
ढिंग टांग : आप की खातिर...!
स्थळ : मातोश्री हाइट्स. वेळ : जेवणाची.
‘मातोश्री’तील दिवाणखान्यात चार-पाच मंडळी बसली आहेत. सर्वांचे चेहरे दुर्मुखलेले आहेत, कारण ते सगळेच आम आदमी आहेत. त्यांचे नेते स्वामी अरविंद केजरीवाल आहेत, सोबत पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, संजय सिंह, राघव चढ्ढा प्रभृती बसले आहेत. पुढल्या सोफ्यावर स्वत: यजमान माननीय उधोजीसाहेब! जळत्या मशालीचे तेज त्यांच्या मुखावरुन सांडत आहे, पण मनात नाना शंका आहेत. अब आगे...
उधोजीसाहेब : (काहीतरी बोलायचे म्हणून...) कधी आलात?
आम आदमी नंबर वन ऊर्फ केजरीवाल : (चेहऱ्यावर अवकाळीची अजीजी आणून) काल रात्री आलो जी! (बाकीचे आम आदमी क्लू घेऊन लागलीच चेहरा टाकतात.) मुंबईत केवढा ट्राफिक! छे!!
उधोजीसाहेब : (हादरुन) गेल्या वेळेसारखं ऑटोरिक्षानं फिरलात की काय!!
भगवंत मानसाहेब ऊर्फ आम आदमी नंबर २ : (पंजाबी ढंगात) ना शिकवा ना गिला, कर दे ओला, कर दे ओला!! वांहू वांहू!! (त्यांना केजरीवाल चिमटा घेऊन गप्प बसवतात.)
केजरीवाल : (चेहरा पाडून) माझ्यासारख्या गरीब आम आदमीसाठी मुंबईचे रिक्षावालेही थांबत नाहीत!
उधोजीसाहेब : (पुन्हा काहीतरी बोलायचेच म्हणून...) बरं, बरं! पण प्रवासात त्रास नाही ना झाला?
केजरीवाल : (चेहरा विदीर्ण करत) खूप त्रास झाला जी! दिल्लीहून निघालो, थेट कोलकात्याला गेलो! कोलकात्यात ममतादिदींनी एकेक संदेश मिठाईचा तुकडा हातावर ठेवला आणि म्हणाल्या, ‘चाय खाबे?’ आता चाय कसा खाणार? मग निघालो तसेच मुंबईला रिकाम्यापोटी!!
उधोजीसाहेब : (खमकेपणाने) मग इथं आमच्याकडे जेवूनच आला असाल!! (बाकीचे आम आदमी घाबरुन एकमेकांकडे बघतात. कारण ‘मातोश्री’वर पोटभर जेवू असे सांगून केजरीवालांनी त्यांना इथे आणले असणार!)
केजरीवाल : (विदारक आवाज लावत) पोटात अन्नाचा कण नाही, साहेब! काय सांगू तुम्हाला? त्या मोदीजींनी अक्षरश: फरपट चालवली आहे, या देशातल्या आम आदमीची!!
उधोजीसाहेब : (रागारागाने) जुलूम करणाऱ्यापेक्षा जुलूम सहन करणारा खरा अपराधी असतो! आमच्या महाराष्ट्रात आम्ही त्यांची डाळ शिजू देणार नाही!!
केजरीवाल : (हरभऱ्याच्या डाळीच्या झाडावर चढवत) तुस्सी ग्रेट हो, साहेब! आमच्यावर अन्याय झाला आहे! आमचे अधिकार मोदीजींनी काढून घेतले आहेत! तुम्ही साथ दिलीत तर आम्ही त्यांचा पाडाव करु शकू! द्याल ना साथ?
राघव चढ्ढा ऊर्फ आम आदमी नंबर ३ : (चष्म्याची ब्रँडेड फ्रेम दाखवत) परवाच परिणिती म्हणत होती की तुम्ही स्वभावानं फार चांगले आहात म्हणून! (इथे उधोजीसाहेबांच्या मनात शंका : ही कोण परिणिती?)
केजरीवाल : (खुलासा करत) परिणिती यांच्या वाग्दत्त वधू आहेत! त्या मुंबईत राहतात!
उधोजीसाहेब : (आपलं उगाचच...) अरे वा! काय करतात वैनी? (खरे तर त्यांना कसलीच टोटल लागलेली नाही. पण असं सगळेच यजमान वागतात नाही का?)
राघव चढ्ढा ऊर्फ आ. आ. नं. ३ : सिनेमात असतात त्या!
केजरीवाल : (घाईघाईने) आम्हाला नंतर सिल्वर ओकला जायचं आहे, म्हणून-
उधोजीसाहेब : (पटकन उठत) होक्का? वा! मग निघाच आता, उशीर नको! मीदेखील हल्ली तिथं वेळेवर जातो ! (‘हल्ली’ची जागा हलली असे वाटून ओशाळतात.)
केजरीवाल : (चिवटपणाने) हो, हो! जेवून निघूच! क्यूं साथीयों? (बाकीचे आम आदमी (मान आणि माना) डोलावतात. चिडीचूप शांतता पसरते.)