ढिंग टांग : ऐसी जगह बैठिये...!

राजाधिराज उधोजीमहाराज नेहमीप्रमाणे अस्वस्थपणे येरझारा घालत आहेत. हल्ली त्यांच्या येरझारा इतक्या वाढल्या आहेत की दोन्ही बाजवांच्या भिंतींवर धडकांमुळे कपचे पडू लागले आहेत!
Dhing Tang
Dhing TangSakal
Summary

राजाधिराज उधोजीमहाराज नेहमीप्रमाणे अस्वस्थपणे येरझारा घालत आहेत. हल्ली त्यांच्या येरझारा इतक्या वाढल्या आहेत की दोन्ही बाजवांच्या भिंतींवर धडकांमुळे कपचे पडू लागले आहेत!

स्थळ : मातोश्री महाल, वांद्रे संस्थान. वेळ : सध्या फिरलेली. काळ : उलटलेला!

राजाधिराज उधोजीमहाराज नेहमीप्रमाणे अस्वस्थपणे येरझारा घालत आहेत. हल्ली त्यांच्या येरझारा इतक्या वाढल्या आहेत की दोन्ही बाजवांच्या भिंतींवर धडकांमुळे कपचे पडू लागले आहेत! तोंडाने ‘निमकहराम, बापचोर, गद्दार’ अशी माळ बाहेर पडत्ये आहे. अब आगे...

उधोजीराजे : (कडाडत) कोण आहे रे तिकडे? (कोणीही येत नाही. महालात सामसूम! एक सेवक दबकत येतो. सेवकाकडे संशयाने पाहून) तुम्ही कवण? आमचे नेहमीचे फर्जंद कुठे आहेत? त्यांना ताबडतोब आमच्यासमोर हजर करा!

मिलिंदोजी फर्जंद : (बऱ्याच वेळाने आरामात डुलत डुलत येत) मुजरा महाराज! आठवण काढली जणू?

उधोजीराजे : (संतापून तलवार उपसत) होता कुठे इतके दिवस आँ? तुमची ड्यूटी इथे आणि तुम्ही बाहेर भटकताय काय?

मिलिंदोजी : (अजीजीनं) माफी असावी, महाराज! रस्ता चुकलो होतो, म्हणून उशीर झाला!

उधोजीराजे : (अमान्य करत) रोजचा पायाखालचा रस्ता! डोळे बांधूनदेखील येता येईल, इतुका तोंडपाठ! तरीही रस्ता चुकलात? पटत नाही मनास..!!

मिलिंदोजी : (डोकं खाजवत) हल्ली विसरायला होतंय! तरी बरं, रोज ब्राह्मीचं तेल डोक्याला लावून मगच भांग पाडतो!!

उधोजीराजे : (गर्जना करत) खामोश! परवा तुम्ही थेट जाऊन कायदेमंडळात बसलात म्हणे?

मिलिंदोजी : (ओशाळून) ते होय...तेव्हा दार चुकलो होतो!

उधोजीराजे : (हातवारे करत) कधी रस्ता चुकता, कधी दार चुकता...काय चाल्लंय काय?

मिलिंदोजी : (खुलासा करत) निघालो होतो देवाच्या आळंदीला, पण

उधोजीराजे : (उग्र आवाजात) खामोश! मुंडके छाटीन!! तुम्ही परवा चालत चालत थेट कायदेमंडळाच्या सभागृहात जाऊन आमदारांसाठी राखीव खुर्चीत बसलात! आमच्या चिरंजीवांनी तुम्हाला समज दिली, तेव्हा तुम्ही तिथून उठून प्रेक्षकसज्जात गेलात, असा तुमच्यावर इल्जाम आहे!! बोला!!

मिलिंदोजी : (अजीजीनं) आधी रस्ता चुकलो, मग दार चुकलो, मग खुर्ची चुकली, महाराज!

उधोजीराजे : (तत्त्वज्ञपणे) ऐसी बात कहिये कोई न बोले झूठ, ऐसी जगह बैठिये, कोई न बोले ऊठ! समजलं?

मिलिंदोजी : (मान डोलावत) सॉरी!

उधोजीराजे : (न्यायनिष्ठूरपणाने) सॉरी काय सॉरी! फिर पहले कायकू माशी मारी? तुम्हाला आमदारकीची इतकी घाई सुटली आहे का? तसं असेल तर तुम्ही आम्हाला सांगायला हवं होतं! एका इशाऱ्यानिशी त्या खुर्चीत बसवलं असतं तुम्हाला!!

मिलिंदोजी : (बेरकी नम्रपणाने) या नाचीज बंद्याला एका इशाऱ्यानिशी त्या खुर्चीत बसवायला किमान तीन पक्ष तयार आहेत, महाराज!

उधोजीराजे : (भिवई वक्र करत) अस्सं? ही धमकी आहे की माहिती?

मिलिंदोजी : (अदबीने) रिक्वेष्ट आहे, महाराज!

उधोजीराजे : (जबर संशयी सुरात) तुम्ही नक्की आमचे फर्जंद आहात की आणखी कुणाचे?

मिलिंदोजी : (गुडघ्यावर बसत) आचंद्रसूर्य हा सेवक आपल्या चाकरीत राहील, याची खात्री बाळगावी, महाराज! मैंने आपका नमक खाया है...

उधोजीराजे : (‘अब गोली खा’ हा ‘शोले’तला डायलॉग मारण्याचा अतीव मोह आवरुन) बऱ्याच दिवसांनी महालात दिसलास फर्जंदा! महालाचा रस्ता विसरलास की काय?

मिलिंदोजी : (संकोचानं) तुम्ही विचारु नका, आम्ही सांगत नाही, महाराज!

उधोजीराजे : (तलवार उपसत) बऱ्या बोलाने सांगा! अन्यथा, जीभ छाटली जाईल!!

मिलिंदोजी : (चाचरत) कसं सांगू? आजही रस्ता चुकलो, महाराज! निघालो होतो ‘वर्षा’ बंगल्यावर, पण डायरेक्शन चुकली, आणि ‘मातोश्री महाला’शी आलो!! सॉरी!!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com