
इंगळ पडते अंगावरती, तसेच माथी तळते ऊन, कशी आळवू अगा विठ्ठला, फुकाच मल्हाराची धून
ढिंग टांग : वैशाखचित्रे!
इंगळ पडते अंगावरती,
तसेच माथी तळते ऊन
कशी आळवू अगा विठ्ठला
फुकाच मल्हाराची धून
भेग भुईची फाटत जाते,
येथून तेथे चिंध्याचूर
पाण्यासाठी गाईगुजींचे
रक्तमाखले दमले खूर
जीवित झाले मरुभूमीपरि
रोज धुळीचे उठती लोट
शुष्क जिभांना तडे चालले
खोल खपाटी गेले पोट
सडकेलागी उभे सापळे
अस्थिपंजरी वृक्ष तसे
पाचोळ्यांचे ढीग निघाले
पिशाच्चवारा क्रूर हसे
म्लान मुखाने कुणी निघाला
शोध जळाचा असे सुरु
टिपूस नाही उरला नेत्री,
नजर घातली मरु मरु
शुष्काचे साम्राज्य पसरले
काहिल झाला माझा गाव
मरतुकड्या श्वानासम जीवित
करी लहलहा, नाही ठाव
नभात गिरक्या घेति गिधाडे
भूमीवरती कसला शोर
नभात उसळे मृत्युगंध तो
काय कुणाचे मेले ढोर?
गिधाड बघते आभाळातुनि
अमंगळाची कसली वाट
आकांताचे सूर उसळती
नदीतीरावर जळतो घाट
जणू पाठिवर मारुनि धपके
कुणी आणतो पुनश्च श्वास
तशी तिठ्यावर हपशी देते
शुष्क कोरडे आचके खास
शुष्काळाचे राज्य पसरले
रानशिवारे भुईसपाट
ढेकुळ फुटके सांगत होते
प्रारब्धाशी पडली गाठ
विहीर माझी किती कोरडी
रहाट माझा राही मुका
या भूमीचे मार्दव सुकले
उरला सुरला जीव विका
ऋतुचक्राचे आरे फिरती
जीव गरगरे त्यात खुळा
काय हिमाचे चरण वितळले
आणि जलधीचा सुके गळा?
मेघ आण रे मेघ आण रे
किती विनवतो जोडुनि हात
पाण्यावरती दिवा पेटतो
जीव आमुचा, जळते वात
स्मरणामधल्या गावामध्ये
कधी यायचा एक फकिर
‘फिर पानी दे मौला’ म्हणुनी
बघायचा मग नभात स्थिर
फकीर होता, थांबत नव्हता
चालत गाठे पुढले घर
दुव्यात त्याच्या होता बहुधा
पुण्याईचा बहुत असर
फकिर येऊन गेल्यानंतर
वळिव यायचा कुठूनसा
उष्ण उसासे टाकीत जीवित
पुन्हा घ्यायचे कानोसा
कोठे गेला फकीरबाबा?
काय जाहली त्याची दुवा?
फिर पानी देणारा मौला
काय जाहला हवा हवा?
अगा विठ्ठला अंत पाहसी
पाणीभरले मेघचि धाड
तुझे चराचर जपण्यासाठी,
पाऊस पाड गा, पाऊस पाड!