ढिंग टांग : गुढ्या : काही राजकीय, काही कौटुंबिक...! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dhing Tang

नवसंवत्सराच्या शुभमुहूर्तावर बहुतांनी आपापल्या गुढ्या उंच उभारल्या आहेत. घरगुती गुढ्यांच्या बरोबरीने महाराष्ट्रातील नामचीन नेत्यांनीही आपापल्या गुढ्या अस्मानापर्यंत पोचवल्या.

ढिंग टांग : गुढ्या : काही राजकीय, काही कौटुंबिक...!

नवसंवत्सराच्या शुभमुहूर्तावर बहुतांनी आपापल्या गुढ्या उंच उभारल्या आहेत. घरगुती गुढ्यांच्या बरोबरीने महाराष्ट्रातील नामचीन नेत्यांनीही आपापल्या गुढ्या अस्मानापर्यंत पोचवल्या. या राजकीय गुढ्यांची दखल घेणे आम्हाला क्रमप्राप्त होते. या गुढ्यांचे दर्शन घ्यावे, आणि (जमल्यास तेथेच) श्रीखंडपुरीवर हात अथवा बोट मारुन यावे, या मिषाने आम्ही काही राजकीय नेत्यांकडे जाऊन आलो. (श्रीखंड मिळाले नाही, हे जाता जाता नमूद केले पाहिजे!) यातील निवडक गुढ्यांचे वर्णन आणि गुढीकर्त्यांचे नूतन संवत्सराचे संकल्प वाचकांसाठी येथे देत आहोत.

त्यामुळे महाराष्ट्रातील राजकारणावर प्रखर प्रकाशझोत पडला नाही, तरी तिरीप नक्की पडेल, असा विश्वास वाटतो. वाचा :

नानासाहेब यांची कमळगुढी : परमवंदनीय श्री नमोजी आणि परमआदरणीय श्रीमान मोटाभाई यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही यंदाची गुढी उभारली आहे. अडीच वर्षे कडुनिंबाचा पाला चावण्यात गेली! यंदा आम्ही विजयाची गुढी उभारली असून (सत्तेचे) श्रीखंड प्रसाद म्हणून ग्रहण करु! महाराष्ट्राच्या जनतेलाही चाखू देणार आहो! विश्वासघात करणाऱ्यांचा बदला घेऊन आम्ही ही विजयाची गुढी उभारली आहे, म्हणून तिचे महत्त्व अधिक! या गुढीच्या साखरगाठी अधिक गोड आहेत! खाऊन बघा!!

कर्मवीर भाईसाहेबांची गुढी : गुढी उभारा साहेबांच्या विचारांची! वास्तविक आम्ही सारे मिळून गुवाहाटीत जाऊन गुढी उभारण्याचे ठरवले होते. पण ऐनवेळी ठाण्याला जावे लागले. त्याआधी ठाण्याहूनच आलो होतो. मुख्यमंत्र्यांचे अधिकृत निवासस्थान मलबार हिल येथून ‘किसननगर, ठाणे’ येथे नेता येईल का, असा ठराव मांडायचा विचार आहे. बघू! गुढीपाडव्यानिमित्त आमच्या चाळीस आमदारांना श्रीखंडाचा खोका...चुकलं...सॉरी...डबा पाठवला. आनंदाचा शिधा म्हणून खातील बिचारे! आमच्या गुढीला ‘गदरगुढी’ असे नाव ठेवले आहे. कसे आहे?

मातोश्रीची गुढी : गुढी चिरंजीवांनीच उभारली! मी सकाळपासून कडूनिंबाचा पाला पाच वेळा चघळला. अजिबात कडू लागत नाही! जणू तुळशीचे पान खावे, तसा खातो आहे! गेले आठ महिने तोंड कडू पडल्याने चव जाणवत नसावी, असे कुटुंबियांचे मत पडले. -तसे असेल! श्रीखंड अडीचशे ग्रॅम मागवले आहे. शास्त्रापुरते थोडे खाईन! बाकी कुटुंब आहेच. ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही मोहीम आयुष्यभर राबवावी लागेल, असे वाटले नव्हते. चालायचेच. गद्दारांच्या गुढीचा निषेध असो! गद्दार लेकाचे!! बघून घेईन, एकेकाला कडूनिंबाचा पाला खायला लावीन!! हर हर महादेव!!

नवनिर्माणाची गुढी : कोणॅय रे...? काय गडबड आहे? कसली गुढी...आँ? हां, हां, गुढीपाडव्याची! बरं बरं!! तुम्हालाही गुढीपाडव्याच्या शुभेच्छा! महाराष्ट्रधर्म जागवण्यासाठी आम्ही गुढ्या उभारतो. कळलं? उगीच श्रीखंड खायला मिळावं म्हणून नाही करत हे उद्योग! तुम्ही तुमच्याही गुढ्या उभारा, पण आधी ते भोंगे बंद करा! अरबस्तानात कुठे आहेत तुमचे ते भोंगे? मग इथे कशाला? भोंगे उतरवा, आणि गुढ्या उभारा!! कळलं? श्रीखंड? हॅ, मी असलं काही खात नाही! निघा!!

राष्ट्रवादी गुढी : हे पहा, प्रत्येकाला गुढी उभारण्याचा अधिकार लोकशाहीने दिलेला आहे. त्याबद्दल जास्त काही बोलायची याठिकाणी गरज नाही! आमची गुढी ही कायम मतदारांच्या गुढीशेजारी असते. जनतेची कामं तर होऊद्यात! मग गुढीची राजकारणं होत राहतील!

काँग्रेस गुढी : आमची गुढी स्वातंत्र्य चळवळीच्या काळापासूनच आहे. देशात बोकाळणारी हुकूमशाही नष्ट करण्यासाठी आम्ही यंदा ही लोकशाही गुढी उभारली आहे. पण आमच्या गुढीची उंची कमी करण्याचं ध्रुवीकरणाचं राजकारण चालू आहे, ते आम्ही चालू देणार नाही! उभारु निषेधाची गुढी!