सर्वप्रथम होळीच्या शुभेच्छा. खूप दिवसात महाराष्ट्रातून काही ख्यालीखुशालीची बातमी नाही. आपल्या पक्षाचे तिथे कसे चालले आहे, अशी मी तेरा पत्रे प्रदेश काँग्रेस कार्यालयाच्या पत्त्यावर पाठवली. सगळी पत्रे ‘अड्रेसी नॉट फाऊंड’ असे शिक्के मारून परत आली! कुणी म्हणते, आपल्या पार्टीचे महाराष्ट्रात छान चालले असून तिथे आपला पक्ष सत्तेत भागीदार आहे! कुणी म्हणते, आपण सत्तेत आहोत, हेच मुळी आपल्याकडच्या अनेकांना अजून माहीत नाही! कुणी म्हणते, छे, कुठली सत्ता? सत्ता तर इतर दोन पक्षांची आहे! आहे काय चालले आहे? सध्या तिथे आपल्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष कोण आहेत? इज एव्हरीथिंग फाईन? आय मस्ट नो! 
कळावे. महामॅडम.

मा. बाबाजी-
आहो, मा. महाम्याडमचे पत्र मिळाले का? पक्षाचे कसे चालले आहे असे त्या विचारताहेत! काय सांगायचे? मला तर टेन्शन आले आहे. मी नांदेडमध्येच असल्याने मुंबईची कल्पना नाही, असे मी कळवून टाकले आहे. आपण (नाही म्हटले तरी) पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी. सीएम आहात!! म्हणून आपणच कळवा! जय हिंद. 
आशुक्राव नांदेडकर ऊर्फ (ए. चौव्हाण)

मा. आशुक्राव, जय हिंद. मला यातली काहीच कल्पना नाही. मी ऑलरेडी कराडला पोचलो असून मला जिथे कराडमधल्या सध्याच्या राजकीय घडामोडींबद्दलही धड काही माहीत नाही, तिथे मी मुंबईबद्दल हायकमांडला रिपोर्ट काय कळवणार? ही सगळी भानगड आपण आपले नवे अध्यक्ष मा. नानासाहेब पटोलेजी यांच्या गळ्यात मारावी, हे इष्ट. 
कळावे. आपला. बाबाजी ऊर्फ बी. चौव्हाण.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मा. महाम्याडम, यांच्या चरणी बालके नानासाहेबाचा शिरसाष्टांग नमस्कार, विनंती विशेष. सर्वप्रथम महाराष्ट्र प्रदेश कांग्रेसच्या वतीने आपल्या सर्वांना होळीच्या शुभेच्छा. पक्षाचा प्रदेश अध्यक्ष झाल्यानंतर पहिल्यांदाच आपल्याला पत्र लिहिण्याचा योग येत आहे. कृपया अक्षरास हसू नये. आपल्या पक्षाचे येथे उत्तम चालले आहे. आपला पक्ष येथे सत्तेत भागीदार आहे, पण तसे पुरावे नाहीत!! प्रायमा फेसी तसे दिसते हे मात्र खरे आहे. महाराष्ट्रात इतर दोन पक्षच सगळा कारभार करतात, असे काही लोक म्हणतात. ते तितकेसे खरे नाही. कारण काही लोकांच्या मते हल्ली महाराष्ट्रात विरोधी पक्षच कारभार करत आहे! सध्या महाराष्ट्रात विरोधी पक्षाचेच सरकार आहे, कारण बरेचसे नोकरशहा त्यांनाच आधी रिपोर्टिंग करतात, असे दिसते. सगळे गोपनीय अहवाल त्यांच्याकडेच आधी फाइल होतात! ते सांगतील, त्याला राजीनामा द्यावा लागतो, त्यांनी दुर्लक्ष केले तरच खुर्ची वाचते. महाराष्ट्रात तीन पक्षांचे एक सरकार सत्तेत असल्याचे दीड वर्षापूर्वी जाहीर झाले होते, त्यात आपलाही पक्ष होता. पण सध्या आपल्या पक्षाला वजनविरहीत अवस्था प्राप्त झाली असून गुरुत्वाकर्षणाचा एकही नियम लागू होत नाही, असे दिसून आले आहे. इतके आरोप प्रत्यारोप होऊन एक साधा भ्रष्टाचाराचा आरोप आपल्या पक्षातील एकाही आमदारावर होऊ नये, हे दुर्दैव आहे. अशी सिचुएशन लोकशाहीत आजतोवर कुठेही बघितली गेली नसेल. आपणच मार्गदर्शन करावे. 
आपला विनम्र कार्यकर्ता. नानासाहेब.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com