ढिंग टांग : राजकारण गेलं चुलीत...!

ती ग्रीष्मातली एक संध्याकाळ होती. रणरणती उन्हे नुकतीच कलंडली होती. शिवाजी पार्काडाच्या कडेला दिमाखाने उभ्या असलेल्या ‘शिवतीर्था’वर नेहमीचीच वर्दळ होती.
Dhing Tang
Dhing TangSakal

ती ग्रीष्मातली एक संध्याकाळ होती. रणरणती उन्हे नुकतीच कलंडली होती. शिवाजी पार्काडाच्या कडेला दिमाखाने उभ्या असलेल्या ‘शिवतीर्था’वर नेहमीचीच वर्दळ होती. गडाच्या बालेकिल्ल्यात खुद्द राजे ‘आता काय क्रावे ब्रे?’ ऐसा सवाल स्वत:लाच करोन वारंवार संभ्रमात पडत होते. काय क्रावे? आयपीएलची अंतिम लढत बघावी, तो तेथ पर्जन्याने गोंधळ घालुनु विचका करुनु ठेविलेला! राजेसाहेबांनी मुदपाकखान्याचा अदमास घेतला. तेथेही मामला थंडच होता. मग त्यांस याद आली! अरे, आज तो सोमवार...शिवराक! पिठलेभात खावयास कवण येतो? राजियांचा जीव चडफडला. काय क्रावे? काय क्रावे? काय ब्रे क्रावे?

तेवढ्यात तळमजल्यावरोन सांगावा घेवोन एक दूत आला. विनम्रपणे मुजरा घालोन म्हणाला, ‘‘साहेबांचा विजय असो! कमळवाल्यांच्या गोटातून फडणवीसनानांचा निरोप आला आहे. त्यांस अराजकीय गप्पा मारण्याच्या करेक्ट कार्यक्रमास आपल्याकडे यावयाचे आहे...उदईक भेटीची वेळ मागतात!’’

राजियांना नवल वाटले. यात काही काळेबेरे तर नाही ना? ऐसे वाटोन त्यांनी स्वत:स पुनश्च विचारले, ‘काय क्रावे ब्रे?’

‘उदईक येणार, ते आजच या! जेवत असाल तर आंचवायास येथेच या, ऐसा उलटा निरोप धाडा!’’ काहीएक विचार करोन राजेसाहेबांनी आज्ञापिले. दूत तांतडीने निघोन गेला...

रात्री दहाचे सुमारास एक हुडी घातलेला तरुण ‘शिवतीर्था’वर प्रकट जाहला. हुडी म्हंजे शिरस्त्राण असलेला परदेशी बनावटीचा सदरा! हुडीमुळे त्यांस कोणी वळखले नाही. तो तरणाबांड युवक ताडताड पावले टाकीत थेट राजेसाहेबांच्या दिवाणखान्यातच प्रविष्ट जाहला.

‘कोणॅय रे?’’ राजेसाहेबांनी नेहमीच्या आपुलकीच्या सुरात चौकशी केली.

तरुणाने हुडी दूर केली. पाहतात तो आपले नानासाहेब!

‘माझीच वाट पाहात होता ना? राजकारण गेलं चुलीत! अराजकीय गप्पा मारायला आलो आहे,’’ ऐसपैस मांडी ठोकत नानासाहेब दिलखुलास नागपुरी शैलीत म्हणाले. आल्या आल्या त्यांनी टीव्ही लावायला लावला. ‘‘आयपीएलची फायनल पाहून नाही ऱ्हायले का तुम्ही?’’ असेही वर विचारले.

...बरेच दिवस अराजकीय गप्पा मारायला भेटू असे दोघांचे ठरले होते. कुठे भेटू? हे मात्र ठरले नव्हते. अराजकीय म्हंजे नेमके काय बोलायचे, हेदेखील ठरले नव्हते. गाणीबिणी, सिनेमाबिनेमा, गॉसिपबिसिप याबद्दल गप्पा होणार, हे तर स्वाभाविकच होते. पण आयपीएलची फायनल हा चांगला मुहूर्त होता. वास्तविक ही भेट रविवारी होणार होती, पण पावसाने फायनल हुकवल्याने एक दिवस उशीरा ही अराजकीय भेट झाली...

‘आमच्या विदर्भातले क्रिकेटपटू फार आहेत बरं, यंदा आयपीएलमध्ये! हाँऽऽ...,’’ नानासाहेब अघळपघळपणाने म्हणाले. त्यांनी मुदपाकखान्याकडे हळूच नजर टाकली. मामला थंड होता, हे बघून ते थोडे खचले!

‘आमची मुंबई ही क्रिकेटचं पाळणाघर आहे! हे पलिकडे मैदान दिसतंय नं, तिथं क्रिकेटचं बाळकडू मिळतं,’’ राजेसाहेबांची अस्मिता नाही म्हटले तरी दुखावली होती. पण आता अराजकीय गप्पा मारताना असे होणारच! काय क्रावे?

‘मी तं नागपूरला भरपूर क्रिकेट खेळायचो!’’ नानासाहेबांनी बॅटिंग केल्याची ॲक्शन केली.

‘जेवून आलाच असाल?,’’ घड्याळाकडे बघत राजेसाहेबांनी तद्दन अराजकीय प्रश्न विचारला.

‘तसं झालंय दोनदा...पण हलकं काहीतरी...तुम्ही जेवाल तेच होऽऽ...आम्ही नागपूरकर फार फ्लेक्सिबल असतो,’’ नानासाहेबांनी समजूतदारपणे सगळ्याला अराजकीय तयारी दर्शवली.

‘मी साडेसातलाच जेवून घेतो हल्ली!,’’ राजियांनी अतिसावध पवित्रा घेतला. आता याला निमराजकीय म्हणता आले असते!

तासाभरानंतर अराजकीय गप्पांची बैठक संपली. नानासाहेबांनी पुन्हा हुडी डोक्यावर चढवली, आणि ते निघाले. निघता निघता म्हणाले, ‘‘मी पुन्हा येईन!’’ तेवढे मात्र अराजकीय नव्हते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com