ढिंग टांग : सुपारी, नारळ वगैरे! (काही खळबळजनक प्रतिक्रिया...)

माननीय ना. नानासाहेब यांनी केलेल्या गौप्यस्फोटाचे वृत्त वांचून काळजी वाटली. महाविकास आघाडी सरकारच्या काळात आपल्या अटकेची सुपारी देण्याचा कट रचण्यात आला होता.
Dhing Tang
Dhing Tangsakal
Summary

माननीय ना. नानासाहेब यांनी केलेल्या गौप्यस्फोटाचे वृत्त वांचून काळजी वाटली. महाविकास आघाडी सरकारच्या काळात आपल्या अटकेची सुपारी देण्याचा कट रचण्यात आला होता.

माननीय ना. नानासाहेब यांनी केलेल्या गौप्यस्फोटाचे वृत्त वांचून काळजी वाटली. महाविकास आघाडी सरकारच्या काळात आपल्या अटकेची सुपारी देण्याचा कट रचण्यात आला होता, असा गौप्यस्फोट त्यांनी एका कार्यक्रमात केला. नंतर पत्रकारांशी बोलतानाही त्यांनी हाच बॉम्ब फोडला. ऐकून दचकलोच!

हा प्रकार घडल्याचे ते आधी बोलले असते, तर पक्षातर्फे मोर्चेबिर्चे काढून वातावरण तापवता आले असते. अजूनही वेळ गेलेली नाही. अटकेचा आदेश ‘वरुन’ आला होता, असे ते म्हणाले. ‘वरुन’ म्हंजे नेमके कुठून? हे स्पष्ट व्हायला हवे. त्यांच्या या गौप्यस्फोटामुळे राजकीय खळबळ उडणे साहजिक आहे. ज्या अर्थी ते जाहीरपणे दावा करतात, त्याअर्थी त्यांच्याकडे पुरावाही असणार! नानासाहेबांसारख्या नेतृत्त्वाला वेसण घालण्यासाठी विरोधक कुठल्याही थराला जातील, असे वाटते. मला वाटते की ही बाब दिल्लीत मा. मोटाभाई यांच्या कानावर घालावी. अजून त्यांचे बरेच करिअर बाकी आहे. - चं. बा. (प्रदेश कमळाध्यक्ष)

मा. फडणवीसनानांचा ‘बाईट’ ऐकला. मविआच्या काळात आपल्या अटकेची सुपारी गेली होती, असे ते म्हणतात. माझा तरी विश्वास बसत नाही. उगीचच कोण कशाला अटक बिटक करेल? मी त्या काळात होम मिनिस्टर होतो. मला तरी असले काही घडलेले आठवत नाही. किंबहुना आपल्या काळातली अडीच वर्षे तशी शांततेतच गेली, अशी माझी समजूत आहे. - दिलिप्राव. व. पा. (माजी. हो. मि.)

मी नानासाहेबांना चांगला ओळखतो आणि त्यांच्याशी माझे संबंध (त्या पहाटेपासूनच) चांगले आहेत. त्यांच्या गौप्यस्फोटाचे मनावर घेऊ नका. दुसरीच तिकडम करण्याआधी पब्लिकचा ‘कात्रज’ करण्यासाठी त्यांनी हे गौप्यस्फोटाचं काढलेलं दिसतं. आलं ना लक्षात? म्हंजे हिकडे सुतळी बॉम्ब फोडायचा, आणि तिकडे जाऊन दिवाळीचा फराळ उरकायचा, ही लाइन!! सध्या मंत्रिमंडळाचा विस्तार करण्याचं चाललं आहे, असं ऐकतो. त्यांच्या अटकेची सुपारी वगैरे काहीही खरं नाही. पण याबद्दल कोणीही सध्या काही बोलू नये, अशा मताचा मी आहे. आम्ही काही बोलायला जायचो, आणि हे नवा पेन ड्राइव बाहेर काढायचे. कोणाच्या देवानं सांगितलंय? सोडा!

- दादासाहेब बारामतीकर (धाकले धनी.)

एक म्हणजे कुठलेही सरकार सुपाऱ्या बिपाऱ्या देत नसतं! त्यात नानासाहेब आमचे मित्र आहेत. त्यांच्या अटकेची सुपारी देण्याचा विषय कधी आला नाही. सोमय्यागोमय्यांनाही अटक झाली नाही, तिथं नानासाहेबांना कशी होईल? सगळं थोतांड आहे. लौकरच कळेल!! - संजयाजी प्रवक्ते. (सकाळी सव्वानऊ वाजता)

बॅब्स, देवेनअंकलना अरेस्ट? इंपॉसिबल! ‘वरुन’ आदेश होता, असं ते म्हणतात! म्हंजे आपला वरुण सरदेसाई नाही ना?

- चि. आ. उ. ठा. (माजी पर्यावरणमंत्री)

माझ्या तमाम बंधून्नो, भगिनीन्नो आणि मातान्नो, सध्या काळ मोठा कठीण आला आहे. वाट्टेल ते आरोप होत आहेत. आमच्या माजी मित्रानं असे आरोप करावेत याचं वाईट वाटलं. हे कसले भक्त? हेच ते गद्दार रक्त!! आम्ही कोणाच्या अटकेच्या सुपाऱ्या बिपाऱ्या दिल्या नाहीत. असल्या सवयी आम्हाला नाहीत. (त्या तुम्हालाच लखलाभ असोत.) मला स्वत:ला सुपारीच्या खांडाचं व्यसन नाही. हां, सुपाऱ्या दिल्या नसल्या तरी, आम्ही त्यांना निरोपाचा नारळ मात्र समारंभपूर्वक दिला होता! उगीच खोटेनाटे आरोप करु नका, हा मर्दांचा महाराष्ट्र आहे. असेल हिंमत तर समोर येऊन दोन हात करा. सुपाऱ्या कसल्या कातरता? जय महाराष्ट्र. उधोजी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com