ढिंग टांग : कर्नाटकचं क्रेडिट..!

karnataka assembly election result 2023 congress winning credit
karnataka assembly election result 2023 congress winning creditsakal

बेटा : (नेहमीच्या उत्साहात एण्ट्री घेत) ढॅणटढॅऽऽणम!! मम्मा, आयॅम बॅकम! नमस्कारा..!

मम्मामॅडम : (अत्यंत खुशीत) वेलकम!

बेटा : (मजेमजेत) ...आज काय स्पेशल?

मम्मामॅडम : (हर्षभराने) कर्नाटकातील विजयाखातर आज पुरणपिझ्झा…आय मीन पुरणपोळीचा बेत आहे! वेल डन, बेटा!!

बेटा : (सवयीने) हा इव्हीएमचा विजय आहे!!

मम्मामॅडम : (गडबडीने) आता तो इव्हीएमचा विषय काढू नकोस बाबा!!

बेटा : (उमदेपणाने) माय हार्टिएस्ट काँग्रॅच्युलेशन्स टु यु अँड युअर पार्टी, मॅडम!! आय ऑलसो काँग्रेच्युलेट द पीपल ऑफ कर्नाटका, अँड माय दिदी!

मम्मामॅडम : (टप्पल मारत ) हे यश तुझं आणि तुझ्या ‘भारत जोडो’ यात्रेचं आहे! तुझंही अभिनंदन!

बेटा : (निरिच्छपणे ) वेल, मी एक सिंपल कार्यकर्ता आहे! साधा खासदारसुद्धा नाही! नफरत की बाजार में मुहब्बत की दुकान चालवणारा एक साधा दुकानदार आहे! कर्नाटकातही मी आता प्रेमाच्या दुकानाची नवी शाखा उघडली आहे!!

मम्मामॅडम : (कौतुकानं) अच्छा? काय मिळतं तुमच्या दुकानात?

बेटा : (मेनूकार्ड वाचल्यागत ) वेल, ही सबवे, मॅकसारखी, दुकानसाखळी आहे! आम्ही प्रेमाची पुरणपोळी, प्रेमाचा म्हैसूरपाक, प्रेमाचा बेळगावी कुंदा, प्रेमाचा बिसीबेळे भात…असं बरंच काही विकतो!! एकदा ट्राय करुन बघा!

मम्मामॅडम : (समाधानानं) तुमचं प्रेमाचं दुकान भरपूर चालो, आणि देशभर त्याच्या शाखा निघोत, हेच आशीर्वाद! (डोळे मिटून) आज खूप वर्षांनी किती बरं वाटतंय, म्हणून सांगू? गेली कितीतरी युगं सारखा पराभव, पराभव, पराभव!! पण कर्नाटकनं आपल्याला हात दिला!!

बेटा : (खांदे उडवत) निवडणुकीतल्या जय-पराजयापेक्षा प्रेम महत्त्वाचं!

मम्मामॅडम : (विजयानंदात ) आपल्या कार्यकर्त्यांनी देशभर फटाके फोडले! कर्नाटकात जिंकलो, म्हणून महाराष्ट्रात दिवाळी साजरी झाली! मि. ठाकरेंनी फोन करुन अभिनंदन केलं, म्हणाले, ‘‘कुणी सोबत येवो न येवो, आपण दोघं मिळून देशातली हुकूमशाही संपवून टाकू!’’

बेटा : (स्थितप्रज्ञतेनं) कर्नाटकातल्या विजयाचं श्रेय तुम्ही लोक माझ्या भारत जोडो यात्रेला देता, ठीक आहे! ज्या मतदारसंघातून आमची ‘भारत जोडो यात्रा’ गेली, तिथे तिथे विजय झाला, हेही खरंच! पण माझा हेतू मतं मिळवणं हा नव्हता, प्रेम वाटणं हा होता!

मम्मामॅडम : (रागारागाने) त्या कमळवाल्यांचं नाक कापलं गेलं, याचा आनंद अधिक झालाय मला!

बेटा : (तत्वज्ञाच्या पवित्र्यात) त्यांनी उघड्या जीपमधून मोठमोठाले रोड शो केले! मी पायी हिंडलो! त्यांनी नफरत वाटली, मी प्रेम वाटलं! त्यांनी द्वेष केला, मी भाईचारा! कर्नाटकची जनता प्रेमाची भुकेली आहे!! मी प्रेम दिलं…

मम्मामॅडम : (गंभीरपणाने) सगळं प्रेम कर्नाटकात वाटून टाकलं नाहीस ना?

बेटा : डोण्ट वरी मम्मा! मैं हूं ना..कर्नाटक तो झाँकी है, पूरा देश

अभी बाकी है…!

मम्मामॅडम : (स्वत:ला चिमटा काढत) माझा विश्वासच बसत नाहीए…खरंच आपण जिंकलो का?

बेटा : अफकोर्स मम्मा! हा विजय माझ्या भारत जोडो यात्रेमुळे झाला, असं तूच म्हणालीस ना? पक्षासाठी मी आणखी हजारो मैल चालायला तयार आहे!

मम्मामॅडम : थोडं क्रेडिट मल्लिकार्जुन खर्गेजींनाही द्यायला हवं!

बेटा : (कपाळाला आठ्या…) ते कुठे इतकं चालले? हॅ:!!

मम्मामॅडम : ते ठीक आहे, पण पक्षाध्यक्ष बदलल्यावरच आपला विजय झाला, हे विसरु नकोस! तू चालत रहा, चालत रहा, चालत रहा!!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com