ढिंग टांग : गाठ आहे माझ्याशी!

दादू : (संतापाने फोन फिरवत) घुर्रर्र...हाऽऽऊ...फुर्रर्र!!
Dhing Tang
Dhing TangSakal
Summary

दादू : (संतापाने फोन फिरवत) घुर्रर्र...हाऽऽऊ...फुर्रर्र!!

दादू : (संतापाने फोन फिरवत) घुर्रर्र...हाऽऽऊ...फुर्रर्र!!

सदू : (दचकून) कोण डरकाळतंय?

दादू : (रागारागाने) वाघ!

सदू : (खुदकन हसत) बोरिवली नॅशनल पार्कातला का? होहोहोहो!!

दादू : (संतापातिरेकानं) सद्याऽऽ...! तुझा हा भोंगा आधी बंद कर!

सदू : (आव्हानाची भाषा करत) नाही करणार! काय करशील?

दादू : (छद्मीपणाने) असले अनेक भोंगे उतरवलेत आजवर! जास्त आवाजी नाय पायजे!

सदू : (खिजवत) नको ते भोंगे वाजूद्यात! आमचे उतरवणार भोंगे? आहे का हिंमत!!

दादू : (संतापाने बेभान होत) मी...मी...माझ्या जंटलमनपणाचा अंत पाहू नकोस! ठकासी महाठक आहोत आम्ही!

सदू : (गंभीरपणाने) मीही जंटलमनच आहे! तुम्हीच माझ्या पेशन्सचा अंत पाहिलात! आता भोगा फळं!!

दादू : (पवित्रा बदलत) सदूराया, असं का रे करतोस? काहीही झालं तरी तू माझा भाऊ आहेस ना? मग? आपण एकमेकांना सांभाळून नको का घ्यायला? काही अडलं होतं का ही भोंग्यांची भानगड उकरुन काढायला? चांगलं चाललं होतं की!!

सदू : (एक सुस्कारा सोडत) हंऽऽ...हा सगळा नियतीचा खेळ आहे, दादू! त्याच्यापुढे कोणाचं काही चालत नाही! नियतीच्या मनात नसतं, तर आज तू दौलतीचा कारभारी तरी असतास का?

दादू : (लाडालाडात) मला तुझं काही कळतच नै! वर्षवर्ष गायब असतोस, आणि अचानक येऊन एवढा ‘हो-हल्ला’ करतोस...गडबडून जायला होतं! तुझ्या भोंग्याच्या भोंग्यानं असाच दचकून उठलो!!

सदू : (दुप्पट लाडात) लहानपणी मी दारापाठीमागे लपून तुला ‘भॉक’ करायचो, तेव्हाही तू असाच दचकायचास! हाहा!!

दादू : (गांभीर्यानं) पण मोठेपणी असं कुणी करतं का...भॉक!

सदू : (थंड खर्जाच्या सुरात) माझी एक तारखेची सभा झाली की बघ! आजवरचं सगळ्यात भारी ‘भॉऽऽक’ करणार आहे!

दादू : (संयम बाळगून) सदूराया, हे उद्योग तू सोड! भोंग्यांचं राजकारण चांगलं नाही, त्यामुळे समाजातली शांतता नष्ट होते! आपण सगळी जंटलमन माणसं आहोत! असे राजकीय भोंगे वाजवणं बरं नाही! असल्या सभाबिभा म्हंजे राजकीय भोंगेबाजीच असते! कळलं?

सदू : (निर्धाराने) माझा निर्णय फायनल आहे! सभा ठरल्याप्रमाणे होणार!!

दादू : (खमकेपणाने) अच्छा? ये बात? मग ऐक! मीसुद्धा एक दणकेबाज सभा घेणार आहे!

सदू : (खिजवत) फेसबुकवर?

दादू : (भडकून) चांगली लाखाची सभा घेणार आहे...लाइव्ह! तुम्हा सगळ्यांचे व्हिडिओफिडिओ दाखवून मामला खतम करणार आहे! न रहेगा बांस, ना बजेगी बांसुरी!!

सदू : (खुदखुदत) घरातल्या घरात मास्क लावून करण्याची ही गोष्ट नव्हे! त्यासाठी घराबाहेर पडावं लागतं!!

दादू : (मूठ वळून) मास्क काढून सभा घेईन! समजलास काय? एक घाव, दोन तुकडे!!

सदू : (समंजसपणे) ऐक, दादूराया, आपल्याला जे जमतं ते करावं! तू आपला फेसबुकातून बोल कसा!! सभा घेणं हे येरागबाळ्याचे काम नोहे! लाखालाखाच्या सार्वजनिक सभा घ्यायला छप्पन्न इंची छाती लागते!!

दादू : (वैतागून) घेणार, घेणार घेणार! तुम्ही आमच्याबद्दल वाट्टेल ते बोलायचं, आणि आम्ही का गप्प बसायचं? एकच आवाज काढीन आणि तुमचे भोंगे कायमचे बंद करीन!!

सदू : (डेडली पॉज घेत) त्यासाठी तुलासुद्धा राजकीय भोंगा वाजवायला लागेलच ना? वाजव! जय महाराष्ट्र.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com