ढिंग टांग : टाचेखाली ढाचा...!

नमो नम: नमो नम: नमो नम: नमो नम: (१०८ वेळा लिहिणे) कुणी पाठीत खंजीर खुपसला म्हणून कुणाचे राजकीय वजन कमी होत नाही, किंबहुना मूठभर वाढतेच, असा माझा तीस महिन्यातला अनुभव आहे.
Dhing Tang
Dhing TangSakal
Summary

नमो नम: नमो नम: नमो नम: नमो नम: (१०८ वेळा लिहिणे) कुणी पाठीत खंजीर खुपसला म्हणून कुणाचे राजकीय वजन कमी होत नाही, किंबहुना मूठभर वाढतेच, असा माझा तीस महिन्यातला अनुभव आहे.

आजची तिथी : श्रीशके १९४४ वैशाख पौर्णिमा.

आजचा वार : ट्यूसडेवार.

आजचा सुविचार : जानी, हम तुम्हे मारेंगे और जरुर मारेंगे, लेकिन बंदूक हमारी होगी, गोली भी हमारी होगी, और वक्त भी हमारा होगा...(थोर डायलॉगकर्ते मा. राजकुमार)

नमो नम: नमो नम: नमो नम: नमो नम: (१०८ वेळा लिहिणे) कुणी पाठीत खंजीर खुपसला म्हणून कुणाचे राजकीय वजन कमी होत नाही, किंबहुना मूठभर वाढतेच, असा माझा तीस महिन्यातला अनुभव आहे. ‘मी पुन्हा येईन’ असे मी म्हणत होतो, तेव्हा मी आहार नियमनावर होतो. आता नाही. आता माझ्या नुसत्या डरकाळीने हल्ली महाराष्ट्रातील राजकीय ‘धर्मकांटा’ चालवणारे थरकापतात. माझ्या वाढीव (राजकीय) वजनाच्या जोरावरच मी महाविकास आघाडीचा सत्तेचा ढाचा पाडणार आहे, ही काळ्या फत्तरावरची रेघ! जिथे तिथे मला हल्ली ढाचेच ढाचे दिसू लागले आहेत. छोटेमोठे ढाचे मी टाचेखाली रगडीन! पण हा सत्तेचा भलामोठा ढाचा पाडण्यासाठी मी आता कंबर कसली आहे.

‘मी पुन्हा येईन’ हे वाक्य कुठून बोललो असे मला झाले होते. पहाटेचा शपथविधी आणि ‘मी पुन्हा येईन’ हा मंत्र मला नडला. यांचे दुष्परिणाम झटकून कसे टाकायचे, याचाच सारखा विचार करत होतो. पण परवा मा. उधोजीसाहेबांनी माझ्या वजनाची आठवण करुन दिली, आणि उत्तर मिळाले. (एका अर्थी हीच खरी उत्तर सभा म्हटली पाहिजे!) नुसत्या तारखा देऊन उपयोग नाही, हा भ्रष्ट सत्तेचा वादग्रस्त ढाचा स्वत:च पाडला पाहिजे, हे कळले. तेव्हापासून स्फुरण चढून अंगात बारा हत्तींचे बळ आल्यागत झाले आहे.

दंडातल्या बेटकुळ्या फुगल्या, छाती छप्पन्न इंच होतीच ती वाढून थेट शंभर इंच झाली, आणि सदऱ्याची बटणे तटातटा तुटली. उधोजीसाहेबांना कळेल अशा भाषेत सांगायचे तर तीस महिन्यापूर्वी माझा एफेसाय १.५ होता, आता तो थेट २.५ झाला आहे!! आपण हॉलिवुडच्या चित्रपटातल्यासारखे महाकाय ‘हल्क’ झालो आहोत अशी स्वप्ने मला पडू लागली! पुढला सगळा प्लॅन ठरल्यावर, मगच मी ठोकसभेत भाषण द्यायला उभा राहिलो... ठोकसभेत बोलताना मी सगळ्यांना ठोकून काढले. राजकुमार यांच्या ‘बंदूक भी हमारी होगी, गोली भी हमारी होगी...’ तो डायलॉग लिहून नेला होता, पण त्याच्याऐवजी भलताच कवितेचा कागद हातात आला, आणि ‘खैरे, व्हा आता बहिरे...’ अशा काहीच्या काही ओळीच तोंडातून बाहेर पडल्या. पण ते जाऊ दे. मी उधोजीसाहेबांना असे काही सणसणीत उत्तर दिले की यंव रे यंव! माझ्या त्या अत्यंत आक्रमक भाषणाची सध्या महाराष्ट्रभर चर्चा सुरु आहे. महाराष्ट्र कशाला, मला दुसऱ्या दिवशी दिल्लीहून मा. नड्डाजींचा घाबऱ्याघुबऱ्या फोन आला, म्हणाले, ‘बंधू,सबकुछ ठीकठाक है ना?’ ‘ठीकठाक कुछ नाही! मी यांचा सत्तेचा ढाचा पाडणार म्हंजे पाडणार!’ मी बेभानपणे ओरडलो.

‘अरे भई, किसने रोका है? गेले अडीच वर्षं तुम्हाला तेच तर करायला सांगत होतो, पण जमतंय कुठे?’ ते वैतागून म्हणाले. नाही म्हटले तरी मी थोडा ओशाळलो. त्यांना म्हटले, ‘आता नक्की जमवतो!’ ‘मी पुन्हा येईन’ पेक्षा ‘जानीऽऽ, तुमचा ढाचा पाडीन’ ही लाइन जास्त भारी आहे, असे मला वाटते. पाडतोच तुमचा ढाचा!!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com