ढिंग टांग : मिसन एकसोपात्रीस! (एक हृद्य वृत्तांत...)

सांप्रतकाळी बाप्पाच्या आगमनाप्रीत्यर्थ महाराष्ट्रातील वातावरण मंगलमय आहे. हवेत उत्साह आहे. लोक एकमेकांकडे बघून हसत आहेत.
Dhing Tang
Dhing TangSakal
Summary

सांप्रतकाळी बाप्पाच्या आगमनाप्रीत्यर्थ महाराष्ट्रातील वातावरण मंगलमय आहे. हवेत उत्साह आहे. लोक एकमेकांकडे बघून हसत आहेत.

सांप्रतकाळी बाप्पाच्या आगमनाप्रीत्यर्थ महाराष्ट्रातील वातावरण मंगलमय आहे. हवेत उत्साह आहे. लोक एकमेकांकडे बघून हसत आहेत. अशा परिस्थितीत पोलिटिकल बीटच्या एका पत्रकाराला मा. संपादकमहाशयांनी ‘मूड कॉपी’ देण्यास सांगितले. ‘नेहमीचं राजकारण नको, जरा खेळकर शैलीत लिहा’ असा आदेश दिला. पत्रकाराची मती कुंठित झाली आणि त्याने विघ्नहर्त्यास आवाहन केले. ‘बाप्पा, वाचीव’! सदरील वृत्तांत वानोळ्यादाखल :

भाद्रपदातील एका प्रसन्न सकाळी मुंबईच्या विमानतळावर एक विमान उतरले...विमानातून साक्षात माननीय मोटाभाई पायऱ्या मोजत जपून उतरले... त्यांच्या दर्शनाने पुनित झालेल्या मंडळींमध्ये मा. मुख्यमंत्री होते... त्यांनी हात जोडले... (खुलासा : इथे वाक्यावाक्यामध्ये तीन टिंबे आढळतील. ती मूड कॉपीची शैली आहे. तीन टिंबे रांगोळीसारखी टाकत गेले की शैलीदार लेखन होते, हा पूर्वापार गैरसमज आहे. असो.) मा. मोटाभाईंनी सह्याद्री अतिथीगृहात बैठक घेतली. बैठकीत चहा घेतला. चहात बिस्कुट घेतले...

‘गणेशोत्सवमां बोम्बेथी आवानुं...बहु सारु लागे. केटला अद्भुत अनुभव छे’ मा. मोटाभाई सद्रगदित कंठाने म्हणाले. (हेच वाक्य अनुवादित करुन ‘ट्विटर’वर टाकण्याचे ठरले.) यावर मा. मुख्यमंत्री कर्मवीर भाईसाहेब यांनी एकदा ‘हो’, एकदा ‘नाही’...मग जीभ चावून दोनदा ‘हो’ अशी मान डोलावली.

‘केम भाईभाई, बध्दा ठीक छे ने?’ मोटाभाईंनी चौकशी केली. ते सगळ्यांच्या नावांमागे ‘भाई’ लावूनच बोलतात. (उरलेल्यांच्या मागे इडी लावतात, असे काही टीकाकार म्हणतात. पण ते नतद्रष्ट आहेत. पुन्हा असो.) भाईसाहेबांच्या मागे काय लावावे, याचा विचार करत मोटाभाईंनी शेवटी त्यांना ‘भाईभाई’ असेच पुकारले.

‘लालबागच्या राजा’च्या दर्शनासाठी लाल दिव्यांच्या गाड्या निघाल्या. तेथील दर्शन आटोपून बांदऱ्याला शेलारमामांच्या घरी बाप्पाच्या दर्शनाला मोटाभाई गेले. तिथून थेट ‘मेघदूत’ बंगला! तेथे त्यांनी सर्व कार्यकर्ते- आमदारांना दर्शन दिले... बाप्पाच्या दर्शनातून मिळालेली एनर्जी त्यांनी तिथे कार्यकर्त्यांमध्ये ट्रान्सफर केल्याने ‘डीजे’ कुठाय?’ अशा चौकशा काही कार्यकर्त्यांनी केल्या... मग दर्शनसभा पार पडली... (खुलासा : पुन्हा तीन टिंबे आली! आमच्या अधिकारात आम्ही टिंबे रद्द करीत आहोत. टिंबे देत लिहिणाऱ्या शैलीदार पत्रकाराच्या टिंबावर टिंब टिंब देऊन ठेवावे, म्हणून आमचे हात शिवशिवताहेत. असो असो.)

‘ए वखत बीएमसी चूंटणीमां आपडे देडसो सीट जोईये!,’ मोटाभाईंनी आकडा फोडला. काही काळ सगळे निपचित पडले. गौरी- गणपतीचे दिवस! कांदा मागवण्याची सोय नव्हती. काहींनी पायताणे मागवली. थोड्या वेळाने सगळे भानावर आले.

‘डेडसो सीट? एकशेपस्तीस ठीक आहे,’ शेलारमामा कसेबसे म्हणाले. त्यांच्या घशाला कोरड पडली होती. टेबलावरचा तांब्या उचलत त्यांनी ‘बाप्पा, वाचीव’ असे उद्गार काढलेले काहींनी स्पष्ट ऐकले. एकशेपस्तीस तरी कसे आणणार, हे त्यांनाही बहुधा माहीत नव्हते!

‘मिनिमम एकसोपात्रीस...मेक्सिमम देडसो! ओक्के?,’ मोटाभाईंनी आऊटर लिमिटही सांगून टाकले.

एकशेपस्तीस की दीडशे? या आकड्यांबद्दल कार्यकर्त्यांच्या मनात थोडा संभ्रम निर्माण झाला. एकशेपस्तीस सीटांचे एकवेळ जमेल, पण दीडशे सीटांचे गणित जमणे थोडे अवघड वाटते, असे काही जणांचे मत पडले.

‘इसबार बीएमसीपर अपना परचम लहरायेगा!,’ नानासाहेबांनी घोषणा केल्यानंतर सभा संपली. सायंकाळी मोटाभाईंनी आपला मुंबई दौरा आटोपता घेतला.

‘गणेशोत्सवाच्या काळात मुंबईत येणे हा अद्भुत अनुभव आहे,’ ही मा. मोटाभाईंची प्रतिक्रिया किती बोलकी आहे, हे आम्हाला कळले. मनोमन हात जोडत म्हणालो, ‘बाप्पा, वाचीव!’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com