
खंजीर म्हटले की ज्याला अंजीर आठवतात, तो मनुष्य खराखुरा अहिंसावादी होय. काही हिंस्त्र लोकांना खंजीर म्हटले की खूनबिन आठवतो.
ढिंग टांग : खंजीर : एक खुपसणे!
खंजीर म्हटले की ज्याला अंजीर आठवतात, तो मनुष्य खराखुरा अहिंसावादी होय. काही हिंस्त्र लोकांना खंजीर म्हटले की खूनबिन आठवतो. त्यांच्या वाट्याला न गेलेलेच बरे! काही रसिकांना खंजीराच्या उल्लेखाने रहस्यकथा किंवा चित्रपटांची (उदा. : जंजीर) आठवण होते. कुणाचे काय तर कुणाचे काय…
सांप्रतकाळी खंजीर या आयुधाचा उल्लेख वारंवार ऐकू येतो. ऐतिहासिक काळात खंजीर, जंबिया, गुप्ती आदी आयुधे बऱ्यापैकी वापरात होती, याचे पुरावे आहेत. हल्ली हल्लीच खंजीर पुन्हा कामी येऊ लागल्याच्या खबरी येत आहेत. त्यादृष्टीने आम्ही खंजीर या विषयी काहीएक चिंतन केले. त्यातील अंश येथे (खुपसून) ठेवीत आहो.
खंजीर हे एक बहुपयोगी आयुध असून ते बाळगणे काहीसे गैरसोयीचे असावे, असे वाटते. आम्ही खंजीर अजून पाहिला नाही, जुन्या बाजारात चौकशीला गेलो असता ‘खंजीर दे दो’ असे फर्मावताच आमच्याकडे बघून दुकानदार फिक्कन हसला! जाऊ द्या. खंजीर साधारणत: दहा-बारा इंच लांबीचा (मूठ अलाहिदा) असतो, व दीड-दोन इंच रुंदीचे ते पाते असावे. (आम्ही चित्रात पाहिले आहे…) त्या पात्यास मधूनच बांक दिलेला असतो. चांगले सरळ पाते वाकडेतिकडे करुन कारागीराने नेमके काय साधले, कळावयास मार्ग नाही. वाकड्या खंजीरामुळे सफरचंद, कच्चा पेरु आदी फळे कापताना अडचणी होतात. कलिंगडाच्या फोडी काढण्यासाठी मात्र त्याचा चांगला उपयोग होतो. नखे काढण्यासाठी किंवा दाढी करण्यासाठी या बांकदार पात्याचा उपयोग करण्याच्या दृष्टीने प्रयोग सुरु आहेत.
तथापि, खंजीर कमरेला लटकवणे अतिशय गैरसोयीचे आहे, हे आम्ही खात्रीपूर्वक सांगू. बाक दिलेले पाते कमरेशी अडकवले की ते मांडीला अचूक टोचत राहाते. शिवाय त्याचे टोक कुठल्या दिशेला घात करेल, हे सांगणे कठीण. पूर्वीच्या काळी सशस्त्र युध्दवीर मांडचोळणा नावाची एक विजार परिधान करीत असत. लटकत्या खंजीरापासून संरक्षण करण्यासाठीच मांडचोळणा थोडा वाढत्या अंगाचा ठेवण्याकडे कल असावा, असे आमचे सूक्ष्म निरीक्षण आहे. वर्तमानकाळातील वेषभूषेचा विचार करता खंजीर, जंबियासारखी शस्त्रे बाळगणे अधिक धोक्याचे ठरावे.
खंजीर हे शस्त्र पाठीत खुपसण्यासाठी सर्वात उपयुक्त असावे, असे आमचा अभ्यास सांगतो. चाकूला तेवढे टोक नाही! इतिहासातही खंजीर हे शस्त्र प्राय: पाठीतच खुपसले गेले आहे. याची शेकडो उदाहरणे देता येतील. पुढील बाजूने खंजीर उगारुन युद्ध करुन जिंकल्याचा एकही पुरावा आम्हाला इतिहासात सापडला नाही. कदाचित पुढील बाजूने वार करण्यासाठी तलवार आणि मागील बाजूने हल्ला करण्यासाठी खंजीरबिंजीर वापरत असावेत! इतिहास संशोधकांनी यावर प्रकाश टाकावा, असे आमचे नम्र आवाहन आहे.
वर्तमानकाळातही पाठीत खंजीर खुपसण्याचे उल्लेख अनेकदा होतात. अतीव निष्ठेपोटी किंवा प्रेमापोटीही पाठीत खंजीर खुपसण्याचे प्रकार आजकाल घडताना दिसतात, हे विशेष! तथापि, हा खंजीर काल्पनिक असतो. (पाठ मात्र खरी असते!) एखादा (किंवा अनेक) आमदार आपल्या नेत्यास सोडून पळून गेल्यास त्यास खंजीर खुपसणे असे म्हटले जाते. (पाठीत हा शब्द राहिला…) हे हिंस्त्र, गैरसोयीचे आणि दगाफटक्यास साह्यभूत ठरणारे अस्त्र कायद्याने शब्दकोशातूनही बाद करावे, अशी आमची कळकळीची विनंती आहे.
एकवेळ (एकमेकांच्या) पोटावर मारा, पण पाठीवर मारु नका! ज्या पाठीवर शाबासकीची थाप पडावी, तेथे खंजीराचा वार करणे कृतघ्नपणाचे होय, येवढेच आम्ही सांगू. इत्यलम.
Web Title: Editorial Article Dhing Tang British Nandi 12th July 2022
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..