ढिंग टांग : मानभंग...आमचा आणि त्यांचा!

माणसाला काहीही व्हावे, पण कुणाची मान धरु नये! मान धरलेल्या माणसाला डोके वर काढण्याची सोय मुळी उरत नाही. चेहऱ्यावर एक प्रकारची अवकळा येते.
Dhing Tang
Dhing TangSakal
Summary

माणसाला काहीही व्हावे, पण कुणाची मान धरु नये! मान धरलेल्या माणसाला डोके वर काढण्याची सोय मुळी उरत नाही. चेहऱ्यावर एक प्रकारची अवकळा येते.

माणसाला काहीही व्हावे, पण कुणाची मान धरु नये! मान धरलेल्या माणसाला डोके वर काढण्याची सोय मुळी उरत नाही. चेहऱ्यावर एक प्रकारची अवकळा येते. मानेवर कुणीतरी अवजड कांद्याचे पोते ठेवले असून आपण ते वाहून नेत आहोत, अशी भावना होते. मागल्या वेळेला अशीच मान अवघडली होती, ‘जेवलात ना?’ या प्रश्नाला नकारार्थी मान हलवता न आल्याने उपवास घडला होता. भोजन प्रबंधाचे यजमान समोरुन निघून गेल्यानंतर आपली मान अवघडली असली, तरी तोंड उघडता येते, याचा साक्षात्कार झाला होता. आपण मुलखाचे बावळट आहोत, याची तेव्हा खात्री पटली. अशावेळी आत्मविश्वासाचे बुरुज ढासळतात. मान अवघडणे ही सोपी समस्या नाही. जगण्याचे नानाविध प्रश्न यामुळे निर्माण होतात.

मान अवघडलेल्या इसमास आणखी एक ताण सहन करावा लागतो तो उपाय सुचवणाऱ्यांचा. हाडमोडीच्या पाल्यापासून कुठल्याशा बामपर्यंत अनेक औषधांची नावे घेतली जातात. हे एकवेळ समजून घेण्याजोगे आहे. लाटणे फिरवणे, पायाळू माणसाचा पाय फिरवून घेणे, मान मोडून घेणे असले अघोरी प्रकार अंगलट येऊ लागले की कांपरे भरते.

बाय द वे, ज्या कुण्या महाभागाने दुखऱ्या मानेवर लाटणे फिरवण्याचा उपाय शोधून काढला, त्याला शोधून त्याची मान मुरगळायची आपली तयारी आहे. त्यासाठी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला तरी बेहेत्तर! एका पैलवानकी करणाऱ्या गृहस्थांनी आमची मान दुखत असल्याची संधी साधून ‘हात्तिच्या, आत्ता मोकळी करतो मान’ असे जाहीर करुन दोन्ही खांदे मागल्या बाजूने घट्ट पकडून मणक्यात गुडघा खुपसून दाणकन धक्का देत आम्हास अर्धमेले केले होते. एवढ्यावर हे थांबले नाही, तर अडकलेली मान दोन्ही दिशांना काड काड मोडून त्यांनी पुरता डाव साधून घेतला. पुढला तपशील आठवत नाही, परंतु, आजही आम्ही मानेचा पट्टा वापरतो. असो.

सामान्य माणसाला मानपान नसतो, तरीही त्यांची ही अवस्था! सदोदित खालमानेने जगणारी साधी माणसे मानदुखीला चाराठ दिवस मान देतात, आणि आयुष्याचे लोढणे ओढायच्या नादात दुखणे विसरुनही जातात. आमच्या परमप्रिय सेलेब्रिटी नेत्यांना मात्र (कधी कधी) मानदुखी वरदान ठरते! कुणावरही ही वेळ येऊ नये, पण नेतेमंडळींना मानेची दुखणी फार होतात, कारण त्यांना मानपानाचे बरेच पथ्य असते. थोर समाजकार्य उभे करताना काही नेत्यांना अपरिहार्यपणे जेलखान्यात जावे लागते. तेथे मऊ गादी, उश्या यांची सोय नसली तर त्यांच्या हालास पारावार राहात नाही. पण जनतेसाठी काहीही करण्यास तयार असलेले हे नेते शेवटी त्यांना इस्पितळात दाखल व्हावे लागते. दाखल होतानाचे फोटो निघतात. मग इस्पितळाच्या खाटेवरुन ‘लाइव्ह’ करावे लागते. सार्वजनिक जीवनात सर्व क्षणांचे फोटो काढून ते सोशल मीडियावर टाकावे लागतात. -अगदी एमाराय यंत्राच्या गुहेत शिरतानाचा फोटोही व्हायरल करावा लागतो. काय करणार? जनसेवेचे कंकण हाती बांधले की असे करावे लागणारच! मानदुखीने हैराण झालेल्या या मानी नेत्यांचा अपमान करण्यासाठी टपलेले विरोधक ‘फोटो कसे काढले? कोणी काढले? मान दुखत असताना उशी कां दिली? किती जाडीची उशी मानदुखीच्या पेशंटला अलाऊड आहे?’ असले भंपक सवाल उपस्थित करतात. त्यांच्याकडे मान वळवूनही पाहू नये!

...तुम मानो या ना मानो, ‘मान की बात’ और ‘मन की बात’ वैसे एकही होती है!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com