ढिंग टांग : नाना नाना ना रे..!

गेले काही दिवस महाराष्ट्रात आपल्या पक्षाचा विजनवास सुरु झाल्यागत वाटते आहे.
Dhing Tang
Dhing TangSakal
Summary

गेले काही दिवस महाराष्ट्रात आपल्या पक्षाचा विजनवास सुरु झाल्यागत वाटते आहे.

प्रार्थनीय वंदनीय माननीय महामॅडम यांच्या चरणारविंदी बालके नानाचा शिरसाष्टांग नमस्कार.

माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याने तुम्हाला थेट पत्र लिहिणे, थोडे धाडसाचे आहे, परंतु, विलाजच उरला नाही. आपणच (आणि आदरणीय माननीय राहुलजी) आमच्या तारणहार आहा! संकटकाळी मनुष्य देवाच्या दारी धावतो. तसाच हा प्रयत्न समजावा.

गेले काही दिवस महाराष्ट्रात आपल्या पक्षाचा विजनवास सुरु झाल्यागत वाटते आहे. (माहितीसाठी : महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे राज्य असून आपण सत्तेमध्ये सहभागी आहोत…) सत्तेमध्ये भागीदार असूनही आपल्या पक्षाला कोणीही विचारत नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे. आमच्या आमदार व मंत्र्यांना कोणी वळखही दाखवत नाहीत. समोरुन आले तर अंगावरुन निघून जातात, किंवा फूटपाथ बदलतात. फक्त वीजमंत्री मा. नितीनजी राऊतसाहेब दिसले तर हटकतात आणि ‘का हो, वीज कधी येणार?’ असे खवचटपणाने विचारतात. (त्यामुळे नितीनजी हल्ली फूटपाथ बदलू लागले आहेत! असो.)

मध्यंतरी मी पक्षाचा प्रदेशाध्यक्ष या नात्याने ‘राष्ट्रवादी’च्या मा. दादासाहेब बारामतीकर यांच्याकडे (जाब विचारायला) गेलो होतो. पण त्यांनी डोळे बारीक करुन मोठ्या आवाजात फक्त ‘आता काय काढलं?’ असे विचारले. मी परत आलो! मा. उधोजीसाहेब तर गेल्या काही महिन्यात दिसलेसुद्धा नाहीत. एक वेळ तुमची भेट मिळेल; पण त्यांना भेटणे अशक्य झाले आहे. त्यांच्या दाराशी एक उंच माणूस कायम उभा असतो. तो आतमध्ये जाऊच देत नाही. मध्यंतरी ते एकदा एका कार्यक्रमात भेटले, तेव्हा कुणीतरी माझी (पुन्हा) ओळख करुन दिली. इकडचं तिकडचं बोलून झाल्यावर त्यांनी ‘काय करता आपण?’ असे विचारले. मी तिथूनही परत आलो!!

आमच्या चंद्रपूर-भंडारा एरियात स्थानिक पातळीवर राष्ट्रवादी काँग्रेसवाल्यांनी महाविकास आघाडीचा धर्म विसरुन चक्क भाजपवाल्यांशी संधान बांधले आणि काँग्रेसची पंचाईत केली. मुंबई महापालिका क्षेत्रातल्या वॉर्ड पुनर्रचनेतही काँग्रेसची वाट लागेल,असे बघितले आहे. शिवसेनेला हे शोभले का? आघाडीतील या दोन्ही पक्षांनी एकमेकांना सांभाळून घेताना आपल्या पक्षाची जराही दखल घेतली नाही. काहीही वागले तरी हे लोक आपल्याला (पक्षी : सत्ता) सोडून जाणार नाहीत, याची त्यांना खात्री आहे. असे वाटते की, एक दिवस उठावे आणि महाविकास आघाडीतून बाहेर पडावे. ‘एकला चलो रे’ हा मार्ग अवलंबावा. पण पक्षातून यासाठी मला पाठिंबा मिळत नाही, हे दु:ख आहे. मला सत्तेची लालसा नाही. सत्ता काय आज आहे, उद्या नाही. पण मित्रपक्षच असे शत्रूसारखे वागू लागले तर काय करायचे? आपलेच दात आणि आपलेच ओठ!! असे किती दिवस जगणार? शिळ्यापाक्या मटणरश्शापेक्षा ताजे खमंग पिठले बरे, असे आता वाटू लागले आहे.

‘बघून घेईन’ असा दम मी अनेकदा देऊन पाहिला. पण त्याचेही ‘मी पुन्हा येईन’ टाइप जोकमध्ये रुपांतर झाले आहे. सहन होत नाही आणि सांगताही येत नाही, अशा स्थितीत सध्या आपला पक्ष टिकाव धरुन आहे. सत्तेच्या खेळात आपण कच्चा लिंबू आहोत का? मला तर भडभडून येते…महाविकास आघाडीतील अन्य दोन पक्षाच्या नेत्यांना आपण फोन करुन झाप झाप झापावे, असे मनाला फार वाटते. कृपया आपण फोन कराल का? कृपया मार्गदर्शन करावे, ही विनंती.

आपला सदैव एकनिष्ठ कार्यकर्ता.

नानासाहेब (पटोले)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com