ढिंग टांग : एक देश, एक गणवेष! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dhing Tang

डिअरम डिअर होम्मिनिष्टरसाहेब, (महाराष्ट्र राज्य) यांसी पो. कॉ. बबन फुलपगार, बक्कल नं. १२१२, कदकाठी ५ फू. साडेपाच इं, वजन (बुटासकट ) ४२, उमर ४२ याचा साल्युट आणि अणेकाणेक णमस्कार.

ढिंग टांग : एक देश, एक गणवेष!

डिअरम डिअर होम्मिनिष्टरसाहेब, (महाराष्ट्र राज्य) यांसी पो. कॉ. बबन फुलपगार, बक्कल नं. १२१२, कदकाठी ५ फू. साडेपाच इं, वजन (बुटासकट ) ४२, उमर ४२ याचा साल्युट आणि अणेकाणेक णमस्कार. निवेदन लिहिणेस कारन कां की, आपल्या आदरनीय प्रधानसेवकसाहेबांनी नुकतेच देशभरच्या पोलिसांना एकाच रंगाची वर्दी ठेवावी किंवा कसे, असा सवाल जन्तेसमोर ओपन केला. या विशयावर चर्चा होने गरजेचे आहे, असे ते म्हणाले. सबब, हे लेटर लिहत आहे. राग मानू नये. मा. प्रधानसेवकांच्या आग्रह-कम- ऑर्डरचेच पालन मी करीत आहे.

सध्या वेगवेगळाल्या राज्यात वेगवेगळे विनिफॉम ऊर्फ वर्दी पोलिसलोकांना असते. उदाहरनार्थ, कोलकात्याला पोलिस सफेद वर्दी घालून चा पिताना दिसतो, तर पांडिचेरीत लाल टोपी घातलेला पोलिस चिरीमिरी घेताना दिसतो. दक्षिणेत वर्दी खाकी असली तरी रंग थोडा वेगळा आहे. आपल्या महाराष्ट्रात खाकी वर्दीची शान काही वेगळीच आहे. दिल्लीमधल्या पोलिसांचा रंग कंप्लीट वेगळाच दिसतो. ट्रॅफिकवाल्यांना वेगळा विनिफॉर्म राहातो. स्पेशल ब्रांचवाले तर घरच्या शर्टप्यांटीत टेचात फिरतात.

सिक्युरिटीतले कमांडो काळे सफारी घालून लोकल पोलिसांना दमात घेतात. असे साधारण चित्र असते. हे बदलून सर्व्यांनाच सेम टु सेम वर्दी देण्याचा मा. प्रधानसेवकांचा विचार एक नंबर आहे, असे णम्रपनाने म्हनावेसे वाटते. पूर्वीच्या टायमाला मुंबईत आणि महाराष्ट्रातील पोलिस हवालदार अर्ध्या चड्डीत बंदोबस्तासाठी हिंडत असत. डोक्यावर काळी टोपी कंपल्सरी होती. गुंडा ब्रांचवाले अघळपघळ हाफ प्यांटीत सायकल मारत गल्लोगल्ली सुळसुळत असत. सुप्रसिद्ध सिनेकलावंत दादा कोंडके यांचा ‘पांडू हवालदार’ सुपरहिट झाल्यानंतर डिपार्टमेंटमध्ये थोडी हालचाल झाली, आनि सर्व हवालदार कालांतराने फुल प्यांटीत आले.

आता हाफ प्यांट किंवा बर्मुडाची फ्याशन यवढी बोकाळली की दुनिया हाफ प्यांटीत आली, आणि पोलिसदादा मात्र इस्तरीच्या फुल प्यांटीत असे दिवस आले!! सिग्नल तोडला तर पोलिसांशी हुज्जत घालनारा हाफ प्यांटीत असतो, आनि फुल प्यांटीतला हवालदार पावती फाडत असतो, असे दृश्य दिसू लागले. काळ बदलला, दुसरे काय म्हनायचे? मा. प्रधानसेवकांची विच्छा पुरी करने हे आपल्या सर्व्यांचे परमकर्तव्य आहे. त्यावर ताबडतोबीने काम सुरु करावे ही विनंती. तथापि, माझ्या काही सूचणा मी मांडत आहे. कृपया विचार व्हावा.

१. सर्व राज्यातील पोलिसांना सेम टु सेम विनिफॉर्म द्यावा. जेणेकरुन सर्व राज्यातील चोरांना पोलिस लांबून ओळखने सोपे जाईल!

२. काही गुन्हेगार गुन्हा करुन दुसऱ्या राज्यात पळतात, आणि आरामशीर राहतात. त्यांना सेम विनिफॉर्म बघून दहशत बसेल, व त्यांची झोप हराम होईल!

३. पोलिसांना सर्व पोलिसांना रेडिमेड विनिफॉर्म उपलब्ध करुन द्यावा. त्यात स्मॉल, मिडियम, लार्ज, एक्सेल आनि डबल एक्सेल साइज ठेवावी. डब्बल एक्सेलपेक्षाही प्लस साइज असलेल्या पोलिसांना तंबूचे कापड उपलब्ध करुन द्यावे!

४. वर्दीमध्ये शर्ट इन करतावेळी अनेकदा अडचन होते. बऱ्याच हवालदारबंधूंचे पोट साधे ‘जय हिंद’ म्हनतानाही तीनदा ‘हिंद’कळते. त्यांच्यासाठी अनुकंपा तत्त्वावर सूट द्यावी! (‘सूट द्यावा’ असे म्हटले नाही, याची नोंद घ्यावी.)

५. देशातील राजकारन्यांनाही विनिफॉर्म मुक्रर करावा! तसेच साध्या नागरिकांनाही विनिफॉर्म निच्छित करु द्यावा. लेकाचे हाफ प्यांटीत हुज्जत घालतात!!

…बऱ्याच सूचना आहेत. आज्ञा झाल्यास त्या पुढील लेटरमध्ये!! आपला णम्र. बबन फुलपगार.