ढिंग टांग : जगीं ज्यास कोणी नाही…!

‘गोव्याहून? गोव्याला काय आहे? नीट विचारुन ये जा!,’ साहेबांनी करवादून फर्मावले. दारवान पुन्हा दरवाजाशी गेला, आणि अधिक चवकशी करोन परतला.
Dhing Tang
Dhing TangSakal
Summary

‘गोव्याहून? गोव्याला काय आहे? नीट विचारुन ये जा!,’ साहेबांनी करवादून फर्मावले. दारवान पुन्हा दरवाजाशी गेला, आणि अधिक चवकशी करोन परतला.

जगीं ज्यास कोणी नाही, त्यास देव आऽऽहे,

निराधार आभाळाचा तोच भार साहेऽऽ…(दोनदा)

नेमकी तीथ सांगावयाची तर ज्येष्ठातली कृष्ण पक्षातली द्वितीया होती. टळटळीत दुपार होती. उन्हे नव्हती, पण नुकताच पाऊस पडून गेल्यामुळे प्रचंड उकडत मात्र होते. शिवाजी पार्काडात सर्वत्र शांतता होती. हल्ली तशीच असते. ‘शिवतीर्था’वरही सारे काही शांत होते. हल्ली तसेच असते. त्यामुळेच ऐतिहासिक क्षण टिपण्यासाठी सदैव जय्यत तयार असलेला इतिहासपुरुष बेसावध जाहला. त्याचा नुकताच डोळा लागला.

तेवढ्यात- ताड ताड दौडत येक सांडणीस्वार ‘शिवतीर्था’च्या नवनिर्माण दरवाजापास येवोन थांबला. दारवानाने त्यास कोण? कुठले? विचारोन, नाव नोंदवोन आत सोडिले. अंत:पुरात जावोन साहेबांस वर्दी दिली : गोव्याहून जासूद आला आहे, आपला भेटीचा वखत मागताती!’’

‘गोव्याहून? गोव्याला काय आहे? नीट विचारुन ये जा!,’ साहेबांनी करवादून फर्मावले. दारवान पुन्हा दरवाजाशी गेला, आणि अधिक चवकशी करोन परतला. ‘क्षमा करावी, साहेब! गोवा नव्हे, गोवाहाती!’

साहेब चमकले. गोवाहाती? ‘धाडा त्या जासुदास आतमध्ये!’ साहेबांनी आज्ञा केली. जासूद अदबीने आत आला. इकडे तिकडे पाहात त्याने कमरबंदातील खलित्याची पुंगळी काढून सरळ उभी धरली. ‘असा देतात का खलिता गाढवा? कुणी शिकवलं नाही का तुला? शंख कुठला!,’ साहेब भडकले. खलिता हिसकावून घेऊन वाचूं लागले…‘राजमान्य राजेश्री श्रीमान साहेबांसी, बालके एकनाथाचा मुजरा, लाख लाख दंडवत कृतानेक प्रणाम. ठावकें आसेलच की सध्या आमचा मुक्काम गोवाहाती येथे आहे. आणी काही अपरिहार्य कारणामुळे मुंबईस परतणे मुश्कील होवोन बैसले आहे. आपण कृपाळू आहां! (आहा नाही, आहां!)

आमचे अल्पधारिष्ट्य पाहात आहां! (पुन्हा आहां!) निवडक पन्नास एक(नाथ) निष्ठ मावळ्यांसमवेत आम्ही गोवाहातीच्या किल्ल्यात आडकून पडलो आहो. किल्लेदार राडिसन दाणागोटा आणि मुक्कामाच्या शुल्कासाठी तगादा लावत आहे. ऐसीयास आपण आम्हांस येकगठ्ठा पदरी घेवोन, आमचा पतकर घ्यावा, आणी आमची येकगठ्ठा सुटका करावी, ही कळकळीची प्रार्थना. आपला एकनिष्ठ सेवक. एकनाथाजी शिंदा.

ता. क. : पतकराचे पत्र तांतडीने जासुदाकरवी रवाना करावे, ही विनंती. वाट पाहातो.’’

…खलिता वाचोन साहेबांचे डोळेच विस्फारले गेले. आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो पन्नास!!

‘च्यामारी!’ राजियांच्या मुखातून अस्फुट उद्गार निघाले. पुढील उद्गार ऐकले असते तर गोवाहातीहून आलेला जासूद कानात बोळे घालुनु पुनश्च गोवाहातीस रवाना जाहला असता. राजेसाहेब गालातल्या गालात हसले. खरे तर त्यांना खूप मोठ्यांदा हसायचे होते. परंतु, त्यांनी मुद्रा गंभीर ठेविली. मनाशी म्हणाले,‘ है शाब्बास! हे तर भोंग्यापेक्षा भारी काम झालं!’

‘उदईक येणे, विचार करोन उत्तर दिल्हे जाईल’ ऐसे सांगोन त्यांनी जासुदास फुटविले. त्यास दादरचा सुप्रसिध्द वडापाव खिलवण्याची आज्ञा मुदपाकखान्यास दिली, आणि आपल्या अत्यंत आवडीच्या आरामखुर्चीत रेलून बसत ते विचारात बुडाले…

निष्कांचनावस्थेत हिंडणाऱ्यास रस्त्यात लॉटरीचे तिकिट मिळावे, आणि नंतर बंपर आकडा लागावा!

बाजारात मेथीची जुडी घेतल्यावर सुट्टे पैसे परत करण्याच्या नादात भाजीवाल्याने दहाच्या जागी शंभराची नोटच परत करावी! परसातले तण उपटता उपटता खजिन्याचा हंडाच मिळावा!!...तैसेच हे!!

मनाशीच हसत त्यांनी मान मागे टेकवून डोळे मिटले. कृतज्ञभावाने हात जोडोन ते म्हणाले, ‘आहे, आहे!

जगात देव आहे…बरं का!!’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com