ढिंग टांग - कोकणातलो वाघ! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

pune

ढिंग टांग - कोकणातलो वाघ!

स्थळ : दक्षिण कोकणातले निबीड अरण्य. वेळ : दुपारची.

मिसेस वाघ : (मिशा फेंदारुन शेपटी सारखी करत) अहो, ऐक्लं का?

मि. वाघ : (पंजावर मुस्कट ठेवून पेंगत) न्यम न्यम न्यम न्यम...हंऽऽ...!

मिसेस वाघ : (फणकारुन) किती मेलं ते घोरत पडायचं! दुपार टळली, अजून यांच्या झोपा होतायत! शी:!!

मि. वाघ : (डोळे मिटल्या मिटल्या)...मी जागा आहे! नुसताच डोळे मिटून पडलोय!

मिसेस वाघ : (हट्ट करत) अहो, आणा ना एखादं सांबर मारुन! खूप दिवस झाले...

मि. वाघ : (आश्वासन देत) दसऱ्यानंतर बघू!

मिसेस वाघ : (मान वेळावत) आपल्या सह्याद्रीच्या खोऱ्यात आठ वाघ आहेत, असं ती अमकी सांगत होती! ती हो, कॉलरवाली! स्वत:ला फार शहाणी समजते!!

मि. वाघ : (बेसावधपणे) गोव्याच्या म्हादईच्या जंगलातून आलीये ती होय? अगं, चांदनी म्हणतात तिला!!

मिसेस वाघ : (संशयानं) तुम्हाला बरी म्हाईत?

मि. वाघ : (कंप्लीट सावध होत) व्हाटसअपवर वाचलं असेल कुठंतरी! एरवी आपल्याला काय कळतंय त्यातलं?

मिसेस वाघ : (अभिमानानं) हंऽऽ...कळतात मला तुमची ही थेरं! गेले काही दिवस बघतेय, रात्री कुठं कुठं हिंडत असता!!

मि. वाघ : (अजीजीनं) आता या वयात कुठं जाऊ? तरुणपणी थेट मध्यप्रदेशात जाऊन आलो होतो!!

मिसेस वाघ : (जळकूपणाने) तिथं आता आठ चित्ते आणून ठेवलेत, तुमच्या त्या मोदीजींनी!! वाघांचे लाड पुरे झाले म्हणे!

मि. वाघ : (गंभीर चेहरा करत) बरं का मंडळी, मध्यप्रदेशात आठ चित्ते आल्याची बातमी, आणि पाठोपाठ कोकण-कोल्हापुरातही आठ वाघ आढळल्याची बातमी...मला तरी हा योगायोग वाटत नाही! इसमे कुछ तो पॉलिटिक्स लगता है!!

मिसेस वाघ : (बजावून सांगत) सरकारी सर्किट हाऊसपर्यंत जाऊन टीव्हीवरच्या बातम्या बघणं बंद करा पाहू!!

मि. वाघ : (पंजाची मूठ हापटत) आत्ता कळला डाव...! आठ चित्ते विरुध्द आठ मराठी वाघ!! अशी आहे ही लढत!!

मिसेस वाघ : (उडवून लावत) काहीतरीच तुमचं! कसलं आलंय पॉलिटिक्स? कोल्हापूर-कोकणातल्या जंगलात आठ वाघांचे फोटो मिळालेत, फोटो!

मि. वाघ : (नकारार्थी मान हलवत) ते आठ वाघ नाहीत, एकाच वाघाचे आठ फोटो निघालेत!!

मिसेस वाघ : (तावातावाने) कशावरुन?

मि. वाघ : (खोल आवाजात) तो कोकणातला वाघ मीच आहे! रात्री हिंडताना कॅमेऱ्या ट्रॅपसमोरुन आठवेळा चालत गेलो मुद्दाम!

मिसेस वाघ : (च्याटंच्याट पडत) अय्या!!

मि. वाघ : (इकडे तिकडे बघत) कोणाला सांगू नकोस! नाही तर पचकशील कुठे तरी!! सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाला आपलीही मदत व्हावी म्हणून दिले थोडे फोटो!!

मिसेस वाघ : (हेटाळणी करत) डोंबलं तुमचं! तुम्ही कसले वाघ? ‘आवशीक खाऽऽव...’ म्हणून नुसती डरकाळी मारता येते तुम्हाला! मघापास्नं सांगतेय, सांबर आणा, सांबर आणा! एक नाही नि दोन नाही! फू:!!

मि. वाघ : (कंटाळून) सांबर कशाला हवं? चटणीसोबतही इडली बरी लागते!!

मिसेस वाघ : (समाधानानं) कोणीही कितीही संपवण्याचा प्रयत्न केला, आणि कित्तीही परदेशी चित्ते आणून ठेवले तरी महाराष्ट्रातले वाघ संपत नसतात...खरं की नाही?

मि. वाघ : (पुन्हा डोळे मिटत) करेक्ट! जय महाराष्ट्र!