
काही दिवसांपूर्वी मराठी भाषा गौरव दिवस होऊन गेला. तेव्हापासून आम्ही त्याच रंगात रंगलो आहो. माणसाने दिसामाजी काहीतरी वाचीत राहिले पाहिजे.
ढिंग टांग : याचक आणि वाचक!
काही दिवसांपूर्वी मराठी भाषा गौरव दिवस होऊन गेला. तेव्हापासून आम्ही त्याच रंगात रंगलो आहो. माणसाने दिसामाजी काहीतरी वाचीत राहिले पाहिजे. आयुष्यात काही वाचलेच नाही तर ही मनुष्यजाती काही वाचणार नाही, हे आम्हाला तंतोतंत पटले आहे.
आमचे परमप्रिय नेते मा. साहेबांची मुलाखत आम्ही ऐकली, आणि जीवनातील वाचनाचे महत्त्व आम्हाला पटले. नेहमीप्रमाणे भक्तिभावाने ओथंबून आम्ही थेट मा. साहेबांचे भेटीसाठी शिवाजी पार्कावर गेलो…
‘शिवतीर्थ’ हा नामफलक पाहून (दबकत)आत शिरलो. परंतु, निमिषभरातच बाहेर आलो. गोंधळलेल्या मनःस्थितीत इमारतीकडे बघत असताना रखवालदाराने शुद्ध महाराष्ट्री बाण्याने विचारले, ‘‘क्या मंगता है?’’ आम्ही नवनिर्माणाच्या घोषणा देऊन हेतू जाहीर केला. आम्ही योग्य पत्त्यावरच आल्याचे त्याने मान्य केले.
‘‘हमको लगा की यह लायब्ररी है!’’ आम्ही अचंब्याने म्हणालो. तेवढ्यात वरच्या मजल्यावरुन दरडावणीच्या सुरात विचारणा झाली. – ‘‘कोण आहे रे तिकडे?’’
आम्हाला तात्काळ उचलून ‘वर’ नेण्यात आले! तेथे साक्षात साहेब वीरमुद्रेत उभे होते. त्यांनी विचारले, ‘‘तुम्ही कोण?’’ आम्ही विनम्रपणे सांगितले की, साहेब, मी तुमच्या दारी आलेला साधासुधा याचक आहे!’’
‘‘अस्सं? काय वाचता?’’ साहेबांनी संशयाने विचारले. आमच्या वाक्याचा नेम चुकून दुसरीच काच फुटल्याचे आमच्या ध्यानी आले. आम्ही म्हणालो होतो, याचक आणि साहेब समजले वाचक ! झाली ना पंचाईत?
‘‘काही नाही!’’ आम्ही खोल आवाजात म्हणालो. हल्ली आम्ही ब्यांकेचे पासबुकदेखील वाचू शकत नाही, हे दुर्दैव साहेबांना कसे सांगणार? माणसाने वाचायला हवे, हे खरे आहे, पण काय वाचायला हवे, हेदेखील कळायला हवे ना?
‘‘लाज नाही वाटत? काही नाही वाचत म्हंजे काय? हे काय वागणं झालं? अशानं तुमचं नवनिर्माण कसं होणार, आँ?’’ साहेब कडाडले. त्यांचे म्हणणे योग्यच होते. पनवेलला झालेल्या मुलाखतीत महाराष्ट्रात वाचन संस्कृती वाढली पाहिजे हीच आग्रही भूमिका त्यांनी मांडली होती. साहेब स्वत: अखंड वाचतात. पुस्तके वाचतातच, पण चेहरे जास्त वाचतात!
(डिस्क्लेमर : चेहरे वाचणे तसे आपल्यासारख्या सामान्य जीवजंतुंना जबर महागात जाऊ शकते. मुंबईत आम्ही शिवाजी पार्क मैदानात सायंकाळच्या वेळेस चेहरे वाचत हिंडत होतो. काही चेहरे सुंदर दिसल्याने आणखी जवळून वाचण्याचा प्रयत्न केल्याने मार खायची पाळी आली!! ) असो.
‘‘महाराष्ट्रात वाचन संस्कृती काहीही करुन वाढवावी, ही एक याचक म्हणून आमची प्रार्थना आहे, साहेब!’’ आम्ही म्हणालो. आमच्या याचनेचा योग्य परिणाम झाला असावा. कारण साहेबांचा चेहरा एखाद्या पुस्तकाच्या कव्हरासारखा गुळगुळीत झाला.
‘‘आमचंही तेच म्हणणं आहे. वाचनात व्यत्यय नको म्हणूनच आम्ही ते भोंगे बंद केले!,’’
साहेब म्हणाले. आम्ही जवळजवळ ‘थँक्यू’ म्हणायच्या बेतातच होतो. तेवढ्यात पुढे ते म्हणाले, ‘‘दुकानाच्या पाट्या मराठीत लावायला सांगितलं, तेही वाचनसंस्कृती वाढावी म्हणूनच नं?’’
‘‘पण..पण…तरुण पिढी मोबाइल फोनमध्ये हरवून गेली आहे, अजिबात वाचत नाही...,’’
आम्ही तक्रार गुदरली. ती ऐकून साहेबांचे पित्त बऱ्यापैकी खवळले असावे! धुमसत्या ज्वालामुखीप्रमाणे श्वासोच्छ्वास सोडत त्यांनी एक भिवई वर चढवली, आणि तांतडीने नवा आदेश जारी करण्याचे फर्मान आपल्या शिलेदारांना सोडले…
‘‘वाचन संस्कृती वाढलीच पाहिजे. सरकारला हे काम जमलं नाही तर आम्ही आमच्या स्टाइलनं वाचन संस्कृती वाढवू! मग आम्हाला बोल लावू नका! जय महाराष्ट्र!!’’
…आम्ही घरी येऊन तातडीने हाताला लागेल ते पुस्तक उघडून बसलो आहो! अहो, वाचाल तर वाचाल!!