ढिंग टांग : एक शिकार अनोखी! (पुन्हा अरण्यकथा…)

पाऊस नुकताच पडून गेला होता. (हे एक भंपक वाक्य आहे.) ज्येष्ठ लागल्याची चाहूल सृष्टीला लागली होती.
Dhing Tang
Dhing TangSakal
Summary

पाऊस नुकताच पडून गेला होता. (हे एक भंपक वाक्य आहे.) ज्येष्ठ लागल्याची चाहूल सृष्टीला लागली होती.

पाऊस नुकताच पडून गेला होता. (हे एक भंपक वाक्य आहे.) ज्येष्ठ लागल्याची चाहूल सृष्टीला लागली होती. (म्हंजे नेमकं काय झालं, च्यामारी?) अवघं अरण्य सुस्नात दिसू लागले होते. पावसाची झड थांबताच सातबायांचा थवा कलकलाट करत जमिनीवर उतरला. नागझरीच्या पाणवठ्यावर तुरेवाला खंड्या पुन्हा गिरक्या घेऊ लागला. (हे एक दळिद्री पाखरु बघून ठेवलं पाह्यजेलाय…तुरेवाला खंड्या म्हणे!) जांभळा शिंजिर झुडपांमध्ये दडून उड्या मारु लागला. (जांभळा शिंजिर हेही एक पाखरु असावं, असा आमचा दाट वहीम आहे. पण काहीही असलं तरी काय झाडीत दडून उड्या मारायच्या? हे काय राजकारण आहे?)

अर्जुनाच्या विशाल वृक्षावर वानरांची टोळी विश्राम करत थांबली होती. सारे काही चिडीचूप होते… ‘बॅब्स, अजून कितीवेळ असंच बसायचं आहे?’ छोट्या शिकाऱ्याने मोठ्या शिकाऱ्याला विचारलं. ‘आंबट हिरा’ मचाणावर आडवे पडून हे दोन नाणावलेले शिकारी नजर लावून बसले होते. (काय पण मचाणाचं नाव! आंबटहिरा?) मोठा शिकारी काही बोलला नाही. ‘बॅब्स, रेन पडला ना? मोर कधी डान्स करणार?,’ छोटा शिकारी अगदी ऐक्कत नव्हता.

‘शुऽऽ हळू बोल!,’’ मोठा शिकारी दबक्या आवाजात ओरडला.

‘बॅब्स, आपण शिकार करायला मचाणावर बसलोय की घाबरुन बसलोय?,’ छोट्या शिकाऱ्याच्या निरागस प्रश्नांना अंत नव्हता. मोठ्या शिकाऱ्याने मनातल्या मनात दातओठ खाल्ले, पण तो काही बोलला नाही. तेवढ्यात समोरच्या नेपतीच्या झुडपात खसफस झाली. अर्जुनाच्या वृक्षावर डुलक्या घेणारा वानरांचा कळप सावध झाला. त्यातील अल्फा नराने (हे एक कॅरेक्टर बघून ठेवले पाह्यजेलाय!) ‘खर्रर्र खक खक’ असा इशारा दिला. ‘खर्र खक खक’ म्हणजे वानरांच्या भाषेत ‘वाघ आला, वाघ!’ काही लोकांना मराठी असूनही गुजराती भाषा येते, तशी काही काळवीटे, सांबरे, रानडुकरे आदी वन्यप्राण्यांनाही वानरांची भाषा येते!!

सारांश, वाघ आला हे सर्वांना कळलं. मोठ्या शिकाऱ्याला गुजराती समजते, पण बोलता येत नव्हती. तसंच वानरांची भाषाही कळत होती, पण बोलणं अशक्य होतं…

वाघ डुलत डुलत आला, आणि डोळ्यावर झोप कोसळल्यागत नजीकच्या खडकावर जाऊन चक्क झोपला. त्यानंतर थोड्याच वेळात एक साधीसुधी शेळी तिथं प्रविष्ट झाली. नजीकच्या खेड्यातून चुकून जंगलात वाट चुकली असणार! पाणवठ्याच्या कडेकडेने ती बँ बँ ओरडत, चरत राहिली. वन्यप्राण्यांनी तिचं मनोमन कौतुक केलं. ‘शेळी असूनही डेरिंगबाज आहे, वाघाच्या राज्यात येऊन चरती!’ असं तमाऽऽम जंगलातील बंधू-भगिनी-मातांचं मत पडलं.

‘बॅब्स, शेळीला टायगर खाईल?,’ छोट्या शिकाऱ्यानं विचारलं. मोठ्या शिकाऱ्यानं डोळे वटारले.

‘अफकोर्स! मग काय तिला गुलाबजाम खायला देईल?,’ छोट्या शिकाऱ्याच्या डोक्यात टप्पल मारुन मोठा शिकारी म्हणाला. पण पुढे घडलं ते अतर्क्य होतं….

दबक्या पावलानं ती शेळी झोपलेल्या वाघाच्या दिशेनं गेली. क्षणार्धात तिनं बेसावध वाघावर चाल करुन त्याला शिंगावर घेऊन दूर फेकून दिलं. झोपेत ‘भॉ’ केलं तर वाघसुध्दा घाबरणारच! वाघ निमूटपणे उठून दुसऱ्या खडकावर जाऊन झोपला. अचानक झालेल्या हल्ल्यानं तो हादरलाही होताच.

शेळी बिनधास्तपणे चरु लागली. झाडावर सुरक्षित बसलेल्या वन्यप्राण्यांनी टाळ्या वाजवल्या, जमिनीवरच्या प्राण्यांनी फक्त एकमेकांकडे पाहिलं. मोठा शिकारी पाटलोण झटकत मचाणावरुन उठला. छोट्या शिकाऱ्याला म्हणाला, ‘चल, निघू या आपल्या बांदऱ्याच्या घरी!’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com