ढिंग टांग : भक्तश्रेष्ठ येती घरा...!

आनंदाचे डोहीं । आनंद तरंग । आनंदाचा रंग । भक्तश्रेष्ठ ।।
Dhing tang
Dhing tangSakal
Summary

आनंदाचे डोहीं । आनंद तरंग । आनंदाचा रंग । भक्तश्रेष्ठ ।।

आनंदाचे डोहीं । आनंद तरंग ।

आनंदाचा रंग । भक्तश्रेष्ठ ।।

भक्तश्रेष्ठ येती घरा । तोचि दिवाळी दसरा ।

बाकी सारे विसरा । पळभर ।।

सोनियाचा दिस । उगवला क्षितीजी ।

भक्तश्रेष्ठ नमोजी । आले येथ ।।

यावे यावे तुम्ही । द्यावे गा दर्शन ।

तेणे माझे नयन । तृप्त होती ।।

आम्ही आहो ऐसे । भक्तांचेचि भक्त ।

तुम्ही अनभिषिक्त । भक्तश्रेष्ठ ।।

संतांच्या दर्शना । आलां तुम्ही वेगें ।

आम्ही आगेमागे । तुमच्या हो ।।

भक्तिभाव नाम । उघडली पेठ ।

धरिली गा वेठ । तुम्हाचरणी ।।

संतांच्या भूमीत । भक्तांचीच दाटी ।

वाट पाहीं दिठी । भक्ताचीच ।।

भक्तिसागरीं या । उसळल्या लाटा ।

भक्तिचाच साठा । उधळला ।।

जगत्गुरुभेटी । आले गा साक्षात ।

घेतला लक्षात । लोकभाव ।।

भक़्तश्रेष्ठासाठी । सजे देवस्थान ।

त्यालाचि गा मान । अतिथीचा ।।

उभारा जनहो । गुढ्या नि तोरणे ।

फिटेल पारणे । आयुष्याचे ।।

भक्तश्रेष्ठांसाठी । चोख बंदोबस्त ।

चौक्या दरोबस्त । नामजाद ।।

कृष्णवस्त्र कोणी । लेऊ नये आज।

धरा काही लाज । मंगलदिनी ।।

पाण्याची बाटली । खाऊ च्याऊ माऊ ।

नका नका नेऊ । मांडवात ।।

पोलिसांचे श्वान । पोलिस पथक ।

किंवा धातुशोधक । ठेवी नजर ।।

भक्तश्रेष्ठासाठी । थोडे करा सहन ।

त्याने मनभावन । दर्शन मिळे ।।

स्वच्छ असो द्यावी । संतांचीच भूमी ।

विकासाची हमी । भक्त देई ।।

आले आले देखा । ठेवा भाळावरी हात ।

देखा हो नभात । विमान आले ।।

देखणे वायूयंत्र । गरगरत आले ।

क्षणी स्थिरावले । चराचरीं।।

चॉपरची पाती । फिरती भिंग भिंग।

जाहले लँडिंग । सुखरुप ।।

भक्तश्रेष्ठ जेव्हा । अवतरले भूवरी ।

आनंद ओवरी । हसली गा ।।

तेज:पुंज मुद्रा । भाळी आहे टिळा।

तुळशीमाळ गळा । काय रुप! ।।

बोलिले ते अमृत । मुखी संतवाणी ।

आनंदाची धाणी । ओतप्रोत ।।

देखता ती मूर्त । वेडावले जन ।

भक्तश्रेष्ठ जाण । तोचि होय ।।

शब्दांचीच रत्ने । शब्दांचे भांडार ।

पण कांदाभाकर । पावे कैसी? ।।

भक्तश्रेष्ठा, तुझा । कृपालाभ व्हावा ।

द्यावा परतावा । जीएसटीचा ।।

भेदाभेद आहे । खरा अमंगळ ।

त्यावीण हा देश । चालो द्यावा ।।

एवढे मागणे । लई न वाटावे ।

मागणे जीवेभावे । करीतसे ।।

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com