
ढिंग टांग : भोंगे : आमचे आणि त्यांचे!
माझ्या तमाऽम हिंदू बांधवांनो, भगिनींनो, आणि मातांनो...जय महाराष्ट्र. आत्ता मी तुमच्याशी बोलतोय, तेसुद्धा भोंग्यातूनच बोलतोय...बरं का! भोंगे नसते तर आपल्या लोकशाहीचं काय झालं असतं? हा...हा...हा...आमचा भोंगा वाजतोय ना, म्हणून आपला महाराष्ट्र अजून टिकून आहे, हे लक्षात ठेवा! आमचा भोंगा वाजला की बाकीचे सगळे भोंगे बंद पडतात. घोडामैदान दूर नाही, आणखी बरेच भोंगे बंद पाडायचे आहेत. हे जे देशद्रोही भोंगे आहेत नं, त्यांना माझा विरोध आहे. लग्नाच्या मांडवावर भोंगा हवा का? हवा. नवरात्रीच्या उत्सवात भोंगा हवा का? नक्कीच हवा. गणेशोत्सवात? दहीहंडीला? हवा म्हंजे हवाच. पण वाट्टेल ते भोंगे आम्ही चालू देणार नाही.
आत्ता सांगतोय...आज सांगतोय...आमच्या भोंग्याशिवाय इतर कुणाचाही भोंगा वाजला तर... त्याच्यावर आपला भोंगा चढवला गेलाच पाहिजे!! हे बाकीचे सगळे भोंगे ताबडतोब बंद झाले पाहिजेत. एखाद्याचं नरडं बंद पाडायचं असेल तर शेंदूर खायला घालतात म्हणे. खरं खोटं माहीत नाही, शेंदराचा उपयोग नुकताच आम्हाला कळला! पण भोंगे बंद करायला त्याच्या घशात काय घालायचं अं? चुना?
हल्ली महाराष्ट्रात भोंगे फार वाढलेत! कमी करा!! जो तो आपापला भोंगा लावतोय, वाजवतोय, लावतोय, वाजवतोय! एक लक्षात घ्या, मी ध्वनिप्रदूषणाच्या विरोधात नाही, पण काही निवडक भोंग्यांच्या विरोधात आहे. हे भोंगेऽऽ...(‘हे भय्येऽऽ’च्या चालीवर) हे भोंगे आले, आणि सगळी वाट लागली. पूर्वी मुंबई शांत होती. ट्रामचा खडखडाट ऐकू येत असे. आता कुठे ऐकू येतो? आता फक्त भोंगे!! प्रत्येक राजकीय पक्षाचे आपापले भोंगे आहेत.
कुणाचे भोंगे रोज सकाळी नऊ वाजता बांग देतात. कुणाचे भोंगे दुपारी जेवल्यानंतर कोकलतात. काही पक्षांचे भोंगे टीव्हीवरुन आपलं तोंडाचं डबडं वाजवत असतात. सगळ्यांना आमच्याच भोंग्याची अलर्जी आहे! ते काही नाही, यापुढे महाराष्ट्रात फक्त आपलाच भोंगा वाजणार! दुसऱ्यांनी गुमान त्यांचे भोंगे उतरवावेत, नाहीतर आम्ही दुप्पट उंचीचे स्पीकर लावून त्यांचे भोंगे निष्प्रभ करु.
सर्वपक्षीय सद्भावनेच्या भोंग्यांचं महत्त्व आम्हाला सांगू नका. भोंग्यांचं महत्त्व आम्हालाही कळतं. भोंगे आहेत, म्हणून आम्ही आहोत. आमचा भोंगा गेली बाराएक वर्ष महाराष्ट्रात वाजतोय!! आमचा भोंगा सुरु झाला तेव्हा भल्याभल्यांची बोलती बंद झाली होती. मधल्या काळात आमच्याच भोंग्यात काहीतरी बिघाड झाला. म्हणजे नेमकं कुठलं गाणं वाजवावं ते कळत नव्हतं. भजन लावलं, तर आपोआप कव्वाली सुरु व्हायची. मराठी भावगीत लावलं, तर भोजपुरी गाणी लागायची. नंतर भोंग्यातून नुसता ‘खळ्ळ खटॅक’ असाच आवाज यायला लागला. शेवटी आमच्या इंजिनीअर मित्रानं सांगितलं की, ‘हा ऑडिओ प्रॉब्लेम आहे, व्हिडिओ लावा!’ मग आम्ही गावोगाव ‘लाव रे तो व्हिडिओ’चे कार्यक्रम सुरु केले. ते प्रचंड गाजले. हल्ली पब्लिकला व्हिडिओची सवय लागली आहे.
महाराष्ट्राचं नवनिर्माण घडवायचं असेल तर इतर भिकार भोंगे उतरवलेच पाहिजेत, आणि आपला भगवा भोंगा आभाळात दुमदुमला पाहिजे. तरच महाराष्ट्राला भविष्य आहे.
जय महाराष्ट्र.
(सदरील भाषणाचा कागद आम्हाला दादर येथे शिवतीर्थावर एका खांबानजीक सांपडला. खांबावर भोंगा होता व त्यातून ‘आवाज वाडव डीजे तुला आयची शपथ हाय’ हे भावमधुर महाराष्ट्रगीत ऐकू येत होते...)
Web Title: Editorial Article Dhing Tang 8th April 2022 British Nandi
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..