ढिंग टांग : आयेगा आनेवाला...!

प्रिय मित्रवर्य मा. एकनाथाजी यांसी शतप्रतिशत प्रणाम. आपल्यासारखा शूरवीर तलवारबाज मी आजवर पाहिला नव्हता.
Dhing Tang
Dhing TangSakal
Summary

प्रिय मित्रवर्य मा. एकनाथाजी यांसी शतप्रतिशत प्रणाम. आपल्यासारखा शूरवीर तलवारबाज मी आजवर पाहिला नव्हता.

प्रिय मित्रवर्य मा. एकनाथाजी यांसी शतप्रतिशत प्रणाम. आपल्यासारखा शूरवीर तलवारबाज मी आजवर पाहिला नव्हता. आपल्या पराक्रमाने माझे डोळे अक्षरश: दिपून गेले आहेत. (पुढल्या वेळेला प्रत्यक्ष भेटू, तेव्हा माझ्या डोळ्यावरचा गॉगल पाहून आश्चर्य वाटून घेऊ नका!) शत्रू आमचा, पण मर्दुमकीने लढलात तुम्ही. तुस्सी ग्रेट हो!!

सध्या तुमचे पर्यटन चालू आहे. मजाय! मुंबई ते सुरत, सुरत ते गुवाहाटी, गुवाहाटी ते गोवा आणि गोव्याहून मुंबई! ही एक पोलिटिकल चारधाम यात्राच म्हटली पाहिजे. गुवाहाटीतला तुमचा मुक्काम मजेचा झाला, ही खुशाली कळली. झाडी, डोंगर, हॉटेल सगळे पाहूनच तुमची तेथे व्यवस्था करण्यात आली होती. आता तिथून गोव्यात, म्हंजे समुद्र किनारा. तिथे म्हंजे काय तर...काय समुद्र, काय मासे, काय हाटेल, असे म्हणावे लागणार. तुमचे हे पर्यटन पाहून आमच्या पक्षातले काही लोक जळले. आमच्या काही आमदारांनी मला भेटून गळ घातली की, ‘आम्हालाही न्या ना कुठेतरी! सगळे कुठे कुठे जातात, आम्ही आपले इकडेच!’ त्यांना गोरेगावला नेऊन आणण्याचे वचन दिले आहे. असो.

सगळे काही ठरल्याप्रमाणे होईल, असं मी तुम्हाला वचन देतो. आपले कुठलेही बोलणे बंद दाराआड झालेले नाही, हे लक्षात ठेवावे. (फोनवर झाले आहे.) तुम्ही मुंबईत परतलात की बाकीचे ठरवू. तोवर ‘आमचं ठरलंय’ एवढेच माध्यमांना सांगायचे. कळले ना? गेले तीन दिवस मी ‘आयेगा आनेवाला’ हे गाणे गुणगुणत तुमची वाट पाहातो आहे. भेटीअंती बोलूच. तुम्हाला भेटण्यासाठी अत्यंत आतुर.

तुमचा नवा जीवश्चकंठश्च नानासाहेब फ.

ता. क. : तुम्ही परत आल्यानंतर मी पुन्हा येणार आहे, हे लक्षात आहे ना? नाही, फक्त आठवण करुन दिली इतकेच!

मा. नानासाहेब यांसी जय महाराष्ट्र.

गुवाहाटीतला मुक्काम चांगला झाला. विश्रांतीला वेळ भरपूर मिळाला. गुवाहाटीत करायचे काय, असा प्रश्न होता. झाडी, डोंगर, हाटेल वगैरे ठीक आहे, पण आम्ही काही हाटेलबाहेर फारसे गेलो नाही. आमचे सहकारी पत्ते पिसत बसायचे. गड्डा झब्बू हा पत्त्यांचा नवा खेळ मी इथे शिकलो! ‘च्यालेंज’ हा खेळ मला येत होता. त्यात मी पहिल्यापासूनच एक्सपर्ट आहे. जाऊ दे.

तुमच्या पक्षातले लोक घरात बसून कंटाळले आहेत, तर आमच्या पार्टीतले लोक पर्यटनाला कंटाळले आहेत. आता इथून गोव्याला जायचे, असे सांगितल्यावर काहींनी चक्क तोंड वाकडे केले. गोव्याला जाताना कुणी असे करते का? अजून परतीची तिकिटे कन्फर्म झाली नाहीत, वेटिंग लिस्ट मोठी आहे, अशी कारणे देऊन आजवर थोपवले होते.

उद्या सकाळी गोव्याहून निघून मुंबईला येणार आहे. बहुधा पहाटेच मुंबईला येणे बरे पडेल असे वाटते. (उशीरा आलो तर वाईट ‘पडेल’ अशीही भीती आहेच.) मुंबईत आल्यानंतर भेट होईलच. पुढले सगळे नीट ठरवून घेतलेले बरे. भेटूच. हम आएंगे, और जरुर आएंगे, लेकिन वक्त भी हमारा होगा, गोली भी हमारी होगी, और बंदूक भी हमारी होगी! जय महाराष्ट्र.

आपला नम्र एकनाथाजी. (भावी उपमुख्यमंत्री म्हणू का?)

ता. क. : मी येईपर्यंत कृपया कळ काढावी, मी येण्याच्या आत शपथविधी उरकून घेऊ नये, ही विनंती. मी पहाटेच येतो आहे! ए. शि.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com