ढिंग टांग : पर्दे के पीछे...! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dhing Tang
ढिंग टांग : पर्दे के पीछे...!

ढिंग टांग : पर्दे के पीछे...!

नेमके सांगावयाचे तर वैशाख शुध्द तृतीयेचा दिवस. टळटळीत दुपार होती. उन्ह रणरणत होते. शिवाजी पार्काडाचे मध्यभागी दिमाखाने उभ्या असलेल्या ‘शिवतीर्थ’ महालास हळूहळू जाग येत होती. महालाच्या बालेकिल्ल्यातून अचानक इशारतीचा भोंगा वाजला. ‘‘होश्शियाऽऽर!’’

सारी नवनिर्माणाची शिबंदी खडबडोन जागी झाली. फारा दिसांनी खुदबखुद राजेसाहेब मोहीमशीर होत असल्याने शिबंदीमध्ये उत्साहाचे वारे पसरले होते. आता महाराष्ट्राच्या दऱ्याखोऱ्यांत पुन्हा एकवार नवनिर्माणाचे वारे घोंघावणार, या कल्पनेने सारेच सुखावले होते. घोड्यांना चंदीचारा देवोन जय्यत तयार ठेवण्यात येत होते. राजेसाहेबांच्या खड्गाचे टोंक जी दिशा दाखवील, तेथे चौटाप, चौखूर उधळायचे, हाच खासा बेत होता. पण- इतिहासपुरुष चिंताग्रस्त होता, अस्वस्थ होता, बेचैन होता. महाराष्ट्राच्या दौलतीसमोर काय वाढोन ठेविले आहे? या सवालाची जळू इतिहासपुरुषाचें देहाला चिकटोन रुधिर प्राशन करोन तट्ट फुगली होती. कोठल्या क्षणी कोठला राजकीय भोंगा वाजेल, आणि कोठल्या आवाजाने गगनमंडळ भेदोन जाईल, याची त्यास काहीच कल्पना नव्हती. नियतीच्या मनात आहे तरी काय?

इतिहासपुरुष बेसावध नव्हता. येणारा हरेक प्रसंग टिपोन घेण्याच्या मिषाने त्याने दऊत- टांक आणि कागुद तय्यार ठेविला होता. इतक्यात ‘शिवतीर्था’वर काही हालचाल दिसो लागली. इतिहासपुरुष खडबडोन जागा जाहला. परवाच्या दिशी साक्षात राजेसाहेबांचे अंगारयुक्त भाषण टिपोन घेताना शेवटल्या दहा मिनिटांत राजियांनी चढा सूर लाविला, आणि त्याने दचकलेल्या इतिहास पुरुषाला धक्का बसून त्याच्या मेजावरील शाईची दऊत सांडिली. सारा ऐतिहासिक दस्तऐवज काळ्या डागाने नष्ट जाहला….पुन्हा ऐसा अपघात होणे नाही.

अचानक एक काळा वेषधारी व्यक्ती संशयास्पद हालचाल करत शिवतीर्थाच्या आसपास चालताना इतिहासपुरुषाला (वरुन) दुर्बिणीतून दिसली. लपत छपत ती व्यक्ती थेट मागल्या दाराने आत शिरली. इतिहास पुरुषाने कान टवकार्ले.

‘उस डोंगा परि रस नव्हे डोंगा, काय वाजविसी लेका मोठा भोंगा’’ त्या व्यक्तीने परवलीचे वाक्य उच्चारिताच शिवतीर्थाचे गेट उघडले. त्याची थेट खलबतखान्यात रवानगी झाली.

कोण असेल ही व्यक्ती? आवाज तर फडणवीसनानांचा वाटतो आहे, पण चालण्याची ढब शेलारमामांसारखी. बोलण्याचा अंदाज चंदूदादा कोल्हापूरकरांचा, आणि इरादा सरदार सोमय्यांसारखा अति आक्रमक!! हा सर्व गुणसमुच्चय एकाच ठिकाणी असलेली ही गूढ व्यक्ती कोण असेल बरं, अं? इतिहासपुरुष बुचकळ्यात पडला….

‘कोणी तुम्हांस पाहियले नाही ना?’ खुद्द राजेसाहेब (पलित्याच्या प्रकाशात) गंभीर आवाजात विचारत होते. त्या व्यक़्तीने नकारार्थी मान हलवली.

‘छे, डझनभर मीडियावाले सोडले, तर बाकी कुणीही नाही!’ व्यक्तीने निर्धास्त केले. ‘ठीक! आपली हातमिळवणी गनिमाला कळता उपयोगाची नाही. सारी मसलत फसेल!,’

राजेसाहेब धोरणीपणाने म्हणाले.

‘बिलकुल कळायची नाही. अगदी या कानाचे त्या कानाला, ज्याला कळेल, त्याच्यामागे इडी लावू!’ ती व्यक्ती आक्रमक अंदाजात म्हणाली.

‘मी थोरल्या काकांकडे तोफखान्याची तोंडे वळवतो, तुम्ही बांदऱ्याच्या कलानगरात सुल्तानढवा करा! काय?,’ राजियांनी मसलतीचा पुनरुच्चार केला. वास्तविक ही आयडिया त्यांना गेल्या टायमाला गनिमाच्या लोकांनीच सुचवली होती. परंतु, हळूहळू ही आख्खी मसलत आपलीच आहे, असे राजियांना वाटू लागले होते.

त्या व्यक्तीने प्रेमभराने राजियांचा हात हातीं घेतला. अधीरतेने म्हणाली, ‘‘राजेसाहेब, आता पहाटे उठायची सवय करत चला, शपथविधीसाठी तीच वेळ योग्य असते..!’ राजे एकदम गंभीर झाले. इति.

Web Title: Editorial Article Dhing Tang British Nandi 4th May 2022

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top