ढिंग टांग - सॉलिल्लाडा सरदाराऽऽ...! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ढिंग टांग

ढिंग टांग - सॉलिल्लाडा सरदाराऽऽ...!

स्थळ : १०, राजाजी पथ, न्यू डेल्ही. वेळ : सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवण्याची.

मल्लिकार्जुनण्णा : (घाबरत फोन उचलत) नमस्कारा! चेन्नगिथियाऽऽ...?

महामॅडम : (दुसऱ्या टोकाला) हार्टिएस्ट काँग्रॅच्युलेशन्स! आपका हार्दिक अभिनंदन...!

मल्लिकार्जुनण्णा : (जीभ चावत) अय्यो! मॅडमजी...थँक्यू! तुमारा फोन आयगा, आईसा सोचा नै जी! मैं तुमारे पास आशीर्वाद के लिए आने का इसलिए तयारी करता!! अब्बी गाडी निकालने को बोलता, इतने में तुमारा फोन आया, मॅडमजी! थँक्यू! यह उपलब्धी आपही की कृपा से प्राप्त हुई है! बहुत बहुत धन्यवाद!

महामॅडम : (शांतपणे) उपलब्धी? हं...तुम्ही मराठीतच बोला!

मल्लिकार्जुनण्णा: (भोळसटपणाने) का वो? माझं मराठी येक थोडं कच्चं आहे हो!

महामॅडम : (स्तुती करत) तुम्हाला खूप भाषा येतात! तुम्ही नावाप्रमाणे अजिंक्यवीर आहात! कर्नाटकात ‘सॉलिल्लाडा सरदारा’ म्हणतात तुम्हाला!! ते काय उगाच?

मल्लिकार्जुनण्णा: (अतिनम्रतेने) तुमची कृपा!

महामॅडम : बाय द वे, ‘सॉलिल्लाडा सरदारा’ म्हंजे काय हो?

मल्लिकार्जुनण्णा : (संकोचाने) अय्यो! तुम्ही ते मनावर घिऊ नका वो! ते येक थोडं जुनंगिनं पिक्चर होतं बघा, सुप्परहिट्ट आमच्या कर्नाटकाऽऽत! ‘सॉलिल्लाडा सरदारा’ नावाचं! त्याच्यागुणी पडलं आमचं नाव! काय तरी उगाच कार्यकर्त्यांचा हुंबपणा!!

महामॅडम : (शांतपणे) राहुलजींनी तुम्हाला शुभेच्छा दिल्या आहेत!

मल्लिकार्जुनण्णा: (अति लवून) त्यांना येक थोडं थँक्यू सांगा की वो! बरं, मी तुम्हाला भेटायला कधी येऊ?

महामॅडम : (ताडकन) कधीही येऊ नका!

मल्लिकार्जुनण्णा: (बोबडी वळत) क...क...अय्यो, काय झालं वो! आमचं काय गल्ली चुकलं काऽऽय! चुकलं-गिकलं असंल तर मायेनं पोटाऽऽत घ्या म्हणतो मी!!

महामॅडम : (प्रसन्नपणे) असं कसं? आता तुम्ही आमचे नेते आहात! आमचे बॉस- सॉलिल्लाडा सरदारा!! आम्ही तुम्हाला भेटायला यायचं! मीच येते तुमच्या घरी! ‘१०, राजाजी मार्ग’ हाच पत्ता आहे ना?

मल्लिकार्जुनण्णा : त...त...तुम्ही येणार? खरंच म्हणताय? अरे, बापरे! नको, नको, कशाला एवढी तसदी घेता? येक थोडं थांबा थितंच, मी येतोय की बेगा बेगानं!!

महामॅडम : (शांतपणे) राहुलजीही भारत जोडो यात्रेनंतर तुमच्या घरी चालत येणार आहेत!!

मल्लिकार्जुनण्णा : (मटकन बसत) त्यांचं फोन आलं होतं, म्हणाले की, ‘आता तुम्हीच आमचं बॉस! मी फुडं काय करायचं, ते तुम्ही सांगायचं दोडप्पा!!’...घाम फुटलं वो मला! दोडप्पा म्हटलं की वो मला ते! इमोशनल झालं बघा मला! हायकमांडच असं बोलायलं तर कसं करायचं म्हणतो मीऽऽ...!

महामॅडम : तुमच्या रुपाने आपल्या पक्षाला नवा अध्यक्ष मिळाला! आता पुढल्या निवडणुकीत विजय मिळवून दाखवा!! त्या कमळवाल्यांचा चांगला नक्षा उतरवा!! (बर्फाळ थंड सुरात) जे मला जमलं नाही, राहुलजींना जमलं नाही, ते तुम्ही करुन दाखवा!! ‘ईद में बचेंगे तो मुहर्रम में नाचेंगे’ हा डायलॉग तुम्हीच मारला होता ना?

मल्लिकार्जुनण्णा : (हतबल आवाजात) अवो, मी कसलं वो अध्यक्ष? मी कार्यकर्ता की हो साधं!! तुमच्याच आशीर्वादानं येक थोडं इलेक्शनला उभारलो वो! तुमचं हायकमांड आहे, म्हणून चाललं आहे की सगळंऽ...

महामॅडम : (निर्विकारपणाने) हेच तुमच्या कायमचं लक्षात राहावं, म्हणूनच येतेय तुमच्याकडे! ओके?