
ढिंग टांग - आमचे महाप्लानिंग…!
आजची तिथी : श्रीशके १९४४ माघ कृ. षष्ठी.
आजचा वार : संडेवार!
आजचा सुविचार :
‘कितिं मौज दिसें ही पहा तरी, हे विमान फिरतें अधांतरी!’
- कविता, बालभारती.
………
नमो नम: नमो नम: नमो नम: नमो नम: (१०८ वेळा लिहिणे…रोज!) अतिशय स्फुरण चढले आहे. हल्ली मला वारंवार असे होते. अचानक बाहुमध्ये बळ एकवटते. छातीवरचे पटबंद तटतटा तुटतात, आणि हाहा म्हणता छप्पन्न इंचाची मर्यादा सुटते. गेले सात-आठ महिने असेच होत आहे. काल नाशकात अगदी अस्सेच झाले!! बोलता बोलता माझे स्वप्न विस्तारत गेले…उंच उंच आभाळाला गवसण्या घालू लागले…
..ते स्वाभाविकच होते. कारण आगामी निवडणुकांमध्ये काय होणार, हे मला अगदी स्वच्छ दिसते आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत तर जवळ जवळ सगळेच वॉर्ड आपल्याकडे येणार, ही काळ्या फत्तरावरची रेघ आहे. तशी रणनीतीच आहे आमची! यंदा मुंबईकरांचे ग्रहण सुटणार आणि विकासाचा समुद्र आणि अरबी समुद्र यांचे चौपाटीवर मनोमीलन होणार!!
राज्यातले सध्याचे खुद्दारांचे सरकार अजून दोनेक वर्षे टिकेल, आणि नंतर पुन्हा निवडूनही येईल, यात शंका ती काय? राहता राहिल्या लोकसभेच्या निवडणुका. त्या पुढल्या वर्षी होणार आहेत. ‘लोकसभेचे टेन्शन घेऊ नका, मी आहे’ असे खुद्द पूज्य नमोजींनीच मला सांगितले आहे. मी निर्धास्त आहे. त्यांचे पाठबळ असेल तर काय अशक्य आहे?
काल-परवा नाशकात आमच्या प्रदेश कार्यकारिणीची बैठक होती. त्या सभेत बोलताना मी आगामी सार्वत्रिक निवडणुकांचे हे निकाल घडाघडा वाचून दाखवले.-आकडेवारीसकट! लोकसभेत ४८ पैकी ४५ आणि विधानसभेत २८८ पैकी २०० इतक्या जागा मी (पक्षी : आमचा पक्ष) मिळवणार, असे मी सांगून टाकले, ते ऐकून अनेकांचे भान हरपले. आमचे विनोदवीर तावडेजी, चंदुदादा कोल्हापूरकर, गिरीशभौ महाजन सगळे च्याटंच्याट पडलेले! प्रदेशाध्यक्ष मा. बावनकुळेसाहेबांनी तर कांदे आणायला एका कार्यकर्त्याला भद्रकाली मार्केटात पिटाळले.
‘‘एकदम द..द…द…दोनशे?,’’ बावनकुळेसाहेब म्हणाले. त्यांचा मुळीच विश्वास बसत नव्हता.
‘‘मिनिमम दोनशे!,’’ मी थंडपणाने म्हणालो. दोनशेबिनशे आकड्याने मी आजकाल बिचकत नाही.
‘‘छे, हे जरा जास्तच होतंय…नाही का?’’ बावनकुळेसाहेब म्हणाले. त्यांच्या नेतृत्त्वाखाली पक्ष एवढ्या भराऱ्या घेतोय, हे चित्र डोळ्यासमोर आणून ते (एकीकडे) गालातल्या गालात हसतदेखील होते.
‘‘ सोप्पं आहे हो! असं बघा, मागल्या निवडणुकीत आपण १६१ मिळवल्या होत्या की नाही? आता त्यात ३९ आमदारांची भर पडेल ना!,’’ मी म्हणालो. मागल्या खेपेला आमचे १०५ निष्ठावान आमदार होते. गद्दारगटाने जेमतेम ५६ जागा मिळवल्या होत्या. त्या सगळ्याच्या सगळ्या मिळवूच, पण त्यात ३९ची भर घालू, असे आश्वासन आमचे परममित्र कर्मवीर लोकनाथसाहेबांनी दिले आहे. बात खतम!
एकंदर २८८ पैकी दोनशे जागा जिंकून बाकीच्या ८८ जागा महाविकास आघाडी वगैरे लहानसान प्रादेशिक पक्षांना सोडून द्यायच्या, नाहीतर लोकशाही टिकणार कशी? लोकसभेतच्या निवडणुकीत खरं तर महाराष्ट्रातल्या ४८च्या ४८ सीटा आरामात जिंकता येतील, पण दोन-तीन विरोधकांसाठी सोडलेल्या बऱ्या! लोकशाहीसाठी एवढा त्याग तरी करायलाच हवा. नाही म्हटले तरी विरोधी पक्ष ही लोकशाहीची शान असते…अशी आमची एकंदर रणनीती आहे.
‘‘खरंच असं होईल?’’ बावनकुळेसाहेबांनी अधीरतेने विचारले.
‘‘आत्ता मी पंकजाताईंसोबत एका गाडीतून आलो! त्यांनाही माझं भाकित मान्य आहे! चमत्कार घडतात!,’’ मी युक्तिवाद केला. उपस्थितांचे समाधान झाले. कार्यकर्त्याने आणलेल्या कांद्यांची भजी तळून खाल्ली. फर्मास झाली होती.