ढिंग टांग : जिवा शिवाची बैल जोडंऽऽ…

नमो नम: नमो नम: नमो नम: नमो नम: (१०८ वेळा लिहिणे.) मला बैल हा प्राणी आवडतो. माझा देश हा कृषिप्रधान देश असल्याने बैलाबद्दल भक्तिभाव मनात असणे स्वाभाविकच आहे.
Dhing Tang
Dhing TangSakal
Summary

नमो नम: नमो नम: नमो नम: नमो नम: (१०८ वेळा लिहिणे.) मला बैल हा प्राणी आवडतो. माझा देश हा कृषिप्रधान देश असल्याने बैलाबद्दल भक्तिभाव मनात असणे स्वाभाविकच आहे.

आजची तिथी : श्रीशके १९४४ ज्येष्ठ शुध्द तृतीया.

आजचा वार : नमोवार…याने की ‘गुरु’वार!

आजचा सुविचार : जिवा शिवाची बैलं जोडंऽऽ लावली पैजंला आपली पुढंऽऽऽ….हाऽऽऽ…

नमो नम: नमो नम: नमो नम: नमो नम: (१०८ वेळा लिहिणे.) मला बैल हा प्राणी आवडतो. माझा देश हा कृषिप्रधान देश असल्याने बैलाबद्दल भक्तिभाव मनात असणे स्वाभाविकच आहे. पण मी शेतकरी नाही, वकील आहे. (तोही नागपूरचा!) तरीही मला बैल आवडतो. शाळेमध्ये असताना मी ‘माझा आवडता प्राणी’ या विषयावर निबंध लिहिला होता, त्यात बैलांचेच गुणगान होते. जिवा-शिवाची बैल जोडं, लावली पैजंला आपली पुढं…डौल मोराच्या मानंचा रं डौल मानंचा…’ हे ‘तांबडी माती’ चित्रपटातले गाणे माझे आवडते आहे. आमच्या नागपुरात बैल नव्हते. मी वकिली शिकायला कॉलेजात गेलो, तेव्हा पहिल्यांदा बैल नीट पाहिला…असो.

परवा पिंपरी-चिंचवडनजीक चिखलीच्या माळरानावर बैलगाडा शर्यतीला गेलो होतो. तिथे अनेक बैल होते. मी खुश झालो. जगातली सर्वात मोठी बैलगाडा शर्यत येथे भरते. शर्यतीचे आयोजक आणि आमचे परममित्र आमदार महेशजी लांडगे यांनी गेल्या गेल्या पिवळा कुडता, फेटा वगैरे पोशाख दिला. म्हणाले, ‘‘ तुम्ही आमचे नेते! हा पोशाख परिधान करा. बैलगाडा शर्यतीचा शुभारंभ करा!!’

‘म्हंजे मी बैलगाडा चालवू की काय?’ मी घाबरुन विचारले. काही महिन्यांपूर्वी मावळ भागात खासदार अमोल कोल्हेंनी बैलगाडा शर्यतीच्या वेळी दोन्ही हात सोडून घोडेस्वारी करुन दाखवली होती. खा. कोल्हे काय, घोड्याच्या पाठीवर उभेदेखील राहून दाखवू शकतील. पण मी? छे!! शर्यतीच्या ठिकाणी वातावरण उत्फुल्ल होते. ‘आपल्या शर्यती पुन्हा सुरु करुन देणारे मालक’ अशी ओळख बैलवर्ग एकमेकांना (शिंगाने) करुन देत होता. एक बैल तर चक्क ‘थँक्यू’ असे हंबरला. शुभारंभाला मी नेहमीप्रमाणे अप्रतिम भाषण केले. हे भाषण सध्या माध्यमांमध्ये गाजते आहे. ‘‘बैल कधी एकटा येत नाय, जोडीनंच येतो…नांगरासकट येतो!’ हा ‘मुळशी पॅटर्न’ चित्रपटातला डायलॉग तेव्हा वेळेत आठवला, म्हणून बरे झाले. आठवला, म्हणून बोलून टाकला, एवढेच! पण त्यावर केवढे रामायण सुरु आहे. कुणाला वाटले की हा मी महाविकास आघाडीलाच इशारा दिला. कुणाला वाटले की मी आमच्याच पक्षातल्या काही नेत्यांना धमकी दिली. कुणाला वाटले की बैलगाडा शर्यतीला विरोध करणाऱ्यांना मी दम भरला!! वास्तविक यातले काहीच माझ्या मनात नव्हते. पण तरीही, गेले दोन दिवस हा डायलॉग जणू माझाच आहे, आणि तो पोलिटिकल आहे, असे समजून उलटसुलट चर्चा सुरु आहे.

कालच आमचे परममित्र आणि कमळाध्यक्ष मा. चंदूदादा कोल्हापूरकर घाईघाईने येऊन गेले. म्हणाले, ‘तो बैलाचा डायलॉग नेमका कोणाला मारलात? मला फोन येताहेत!’

‘कुणालाच नाही…डायलॉग आठवला, म्हणून बोललो!’ मी.

‘फार अर्थपूर्ण आहे हा डायलॉग!,’ चष्मा पुसत चंदूदादा म्हणाले.

‘बैल एकटा कधी येत नाही, जोडीनं येतो, आणि नांगरासकट येतो’ यात कसला आलाय अर्थ, दादा!,’ मी उडवून लावले.

‘बैल जोडीनं नाही, कधी कधी तिकडीनंही येतो, आणि जातो तेव्हा नांगरासकट जातो, हे दोन्ही अनुभव आपण घेतलेत…नाही?,’ दादा म्हणाले. मी विचारात पडलो. खरंच हा डायलॉग फार पोलिटिकल आहे!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com