ढिंग टांग : ऐसपैस विस्तार...!

सर्वप्रथम हे कबूल केले पाहिजे की आम्ही अंतर्बाह्य भक्तसंप्रदायी आहो! गेली नऊ वर्षे आम्ही या भक्तिरसात न्हाऊन निघालो असून कोणीही कितीही हिणवले तरी आमच्यावर ढिम्म परिणाम होणार नाही.
Dhing Tang
Dhing Tangsakal
Summary

सर्वप्रथम हे कबूल केले पाहिजे की आम्ही अंतर्बाह्य भक्तसंप्रदायी आहो! गेली नऊ वर्षे आम्ही या भक्तिरसात न्हाऊन निघालो असून कोणीही कितीही हिणवले तरी आमच्यावर ढिम्म परिणाम होणार नाही.

सर्वप्रथम हे कबूल केले पाहिजे की आम्ही अंतर्बाह्य भक्तसंप्रदायी आहो! गेली नऊ वर्षे आम्ही या भक्तिरसात न्हाऊन निघालो असून कोणीही कितीही हिणवले तरी आमच्यावर ढिम्म परिणाम होणार नाही. किंबहुना कुणी आम्हाला भर चौकात ‘अहो, भक्त’ अशी हांक मारली, तरी आम्ही नीडरपणे (मागे वळून) ‘ओ’ देतो. पायातली चप्पल तुटली तरी खांदा वांकडा करुन म्हणतो की, झुकेगा नहीं...!!

राजधानी दिल्लीत आमच्या पक्षाच्या मुख्यालयातील जागा कमी पडत असल्याने त्या पवित्र वास्तूचा विस्तार करण्याची योजना कार्यान्वित झाली. तिच्या शिलान्यासाच्या समारोहाला आम्ही जातीने उपस्थित होतो. ‘देश प्रथम, फिर दल, अंत में स्वयं...’ हेच आमचे ब्रीदवाक्य आहे, हे वेगळे सांगावयास नको. विस्तारित इमारतीमध्ये साध्यासुध्या कार्यकर्त्यांच्या निवासासाठी खोल्या बांधण्यात येणार असून त्या उदात्त कामासाठी ‘बांधकामशास्त्राचे प्रशिक्षणार्थी हवे आहेत’ असे कळले. आम्हाला बांबूच्या पराच्यांवर महिनोनमहिने बसून राहण्याची आदत आहे. खेरीज शिमिटाची घमेली वरखाली करणे, हा आमच्या डाव्या हाताचा मळ! अतएव आम्ही विस्तार कार्यक्रमाच्या ‘साइट’वर हाजिर झालो.

परम वंदनीय प्रात:स्मरणीय श्रीश्री नमोजी यांच्या नेतृत्त्वाखाली गेल्या नऊ वर्षात आमचा पक्ष ज्या वेगाने पसरला, तो विस्तार कुठल्याही दगडविटांच्या इमारतीत मावेल, असा नाही. हे जाणवून, स्लॅबच्या बीममध्ये शिमिट-काँक्रिट ओतल्याप्रमाणे आमचा ऊर भरुन आला! समारंभाच्या ठिकाणी एका (आडव्या) बांबूवर बरीशी जागा बघण्याच्या खटपटीत होतो, तेव्हाच साक्षात श्रीश्री नमोजी स्वत: सामोरे आले. काय ते तेज:पुंज व्यक्तिमत्त्व! काय ते प्रेरणादायक दर्शन! आम्ही नमोभावे नमस्कार केला.

‘केम छो?’ त्यांनी मायेने विचारले. आम्ही (आडव्या) बांबूवर उभे! ‘सारु छे’ असे उत्तर देणार होतो, पण दिले नाही.

‘शुं काम च्याले?’ त्यांनी विचारले. आम्ही ‘एक्स्टेंन्शन’ असे उत्तर दिले. त्यावर त्यांनी समाधान व्यक्त केले. आहे ती जागा हल्ली जाम कमी पडत असून देशभरात साडेआठशे जिल्ह्याच्या ठिकाणी पक्ष मुख्यालये उभारली जात आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. आम्ही खुश झालो. (तेवढीच हाजिरी भेटणार! कार्यकर्त्याला काय, हाताला काम पाहिजे!)

आम्हाला बांबूधिष्ठित अवस्थेत ठेवूनच श्रीश्री नमोजी सांगू लागले : ‘जुओ, कार्यकर्ता हाच पक्षाचा आत्मा असतो. कछु सांभळ्यो? कार्यकर्ता कधी थकत नाही, झुकत नाही! (शिकतही नाही, असे यमक आम्ही जुळवत आणले होते, पण म्हटले जाऊ दे.) कार्यकर्ता अहोरात्र काम करत असतो. कार्यकर्त्याला कसला मोह नसतो. सतत निर्ममपणे काम करणे, हीच कार्यकर्त्याची नियती असते. कार्यकर्त्याला भ्रष्टाचाराची चीड असते. कार्यकर्त्याला बघून भ्रष्टाचार पळून जातो. किंवा एकवटून कार्यकर्त्यालाच घेरण्याचा प्रयत्न करतो. पण कार्यकर्ता का कोणाचे ऐकतो?’...

यावर आम्ही अर्थातच ‘नाही नाही’ अशी मानगूट हलवली.

ते पुढे म्हणाले : ‘आज आपल्या पक्षाचा जगभर डांगोरा पिटला जात आहे. साऱ्या जगात आपल्या कार्यकर्त्याचा लौकिक पसरला आहे. देशातही बहुतेक राज्यांमध्ये आपल्या कार्यकर्त्याकडे मोठ्या आशेने पाहिले जाते. हे सारं कोणामुळे झालं?’

‘आपल्यामुळेच!’ आम्ही तात्काळ म्हणालो. श्रीश्री नमोजींनी आमच्याकडे एकवार कृपाळूपणाने पाहिले. आमची कुडी धन्य जाहली. सामान्य कार्यकर्त्याचा ते किती सन्मान करतात, अं? केवढं हे आपलं गुणवर्णन अं?

शेजारच्या बांबूवर बसलेल्या बिहारी कार्यकर्त्याने पिंक टाकली, आणि म्हणाला, ‘‘अरे बुडबक, वो तुम्हारा नहीं, खुदका ही वर्णन कर रहे थे!’ ...तरीही आमच्या मनातील भक्तीच्या साठ्यात घमेलेभर वाढच झाली आहे!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com