ढिंग टांग : नवे बंधन, नवी निष्ठा! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dhing Tang

सर्व पक्ष सहकाऱ्यांसाठी (जे कोणी उरले असतील ते-) अत्यंत महत्त्वाचे आणि तातडीचे. काय लिहू? काय सांगू? सांगण्यासारखं काही उरलेलंच नाही.

ढिंग टांग : नवे बंधन, नवी निष्ठा!

सर्व पक्ष सहकाऱ्यांसाठी (जे कोणी उरले असतील ते-) अत्यंत महत्त्वाचे आणि तातडीचे. काय लिहू? काय सांगू? सांगण्यासारखं काही उरलेलंच नाही. शब्दच संपले. (पळून गेले!) एखाद्या लेखकाला कधी कधी काही सुचेनासे होते. त्याला ‘रायटर्स ब्लॉक’ म्हंटात. मला ‘पोलिटिकल ब्लॉक’ आला आहे. हल्ली कुणी भेटायला आले तरी नकोसे वाटते. भेटून काय उपयोग? काल एका पक्षनेत्याने फोन केला.

म्हणाला, ‘‘साहेब, जय महाराष्ट्र!’’ माझ्या पोटात गोळाच आला. याने का फोन केला असेल?

‘तुम्हीसुद्धा का?’ मी हताशेने विचारले. तो पक्षनेता गडबडून म्हणाला, ‘‘ छे, छे, गुडमॉर्निंग करायला फोन केला, साहेब. मी आहे…अजून!,’’ मी ‘थँक्यू’ म्हटलं. ‘‘या कधीही बंगल्यावर, दारं उघडीच आहेत तुमच्यासाठी!’ असे मी म्हणताच, त्याला हुंदका आवरेना. पण दुसऱ्या दिवशी पाहातो तो काय, तोच पक्षनेता सुळकन पळाला! जाऊ दे.

हल्ली कोणीही भेटायला आले तर निरोप घ्यायला आलेत की खुशाली विचारायला, हेच कळत नाही. मी कोणालाही थांबवत नाही. जायचंय त्यानं जावं. जिथं वाटतं तिथं जावं! सुरत, गुवाहाटी, गोवा, अहमदाबाद, उटी, दार्जिलिंग कुठेही जा. मी आधीच सांगितलं होतं की, माझ्या प्रेमात अडकून पडू नका! ‘मुझे तुमसे कुछ भी ना चाहिए, मुझे मेरे हाल पे छोड दो’ या गीतपंक्ती गेले काही दिवस माझ्या मनात रुंजी घालत आहेत. या फिल्मी गीतपंक्ती नव्हेत, तर माझ्या मनाची स्थितीच सांगणाऱ्या ‘अ-क्षरओळी’ आहेत.

माझ्या (आतापर्यंतच्या) मावळ्यांनो, माझ्या (आणि तुमच्याही) मनगटाला एक धागा आहे. तो साधासुधा नाही. तो प्रेमाचा रेशमाचा बंध आहे. ‘एक धागा सुखाचा, शंभर धागे दु:खाचे’. माझ्या मनगटावरचा धागा (अडीच वर्षे) सुखाचा ठरला, पण त्याच काळात इतर चाळीस जणांच्या मनगटावर असलेले धागे दु:खाचे आहेत, हे मला शेवटपर्यंत कळले नाही. मनगटाला धागे बांधलेले आपले सहकारी आज एकनिष्ठेच्या आणाभाका घेतात. जाहीररित्या अश्रू ढाळतात. आणि दोन दिवसांनी गनिमाच्या गोटात सामील होतात. हे काय चालले आहे? काळ मोठा कठीण आला. दिवस गनिमाचा आहे, आणि रात्र वैऱ्याची आहे. आपण सारे प्राणपणाने किल्ला लढवत आहोत. आघाडीवरील शिबंदी एकतर जायबंदी झाली आहे, किंवा गनिमाच्या गोटाला सामील झाली आहे. प्रलयकाळच जणू अवतरला. गनिम शिरजोर झाला. मराठी माणसाची गळचेपी सर्वत्र चालू झाली आहे. पण आपण मर्द मावळ्यांची अवलाद आहोत, हे लक्षात ठेवा. फंदफितुरीला आणि भाऊबंदकीला पुरुन उरुन (किंवा उरुन पुरुन) आपण सारे टिकलो आहोत. हेही दिवस जातील!

यापुढे सर्व पक्षकार्यकर्त्यांनी मनगटावरील बंधनाशिवाय, शंभर रुपयांचे प्रतिज्ञापत्र करुन आपली पक्षनिष्ठा लेखी स्वरुपात द्यावी. तसेच काही पक्षनेत्यांच्या सदऱ्याला जीपीएस ट्रॅकर लावण्यात येणार आहे. काही नेत्यांना सदासर्वकाळ आपले लोकेशन पक्षकार्यालयाशी शेअर करावे लागेल. ज्यांच्या मतदारसंघात नेटवर्कच्या समस्या असतील, त्याने दर एक तासाने नजीकच्या शाखेत सकाळी व संध्याकाळी हजेरी देणे अनिवार्य राहील, याचीही नोंद घ्यावी.

उरल्यसुरल्या कार्यकर्त्यांना आमची सक्त विनंती (हो, विनंतीच!) आहे की, कुणीही आमच्या ‘मातोश्री’बाहेर गर्दी करो नये. आम्हाला बघवत नाही! कालही खूप गर्दी दिसली. आम्ही चौकशी केली असता कळले की, सदरील गर्दी ‘शिवभोजना’साठी जमली आहे!!

जय महाराष्ट्र.

Web Title: Editorial Article Dhing Tang British Nandi 5th July 2022

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..