ढिंग टांग : डब्बल ड्युटी..!

राजकारणात सुटीला स्थान नसते. राजकारणातील लोकांना अधून मधून थंड हवेच्या ठिकाणी पंचतारांकित हाटेलांमध्ये नाइलाजाने जावे लागते. ती काही सुटी नसते. किंबहुना डब्बल ड्यूटीच असते.
Dhing Tang
Dhing TangSakal
Summary

राजकारणात सुटीला स्थान नसते. राजकारणातील लोकांना अधून मधून थंड हवेच्या ठिकाणी पंचतारांकित हाटेलांमध्ये नाइलाजाने जावे लागते. ती काही सुटी नसते. किंबहुना डब्बल ड्यूटीच असते.

माणसे इतक्या सुट्या कां घेतात, हेच आम्हाला कळत नाही. जनसेवेच्या क्षेत्रात वावरताना माणसाने सुटी घेणे गैर आहे. सुट्या टाकून माणसे जातात तरी कुठे, याचे आम्हाला कोडे पडते. माणसाने कसे सतत कार्यरत असले पाहिजे. उदाहरणार्थ, गेली अनेक वर्षे आम्ही एकही सुटी घेतलेली नाही. हाफ डेदेखील कधी टाकला नाही. हाफ डे हे तर थोतांड आहे, असे आमचे स्पष्ट मत आहे. सुटीचे सोडा, उलटपक्षी रोज आम्ही डब्बल ड्युटी करत आहो!

राजकारणात सुटीला स्थान नसते. राजकारणातील लोकांना अधून मधून थंड हवेच्या ठिकाणी पंचतारांकित हाटेलांमध्ये नाइलाजाने जावे लागते. ती काही सुटी नसते. किंबहुना डब्बल ड्यूटीच असते. काही महिन्यांपूर्वी आम्ही आमच्या साथीदारांसमवेत महाराष्ट्राच्या हितासाठी गुवाहाटीला जाऊन राहिलो होतो. तेथील झाडी, डोंगर, आणि हॉटेल अतिशय निसर्गरम्य होते, पण आम्हाला त्याची काय मातब्बरी? महाराष्ट्राचे कल्याण हेच आमचे ध्येय! त्याच दौऱ्यात आम्ही सुरत आणि गोव्यालाही पंचतारांकित हॉटेलात केवळ महाराष्ट्राचे भले चिंतत राहिलो. लोकांना वाटेल, आमची मजा चालली आहे. पण छे, जनसेवेचे हे व्रत आम्ही अंधतेने घेतलेले नाही.

बाकीचे सामान्य लोक सिंगल ड्युटी करत उपजीविका करत असतात, आम्हाला डब्बल ड्युटी करावी लागते. अधूनमधून आम्ही सिंगल ड्युटी करतो. पहाटे झोपणे, सकाळी उठून डिनर, आणि मग कामाला लागणे, दुपारी ब्रेकफास्ट, रात्री लंच असा सर्वसाधारण दिनक्रम असतो. तुम्ही म्हणाल, दुपारी कधी कुणी ब्रेकफास्ट करते का? न्याहारी तर सकाळच्या पारी केली जाते. पण आमचे तसे नाही. सर्वसामान्य लोक जेव्हा गाढ झोपी जातात, तेव्हा आम्ही जनतेची कामे करत असतो. सर्वसामान्य लोक जेव्हा सकाळी उठून कामाला जातात, तेव्हा आम्ही बिछान्याला पाठ टेकवतो. जनसेवेचे कंकण हाती बांधले की असे होणारच. ही झाली सिंगल ड्यूटी.

…पण कधी कधी या दिनक्रमाचा कंटाळा येतो. मग आम्ही सरळ डब्बल ड्युटीचा अर्ज टाकून दोन दिवस गावी जातो. हक्काची रजा असते, तशीच ही हक्काची डब्बल ड्युटी असते. तशी नैमित्तिक ड्युटी आम्ही कधीच घेत नाही, आणि आजारपणाची ड्युटी तर कधीच घेत नाही. काही काही लोक उगाचच घरी बसून उंटावरुन शेळ्या हाकण्याचा कार्यक्रम करतात. आमच्या ओळखीचे एक गृहस्थ अडीच वर्षे घरात बसून राहिले! तेही डब्बल ड्युटी न करता, आणि सुटीचा अर्जही न टाकता!! अशा माणसाची सुट्टी ‘विदाऊट पे’ केली पाहिजे, असा आमचा आग्रह होता. (ते आमचे पूर्वीचे बॉस होते, पण- ) वरिष्ठांनी तो मानला, आणि त्यांना थेट पदमुक्त करुन आम्हाला प्रमोशन दिले. तेव्हापासून आम्ही ड्युटीवर आहोत, ते आजतागायत.

डब्बल ड्युटीवर असताना आम्ही सतत महाराष्ट्राचा विचार करत असतो. आत्ताही आम्ही डब्बल ड्युटीवर असून आमच्या गावी शेताच्या बांधाजवळ आमराईत निवांत बसून आहो! महाराष्ट्राचे भले कसे होईल, याचा विचार करत आहो. आरामखुर्चीत बसल्या बसल्या आम्ही फोनवर आदेश देऊन मुंबईतील पासष्ट फायली एका झटक्यात क्लिअर करुन टाकल्या. माझ्या मेजावर एकही पेंडिंग फाइल दिसता कामा नये, असे सक्त आदेश आम्ही कार्यालयीन कर्मचाऱ्यांना दिले आहेत. ते आता फायली आणतच नाहीत!! असो.

एकीकडे अहर्निश महाराष्ट्राचा विचार करायचा, आणि दुसरीकडे दिल्लीच्या महाशक्तिमान वरिष्ठांचे फोन चटदिशी घ्यायचा, हीच ती डब्बल ड्युटी आहे. आता तुम्हीच सांगा, इथे सुट्टीचा प्रश्न आलाच कुठे?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com