ढिंग टांग : थुंकू किंवा मरु…!

तंबाकूचा बार भरला की काही काळाने आम्हाला असे हजारेक दोहे सहजी सुचतात.
Spitting essential metabolic activity Due to acid bile or indigestion person sometimes has to spit up to five times
Spitting essential metabolic activity Due to acid bile or indigestion person sometimes has to spit up to five timessakal

नेता खडा चौराहे पर, बिना चबाए पान,

रस थूंके जो इत्रतत्र, फीका गालिप्रदान!

उपरोक्त दोहा आमच्याच प्रतिभाशाली मस्तिष्कात पैदा झाला आहे. तंबाकूचा बार भरला की काही काळाने आम्हाला असे हजारेक दोहे सहजी सुचतात.सांप्रतकाळी महाराष्ट्रात सर्वत्र थुथु:कार ऐकू येत असल्याने आमच्याही काव्यरुपी पानात प्रतिभेचा चुना जास्त लागला. सबब, हे असे दोहे सुचू लागले आहेत.

थूंके थूंके जाय दिन, थूंके थूंके रात

जो न थूके घुस्सा, उसकी लग जायेगी वाट!

…घुस्सा हा जांभळाच्या बीसारखा थुंकावाच लागतो. त्याला काही इलाज नाही. घुस्सा थुंकला नाही तर तो हिंसेला जन्म देतो. हिंसेमुळे समाजाचे नुकसान होते. म्हणून माणसाने हमेशा थुंकले पाहिजे. ती काही वाईट सवय नव्हे. तरीही सार्वजनिक ठिकाणी या क्रियेला मनाई करण्यात आली आहे, ही दुर्दैवाची बाब आहे. ही शुद्ध मुस्कटदाबी आहे, असे आमचे स्वच्छ मत आहे. ‘कृपया येथे थुंकू नये‘ ही पाटी बघितली की आमच्या तोंडाची नुसती आगाग होते.

थुंकणे ही क्रिया चयापचयाच्या दृष्टीने अत्यावश्यक असते. आम्लपित्त अथवा अपचनामुळे माणसाला कधीकधी पचापच थुंकावे लागते. जेवण झाल्यावर दाताच्या फटीत मेथीच्या भाजीतली काडी आली तर ती थुंकल्याखेरीज चालत नाही. बोलताना दाताखाली जीभ आल्यामुळेही तसे घडू शकते. आम्हाला तर ‘बराच वेळ झाला, थुंकलो नाही’ अशा भावनेनेही थुंकावेसे वाटते. तर काही अभागी लोकांना थुंकताच येत नाही.

थुंकण्याजोगी नावे उच्चारली तरी हे लोक तोंडात गुळणी धरल्यागत नुसतेच ‘न्यमन्यमन्यम’ असा आवाज करीत टाळूला जीभ घासत बसतात. हे थोडेसे तंबाकूसारखेच (कधीही न सुटणारे) चिवट व्यसन आहे. थुंकविज्ञान ही एक ज्ञानशाखा असून आम्ही या शास्त्रात बरेच पुढे गेलो आहो, हे येथे नम्रपणे नमूद करायला हवे. किंबहुना थुंकशास्त्रावर आपल्या अभ्यासपूर्ण विवेचनाची पिंक टाकण्यासाठीच आम्ही आज लेखणी उचलली आहे…

थुंकणे या क्रियेतला मूळ धातू थुंक हाच ध्वनिवाचक आहे, हे कोणीही न थुंकता सांगेल. ‘थुत तुझी…’ किंवा ‘अरे थू तुझ्या जिनगानीवर!’ असे आपण एखाद्यास संतापून म्हणतो, तेव्हा प्रत्यक्षात थुंकणेच अभिप्रेत असते. एखाद्याला घोळात घेऊन कार्यभाग साधण्याला आधुनिक मराठी भाषेत (मिळेल हो लौकरच अभिजात दर्जा!) थुकपट्टी लावणे असे म्हणतात.

जगात सर्वच प्राणी कमीअधिक प्रमाणात थुंकतात. आफ्रिकेत विषाच्या चुळा टाकणारा एक नाग आढळतो, त्यास स्पिटिंग कोब्रा असे म्हणतात. तंबाकूचा बार भरुन पहिल्या मजल्यावरुन गटार ओलांडून विक्रमी पिंक टाकणाऱ्या बहाद्दराला लाजवील अशी त्याची विषफेक असते, असे म्हणतात. आम्ही हा कोब्रा अजून पाहिलेला नाही, पण भारतातही तो असणार! विशेषत: मुंबईतील भांडुप परिसरात त्याचा संचार आढळतो, असे बोलले जाते. एका समर्थाघरच्या श्वानाने आमच्यावर हा थुंकप्रयोग इतक्यांदा केला की आम्ही घरी परतून दोरीवरला टॉवेल ओढून न्हाणीघर गाठले!! असो.

परवाच्या दिवशी एका थुकपट्टीच्या विश्वप्रवक्त्याने भर पत्रकार परिषदेत गद्दारांचे नाव ऐकताच थुथु:कार केला. सदरील पत्रकारास कुठून प्रश्न विचारला असे झाले! (नंतर पाणी मागवून त्याने क्यामेऱ्याची लेन्स, बूम-माइक आणि स्वत:चे मुख प्रक्षाळून घेतले, असे मागाहून कळले!)

यापुढील काळात पत्रकार परिषदांमध्ये पिकदाण्या फिरवाव्यात, अशी आमची सूचना आहे. थुकपट्टीचे विश्वप्रवक्ते यापुढे पत्रपरिषदेत मास्क वापरतील, तर मराठी पत्रकारिता आणि राजकीय संस्कृतीचे संरक्षण होईल, असे वाटते. अन्यथा महाराष्ट्राची छीथू होईल! बघा बुवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com