ढिंग टांग : पंचतारांकित!

महाराष्ट्राचे कल्याण व्हावे, असे कोणाला वाटत नाही? परंतु, हे काम काही सोपे नाही. त्यासाठी आपल्या लोकप्रतिनिधींना खूप कष्ट घ्यावे लागतात.
Dhing Tang
Dhing TangSakal
Summary

महाराष्ट्राचे कल्याण व्हावे, असे कोणाला वाटत नाही? परंतु, हे काम काही सोपे नाही. त्यासाठी आपल्या लोकप्रतिनिधींना खूप कष्ट घ्यावे लागतात.

महाराष्ट्राचे कल्याण व्हावे, असे कोणाला वाटत नाही? परंतु, हे काम काही सोपे नाही. त्यासाठी आपल्या लोकप्रतिनिधींना खूप कष्ट घ्यावे लागतात. झीज सोसावी लागते. आयुष्याचा होम करावा लागतो. मोठमोठ्या प्रलोभनांपासून दूर राहावे लागते. रात्रंदिन कार्यरत राहावे लागते. पंचतारांकित हॉटेलात एकगठ्ठा राहाणे हे त्यापैकीच एक अवघड कार्य! तुम्ही विचाराल, त्यात काय अवघड आहे? उंची गाद्यागिरद्यांवर लोळणे, चांगल्याचुंगल्या, चविष्ट पदार्थांचा आस्वाद घेणे, यात कसले अवघड कार्य? पण लोकहो, तसे नाही.

आपले प्रिय लोकप्रतिनिधी काही आवडीने पंचतारांकित हॉटेलात जात नाहीत. लोकशाहीवर किंवा देशावर किंवा राज्यावर संकट आले की त्यांना नाइलाजाने हॉटेलमध्ये जाऊन राहावे लागते. त्यामुळे लोकशाहीचे रक्षणच होत असते. पण काही संकुचित मनोवृत्तीचे लोक त्याला नावे ठेवतात. पंचतारांकित हाटेलातच लोकशाहीचे रक्षण होऊ शकते का? साध्याशा लॉजमध्ये का नाही होऊ शकत? असे खवचट प्रश्न विचारणे अज्ञानमूलक आहे.

पंचतारांकित हॉटेलांमधील खोल्यांमध्ये मऊ गाद्यागिरद्या असतात. त्यावर झोपल्याने पाठीचे दुखणे बळावते. काही राजकीय नेत्यांना ऑलरेडी मणक्याचे प्रॉब्लेम असतात. त्यांची परिस्थिती अधिकच अवघड होते. काही नेत्यांचा बाणाच मुळी मोडेन पण वाकणार नाही, असा असतो. त्यांना अशा उंची मंचकावर झोप येणे अशक्य होते. फुकाचे जागरण होते. जागरण झाले की आम्लपित्त होते. आम्लपित्त झाले की डोके भडकते. डोके भडकले की राजकारणाचा खेळ बिघडतो, पर्यायाने जनतेचेच नुकसान होते. म्हणून काही लोकप्रतिनिधी पंचतारांकित हॉटेल बांधतात, पण त्यात स्वत: राहात नाहीत. कळले?

पंचतारांकित हॉटेलांमधील अन्न किती बेचव असते? ना धड तिखट, ना धड मीठ, ना मसाले! मिळमिळीत नुसते!! सुरतेतील हाटेलात वास्तव्यास असलेल्या एका आमदाराने सहज म्हणून एक मुर्गी मागवली. मुर्गीच्या रश्शात गूळ घातला असावा, अशी त्यास शंका आली!! सदरील आमदाराच्या डोळ्यात पाणी आले. परंतु, केवळ लोकांचे हित डोळ्यासमोर ठेवून त्याने मुर्गीच्या मुर्गी उदरात घेतली. वेळ आली तर जनतेसाठी पोटात काटेदेखील घालण्याची तयारी असावी लागते. खरे तर या सर्व नेते-आमदारांना साधेसुधे घरचेच जेवण आवडते. निवडणुकीच्या काळात हेच नेते गरीब कार्यकर्त्याच्या घरात शिरुन भाजीभाकरीचा आस्वाद घेताना आपण अनेकदा पाहातो. त्यांना पंचतारांकित हाटेलातले अन्न कसे गोड लागावे. आपल्या राज्यातील जनता अर्धपोटी असताना नेत्याने का हाटेले झोडायची असतात?

इदम न मम या वृत्तीने लोकांचे प्रतिनिधित्व करायचे असते. हे एक कठोर व्रतच आहे. पंचतारांकित मुर्गी असो, नाहीतर गरीबाघरचा डाळभात असो, समवृत्तीने प्रसाद म्हणून ग्रहण करायचे असते. त्यानेच लोकशाही सुदृढ होते. पंचतारांकित हॉटेलात मन आपोआप अध्यात्मिक होते. चित्तवृत्ती समाधानी होतात. शरीर अधिक जोमाने आणि उत्साहाने प्रतिसाद देऊ लागते. अशा मनस्थितीत लोककल्याणाचे चिंतन करणे थोडेसे सोपे होते. या सेवाभावी वृत्तीच्या आमदारांनी, एरवी घरदार आणि कामेधामे सोडून हॉटेलात जाऊन राहाणे, वेळीअवेळी चार्टर्ड विमानाने देशाच्या कानाकोपऱ्यातल्या रिसॉर्टमध्ये जाणे, इच्छा नसताना सतत घराबाहेरचे अन्न खाणे यामुळे प्रकृतीची किती अबाळ होत असेल, याचा कुणी विचार केला आहे का?

पण काय करणार? आलिया ‘भोगा’सी असावे सादर, असे म्हटलेच आहे. देशातील पंचतारांकित रिसॉर्ट आणि हॉटेलांची संख्या उत्तरोत्तर वाढो, आणि तेणेकरुन लोकशाही बळकट होवो, हीच प्रार्थना.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com