ढिंग टांग - मखर शब्दांचे!

रिध्दिसिध्दिच्या प्राणपते शुंडप्रहारक उदर विदारक
ganesh
ganeshsakal

ढिंग टांग - मखर शब्दांचे!

हे गजवदना, उन्मिल नयना,

गणनायक तू बुध्दिमते

सिंदुरचर्चित भक्तिसमर्पित

रिध्दिसिध्दिच्या प्राणपते

शुंडप्रहारक उदर विदारक

शूर्पकर्ण तू उग्र कधी

तू प्रतिपालक भवभयहारक

वरदविनायक दयानिधी

किरीट लखलख कुंडल लोलक

सुवर्णलंकृत मूर्त तुझी

तेजोमय तू, ज्योतिर्मय तू,

ॐकाराची रेघ तुझी

दंड चतुर्भुज पाशांकुशध्वज

आशीर्वचना हात उभा

कटि पितांबर गौरांगावर

दर्शनमात्रे स्तब्ध सभा

गौरीतनया विद्याविनया

बृहस्पतीचे तेज उणे

मूषक वाहन करी अवगाहन

काय लावितां विशेषणें

तू आरंभी, तू प्रारंभी

लयीत तू, अन विलयीही

दाता-धाता तू निर्माता

या हृदयी, त्या हृदयीही

अंग सुकोमल लोचन उत्पल

पायी नूपुर रुणझुणती

ताल मृदंगे नर्तन रंगे

ललित मनोहर दृश्य अती

कंद कलांचा गंध फुलांचा

तुझिया ठायी तत्त्व वसे

दुर्वांकुरी तू, सर्वांतरी तू

तुजठायी अस्तित्त्व असे

तूच बीज, अन पर्णावली तू,

वृक्ष तूचि, तू चराचरीं

आदिचेतना तूचि गणेशा

तूच क्षणिं, अन निरंतरी

तव चरणांच्या स्पर्शासाठी

येरझार हा असे सुरु

तुझ्या मंडपी लक्ष दिवे अन

चंद्र-सूर्य, वा शुक-गुरु

योग विलोमी, वा अनलोमी

प्राणायामी जाणवते

तुझेच असणे रक्तप्रवाही

धमन्यांमधुनी वाहवते

तू ऋतुचक्री शिशिर बहर वा

वर्षा किंवा ग्रीष्मऋतु

तूच हिमालय, करुणा सागर,

भवतालाचे केंद्रच तू

जे जे उन्नत, उदात्त उत्तम

ते ते तुझिया ठायी वसे

तमोगुणांच्या पंकी शोधितो

शुभंकराचे आम्हि ठसे

तू अणुगर्भी तू तृणदर्भी

तूच अंश आकार खरा

सृजनाचे क्षणि भक्ताचे मनीं

शब्दपुष्प स्वीकार करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com