ढिंग टांग : सब घोडे बारा टक्के!

तबेल्यात सर्व शांतता होती. खरारा करुन, चंदीचारा आटोपून सईस निघून गेले होते.
Dhing Tang
Dhing TangSakal
Summary

तबेल्यात सर्व शांतता होती. खरारा करुन, चंदीचारा आटोपून सईस निघून गेले होते.

तबेल्यात सर्व शांतता होती. खरारा करुन, चंदीचारा आटोपून सईस निघून गेले होते. नुकताच खरारा झाल्याने तुकतुकीत दिसणारा एक तरुण घोडा, बगलेतल्या ठाणात साडेतीन पायावर उभ्या असलेल्या वयस्कर घोड्याला म्हणाला, ‘‘दादासाहेब, बऱ्याच दिवसांत कवळा हरभरा नाही भेटला. काढा की वळख मालकाकडं!’

‘हरभरा हिवाळ्यात लेका, आत्ता कुठं?, काय शीजनबिजन असतोय का नाही?,’ वयस्कर घोड्याने कंटाळून उत्तर दिले. तबेल्याच्या बाहेरच कुरण होते, आणि कुरणाला कुंपण घातले होते. रोज सकाळी कुणीएक मास्तरासारखा दिसणारा इसम घोड्यांना बाहेर काढून गोल गोल घुमवत असे. असे गोल गोल फिरुन नेमके काय होते, हे कुठल्याही घोड्याला कधी कळले नाही. बाबू नावाचा एक ‘महालक्ष्मी रेसकोर्स रिटर्न’ घोडा होता. तो म्हणायचा, ‘‘रेसमध्ये गोल गोल थोडीच धावतात? या घोडेमास्तराची कंपलेट केली पाहिजे.’’

हा तबेला फार फेमस होता. पण इथे फक्त रेसचे घोडे नव्हते, विविध क्षेत्रातले नावाजलेले घोडे इथे ठाणबंद होते. उदाहरणार्थ, ‘खुनी खंजर’ या गाजलेल्या चित्रपटात इमारतीच्या तेविसाव्या मजल्यावरुन शेजारच्या बेचाळीस मजली इमारतीच्या सोळाव्या मजल्यावर उडी मारणारा सुपरस्टार ‘सिकंदर’ घोडा याच तबेल्यातला. ‘धर्मयुद्ध’ चित्रपटात गाजलेली सिनेतारका ‘मेनका’ घोडी इथलीच. काही घोडे माथेरानहून आल्यामुळे ‘इधर भोत गरम होरेलाय भाई’ असे सारखे म्हणत पंख्याखाली उभे राहात. काही घोडे स्वत:ला शहाणे समजत. त्यातला एकजण तर अटकेपार जाऊन आलेल्या एका घोड्याचं रक्त आपल्या धमन्यांमध्ये दौडतंय, अशी फुशारकी मारत असे. त्याला पुण्याला पाठवण्याची खटपट तबेल्याचा मालक करत होता.

एक घोडा स्वत:ला बुद्धिबळाचा चँपियन समजत असे. विश्वनाथन आनंद माझ्यामुळेच वर्ल्ड चँपियन झाला असे त्याचे म्हणणे. ऐन वेळी मी अडीच घरं पुढे जायला अडून बसलो असतो तर विश्वनाथ आनंदला भविष्यात एकही जाहिरात मिळाली नसती, असे तो सांगायचा.

‘हल्ली पाहातॉय, चंदीचाऱ्यात वाढ झालेली दिसते! मालक खुश झालाय का?’ एक वयस्कर घोडा म्हणाला.

‘हंऽऽ...बऱ्याच दिवसात कवळा हरभरा नाय भेटला म्हणून सईसला सहज बोल्लो. तर तो बोल्ला की, ‘अबे घोडे, हरभरा तो हिवाळे में आता. अब्बी किदर? रुक तू हिवाळे तक...तेरेकू बराबर खिलाता मैं हरभरा!’

मघाचा तो खरारायुक्त तरुण घोडा किस्सा सांगू लागला. त्याला हरभऱ्याची फारच सय येत होती...

‘हल्ली गोल गोल फिरवत नाहीत. बाहेरसुद्धा जाऊ देत नाहीत. दयाऽऽ, कुछ तो गडबड है!’ आणखी एक बुजुर्ग घोडा म्हणाला.

‘धष्टपुष्ट करुन आपल्याला विकणार असतील मेले त्या सारंगखेड्याच्या बाजारात!,’ एक अबलख घोडी मान आणि शेपूट एकाच वेळी वेळावून म्हणाली.

‘हिते कोण मरतुकडं आहे? सगळे लेकाचे व्याह्यानं धाडल्यागत धष्टपुष्ट,’ एक गलेलठ्ठ वरातीचा घोडा तुच्छतेने म्हणाला.

‘त्याचं काय आहे, आमदारलोकांचा इलेक्शनचा टाइम आहे! इलेक्शन का टाइम बोले तो घोडेबाजार का टाइम!’ एक अनुभविक घोडा पोक्तपणे म्हणाला. ‘आजकल सबकुछ पर्सेंटेजपे चलता है’ असे तो विषण्णपणे सुस्कारा सोडत म्हणाला. सगळे गप्प झाले.

शेवटी एक तरुण घोडा उत्साहाने म्हणाला, ‘सब घोडे बारा टक्के! घोडेबाजार तर घोडेबाजार!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com