ढिंग टांग : पार्टी पार्टी!

माय डिअर फ्रेंड कॅप्टन नमो, हे पत्र तुम्हाला मिळेल तेव्हा तुमची तब्येत चांगली असेल, अशी आशा आहे. मी (आता) बरा आहे. नुकताच आजारातून उठल्याचे फीलिंग आले आहे.
Dhing Tang
Dhing TangSakal
Summary

माय डिअर फ्रेंड कॅप्टन नमो, हे पत्र तुम्हाला मिळेल तेव्हा तुमची तब्येत चांगली असेल, अशी आशा आहे. मी (आता) बरा आहे. नुकताच आजारातून उठल्याचे फीलिंग आले आहे.

फ्रॉम द डेस्क ऑफ-

मि. बोरिस जॉन्सन,

ऑ. प्राइम मिनिस्टर ऑफ ब्रिटन,

१०, डाऊनिंग स्ट्रीट, वेस्टमिन्स्टर, लंडन.

विषय : सल्ला!

माय डिअर फ्रेंड कॅप्टन नमो, हे पत्र तुम्हाला मिळेल तेव्हा तुमची तब्येत चांगली असेल, अशी आशा आहे. मी (आता) बरा आहे. नुकताच आजारातून उठल्याचे फीलिंग आले आहे. कालपरवाच माझ्यावर मोठे संकट गुदरले होते. आमच्याच पक्षातल्या काही लोकांनी बंड केले आणि माझ्यावर अविश्वास ठराव आला. कारण विचाराल तर च्याट पडाल! कोरोनाकाळात मी सगळे निर्बंध धुडकावून घरातच पार्टी केली, असा आरोप होता!! त्याचे झाले असे की, गेल्या १३ नव्हेंबरला माझ्या घरी मी काम करत होतो. माझे निवासाचे ठिकाण हेच माझे राहाते घर आहे. किंवा माझ्या राहत्या घरातच माझे हपिस आहे असे म्हणा.

तुमच्याकडेही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री घरुनच सगळी कामे करतात, तसेच हे!! त्या दिवशी आमचे एक पब्लिक रिलेशन अधिकाऱी मि. ली केन यांनी येऊन सांगितले की, ‘सर, आज माझा नोकरीचा शेवटचा दिवस. मी रिटायर होतोय!’ मी म्हटले, ‘अरे वा, मजाय. एंजॉय!’ तर ते म्हणाले की ‘सर, सेंडऑफ नाही का मिळणार?’ मला वाईट वाटले.

मी तिथल्या तिथे त्यांना सेंडऑफची पार्टी देऊन टाकली. आहे काय नि नाही काय! शेव-चिवडा, तळलेली मुगडाळ- चणाडाळ (विथ जनरस स्प्रिंकल ऑफ थिनली कट अनियन ऑन इट!! ), आणि उकडलेली अंडी (ज्याला तुमच्याकडे ‘बॉइल्डेग- नमक-मिरची ज्यादा’ असे म्हणतात, असे ऋषी सुनकने सांगितले. असो.) असा सगळा जामानिमा होता. जेवणात पालक खिचडी आणि डाल खिचडी तेवढी होती. स्वयंपाकघरात जाऊन मी पटकन तीनचार ग्लास (सोड्यासाठी ) आणि थोडा बर्फ घेऊन आलो. ली केन यांना निरोप दिला. ‘घरी पोचल्यावर फोन करु नको, मेसेज कर. बायको वैतागते,’ असेही त्यांना बजावले. सकाळी लिंबूसरबत पिऊन (डोके थोडे दुखत होते…) पुन्हा दिवसभराच्या कामाला लागलो, आणि पार्टी झाल्याचेही विसरलो. पार्लमेंटात एका मजूरपक्षाच्या खासदाराने ‘पार्टी कशी झाली?’ असे मानभावीपणाने विचारले. तेव्हा मी ‘कसली पार्टी? छे, कुठं काय?’ असे उत्तर दिले. पण त्याचा गहजब झाला. पार्टी करुनच्या करुन वर मी पार्लमेंटात खोटे बोललो, म्हणून या लोकांनी माझ्यावर चक्क अविश्वास ठराव आणलान!! यांचा नेमका आक्षेप मी पार्टी करण्याला आहे, की खोटे बोलण्याला? हे मला शेवटपर्यंत कळले नाही. त्यांना पार्टीला बोलवले नाही, म्हणून बहुधा हा ठराव आला असावा, असा माझा दाट संशय आहे. सुदैवाने मी अविश्वास ठराव जिंकलो. पार्टी पचली, आणि खुर्ची वाचली! निव्वळ चखण्यापायी सत्ता जाता जाता वाचली. तूर्त संकट टळले असले तरी ही वेळ पुन्हा येणार नाही, याची दक्षता घ्यावी लागणार. ‘माझे वर्तन एरवी चांगले असले तरी जितके असायला हवे, तितके नाही’ असे मला माझ्या हुजूर पक्षानेही सुनावले आहे.

माझ्या विस्कटलेल्या केसांची शपथ, हल्ली मी ताकदेखील फुंकून पितो!! मनातील भावना विश्वासाने व्यक्त करावी, असे माझ्या आयुष्यात तुम्हीच आहात, म्हणून हा पत्रप्रपंच. बाकी सर्व ठीक. कळावे.

आपला. बोरिस (जॉन्सन.)

ता. क. : या कधी तरी चहा प्यायला! बो. जॉ.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com