ढिंग टांग : अंदाजपंचे...!

पावसाचा अंदाज चुकू शकतो. किंबहुना तो चुकावा म्हणूनच हवामानशास्त्राचा जन्म झाला असे म्हणता येईल.
Dhing Tang
Dhing TangSakal
Summary

पावसाचा अंदाज चुकू शकतो. किंबहुना तो चुकावा म्हणूनच हवामानशास्त्राचा जन्म झाला असे म्हणता येईल.

भारतीय हवामान विभाग, (मौसम भवन, लोधी रोड, नवी दिल्ली) यांसी, कृतानेक नमस्कार. गेल्या आठवड्यात आपल्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या हवामान अंदाजांमुळे आनंदाचे भरते आले होते, त्यावर नुकतेच विरजण पडले. पाऊस केरळात पोचला असून लौकरच तो कोकणात आणि उर्वरित महाराष्ट्रात यथास्थित कोसळेल, असा प्राथमिक अंदाज हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आला होता. त्यामुळे हातातली विडी टाकून भारतातील तमाम शेतकरी बांधवांनी नांगर, कोयते हातात घेऊन शेताची वाट धरली होती. पण त्यानंतर ‘स्कायमेट’ या खाजगी संस्थेने ‘पाऊस अजून केरळात आलाच नाही, कोकणात कुठून पडेल?’ असे जाहीर केल्याने बऱ्याच लोकांनी पुन्हा हातात विडी पकडली! नेमकी काय भानगड आहे, हे कळेल का?

पावसाचा अंदाज चुकू शकतो. किंबहुना तो चुकावा म्हणूनच हवामानशास्त्राचा जन्म झाला असे म्हणता येईल. (जसे हमखास चुकीचे अंदाज सांगणारे निवडणूक अंदाजशास्त्र!) जेव्हापासून मानवाने अवकाशात उपग्रह सोडून हवामानाची माहिती गोळा करायला सुरवात केली, त्यानंतर पावसाचे अंदाज साफ चुकू लागले. पूर्वीच्या काळी पाऊस होता, पण ‘एलनिनो’ वगैरे भानगडी नव्हत्या. (हे एलनिनो प्रकरण नेमके आहे तरी काय?) परिणामी अंदाज चुकायला काही स्कोपच नव्हता. पूर्वीच्या काळी नंदीबैल ‘बुगुबुगुबुगु’ अशी मान हलवत अचूक अंदाज सांगत असे. त्याच्यावर विश्वास ठेवून शेतकरी आपल्या कामाला लागत असत. काही लोक कावळीचे घरटे किती उंचीवर बांधले आहे, हे पाहून पावसाचा अंदाज अचूकपणे वर्तवण्यात तरबेज होते. हल्ली कावळे बेकायदा वस्ती वाटेल तिथे करतात, असे आढळून आले आहे! त्यामुळे उंचीचा अंदाज येत नाही. (आमच्या) कोकणात कौल लावूनही पावसाच्या आगमनाची वर्दी मिळवता येण्याची सोय होती. एकंदरित पाऊसपाणी टायमावर होत होते. पण हल्ली, हवामानखात्याचे अंदाज ‘अच्छे दिनां’सारखे झाले आहेत. ‘आनेवाले है’, म्हणतात पण येत नाहीत!!

भारतीय हवामान खात्याने गेल्या आठवड्यात केरळापर्यंत मान्सून पोचला असून आता तयारीला लागावे, औंदा चांगला १०३ टक्के पाऊस पडणार आहे. धरणेबिरणे भरतील, वीजबीज चिक्कार तयार करता येईल, आणि शहरभागात सुट्याबिट्यासुद्धा घेता येतील, असे सर्वसाधारण भाकित केले होते. मनाला बरे वाटले! कारण त्याआधी काही दिवस, महाराष्ट्राच्या पर्यावरणमंत्र्यांनी मुंबईत भारतमाता परिसरात यंदा पाणी तुंबणार नाही, अशी ग्वाही दिली होती. त्यामुळे मुंबईकरच नव्हे, तर साऱ्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले होते. भारतमाता परिसरात तीन-चार कुत्री खांबाच्या दिशेने गेली तरी पाणी तुंबण्यासाठी तेवढे कारण पुरेसे होते. अशा भारतमाता परिसरात यंदा पाणी तुंबणार नाही, याचा अर्थ अवर्षण असा होत नाही काय?

‘स्कायमेट’ या खाजगी संस्थेने मात्र हवामान खात्याचे अंदाज खोटे ठरवले आहेत. मान्सूनचे ढग अजून केरळात पोचलेच नाहीत, असा गौप्यस्फोट त्यांनी केला. त्यावर पावसाचे ढग केरळात ‘ऑलमोस्ट’ पोचले होते, पण समोरुन कुणीतरी नकोसे आल्याने त्यांनी फूटपाथ बदलला, असा खुलासा हवामानखात्याने प्रसिद्ध केला. आणखी काही दिवसांनी ‘पाऊस ऑलरेडी आलेला आहे, परंतु, तो जमिनीच्या दिशेने न

पडता, उलटा आभाळात उडत असल्याचे’ जाहीर केले जाईल, अशी भीती आम्हाला वाटते. कृपया हवामान खात्याने आपल्या इच्छा न सांगता, थेट अंदाज सांगावेत, ही कळकळीची विनंती. आपला.

पावसाची वाट पाहणारा एक सामान्य नागरिक.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com