ढिंग टांग : चाल आणि ढकल! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dhing Tang

स्थळ : मातोश्री हाइट्स, वांद्रे बुद्रुक. वेळ : गुड नाइट टाइम!

ढिंग टांग : चाल आणि ढकल!

स्थळ : मातोश्री हाइट्स, वांद्रे बुद्रुक. वेळ : गुड नाइट टाइम!

चि. विक्रमादित्य : (नेहमीप्रमाणे दार ढकलून खोलीत शिरत...) हाय देअर, बॅब्स...मे आय कम इन?

उधोजीसाहेब : (कानटोपी चढवत) नोप! यावेळी मी कुणाला भेटत नसतो!

विक्रमादित्य : (दुर्लक्ष करत) क्या मुसाफिर को एक गिलास पानी मिल सकता है?

उधोजीसाहेब : (डोकावून बघत) कोण मुसाफिर?

विक्रमादित्य : (खुर्चीत) मीच! मुसाफिर हूं यारो, ना घर है, ना ठिकाना, मुझे चलते जाना है, बस, चलते जाना...

उधोजीसाहेब : (रागारागाने) चांगल्या भरल्या घरात ही कसली गाणी म्हणतोस? शी:!!

विक्रमादित्य : (कळवळून) पाय दुखताहेत भयंकर ! जाम थकलोय...मिळेल का पाणी?

उधोजीसाहेब : (वैतागून) इथून उठ, आणि सैपाकघरात ठेवलेल्या माठातून स्वत: घे! आणि तिथून परस्पर झोपायला जा!!

विक्रमादित्य : (मेलोड्रामा...) एक थके हुए मुसाफिर को क्या एक गिलास पानी भी नसीब नहीं होगा?

उधोजीसाहेब : (निक्षून सांगत) नहीं मिळेगा, एक घोट भी नही मिळेगा! क्यों की, मी फक्त मराठी माणसाच्या शत्रूला पाणी पाजतो!!

विक्रमादित्य : (विचारात पडत) बॅब्स, तुम्ही नाही जाणार ‘भारत जोडो’ यात्रेला?

उधोजीसाहेब : छ्या, नाव काढू नकोस त्या यात्रेचं!

विक्रमादित्य : (उत्साहात) राहुलजींची कमाल आहे हं! केवढे भराभरा चालतात माहितीये? आणि दिवसभर नुसते चालतात !! त्यांच्यासोबत चालून चालून मीच थकलो!

उधोजीसाहेब : (उपाय सुचवत) कशाला गेलास तिथं? चालायचीच हौस असेल तर इथं जॉगर्स पार्कमध्ये चाळीस मिनिटं चालून येत जा! उगीच तंगड्यातोड कशाला करायच्या?

विक्रमादित्य : (कळवळून) अगं आईग्गंऽऽ...

उधोजीसाहेब : बघ, म्हटलं नव्हतं मी तुला? नको जाऊस उगीच त्यांच्या यात्रेत! आता गरम पाण्यात थोडंसं मीठ घालून पाय बुडवून ठेव! आत्ता थांबतील दुखायचे बरं!!

विक्रमादित्य : (गंभीर मुद्रेनं) माझं भारत जोडो यात्रेत सहभागी होणं हे राजकारणाच्या पलिकडलं आहे, बॅब्स! लोकशाही टिकवायची असेल तर चालावंच लागणार! तुम्हीही चला ना! धमाल येते तिथं! किती मस्त वातावरण असतं! असं वाटतं की आपण कुठल्यातरी ट्रेकवरच निघालो आहोत!!

उधोजीसाहेब : (घाबरुन) पण मधूनच राहुलजी पळायला लागतात, असं ऐकलंय!

विक्रमादित्य : (आश्वासन देत) नाही हो! भराभर चालतात, एवढंच! ब्रिस्क वॉक म्हंटात ना, तसं!

उधोजीसाहेब : (संशयानं) मी पाहिलंय त्यांना पळताना!

विक्रमादित्य : (दुर्लक्ष करत) पिकनिकसारखं वातावरण असतं तिथं! चला ना!! तुमची वाट पाहाताहेत ते!!

उधोजीसाहेब : (दुप्पट संशयानं) ...त्या पटोलेनानांनीही दाढी वाढवायला घेतली आहे!

विक्रमादित्य : (समजूत घालत) मी गेलो तेव्हा खुद्द राहुलजींनी पहिला प्रश्न विचारला की, ‘‘डॅडी कैसे है?’’

उधोजीसाहेब : (सद्गदित होत्साते) असं विचारलं त्यांनी? खरंच, फार सज्जन माणूस आहे!!

विक्रमादित्य : मग येताय ना? तुम्हाला निमंत्रण आहे!! तुम्ही येणार की नाही? म्हणून उलट सुलट खूप चर्चा चालू आहे...

उधोजीसाहेब : आलो असतो रे! पण...जाऊ दे!

विक्रमादित्य : (अधीरतेने) पण? पण काय, सांगा ना बॅब्स?

उधोजीसाहेब : (पांघरुणाच्या आतूनच...) मी दमलोय! गुड नाईट!!