esakal | समुद्रतळ गाठणारा विक्रमवीर!
sakal

बोलून बातमी शोधा

jayvant chavhan

समुद्रतळ गाठणारा विक्रमवीर!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

- जयवंत चव्हाण

व्हर्जिन ग्रुपचे संस्थापक रिचर्ड ब्रॅन्सन आणि अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांनी नुकतीच अवकाशाला गवसणी घातली. अंतराळ पर्यटनासारखा महागडा प्रवास जगातील या सर्वात श्रीमंत उद्योजकांनी केला आणि तो करता येऊ शकतो, हे त्यानिमित्ताने सिद्धही झाले. पण काही महिन्यांपूर्वी तिकडे पश्चिम प्रशांत महासागरात आणखी एका उद्योजकाने समुद्राच्या तळाशी जाण्याचा विक्रम केला आहे. दुबईतील एक ब्रिटिश उद्योजक हमीश हार्डिंग यांनी मरियाना ट्रेंच हा जगातील सर्वात खोल समुद्रतळ गाठला आहे. त्यामुळेच त्यांच्याही कामगिरीची दखल घेतली पाहिजे. हमीश हार्डिंग यांचा हवाई क्षेत्रात विविध सेवा पुरविण्याचा व्यवसाय आहे. अॅक्शन एव्हिएशन ही त्यांची कंपनी आंतरराष्ट्रीय पातळीवर विमान व्यवहार करते. या व्यवसायाचा त्यांना अजून विस्तार करायचा आहे. केंब्रिज विद्यापीठातून त्यांनी रसायनशास्त्रात इंजिनियरिंग केले आहे.

तिथेच त्यांनी एका माहिती तंत्रज्ञान कंपनीत काम सुरू केले. या कंपनीत त्यांनी विभागीय व्यवस्थापकीय संचालक म्हणून मध्य पूर्वेत आणि नंतर भारतातही काम केले. त्यांनी पायलट म्हणून नोकरीही केली. तेव्हा सर्वाधिक वेगाचे विक्रम नोंदविले आहेत. शिवाय ब्रिटिश सैन्यातही आठ वर्षे काम केले आहे. लहानपणापासून त्यांना स्कुबा डायव्हिंग, स्काय डायव्हिंग, स्नो स्किईंग अशा खेळांमध्ये रस होता. त्यामुळेच त्यांना जगातील सर्वात खोल अशा मरियाना ट्रेंचने खुणावले असावे. मरियाना ट्रेंच हे सुमारे ११ हजार मीटर खोल समुद्रात आहे. म्हणजे एव्हरेस्टही यात बुडून जाईल. या तळाचा शोध घेण्याचा अनेकांनी प्रयत्न केला. १९६० मध्ये अमेरिकी नौदलाने प्रयत्न केला होता. त्यानंतर ‘टायटॅनिक’चे दिग्दर्शक जेम्स कॅमेरून यांनी २०१२ मध्ये हा अनुभव घेतला. मात्र हार्डिंग यांनी सर्वात जास्त अंतर म्हणजे ४.६ किलोमीटर आणि सर्वात जास्त वेळ म्हणजे चार तास १५ मिनिटे समुद्रतळाशी घालवली आहेत.

‘चॅलेंजर डीप’ या मोहीमेत त्यांच्यासोबत निवृत्त नौदल अधिकारी आणि सागर अभ्यासक व्हिक्टर वेस्कोवो हेही होते. समुद्रतळाशी पाण्याचा दबाव खूपच असतो. त्यामुळे हार्डिंग यांच्या पाणबुडीला सुमारे आठ हजार डबलडेकर बसने जेवढा धक्का देता येईल तेवढा धक्का दिला गेला. पण तळाशी गाळापर्यंत गेल्यावर एक अद्भुत दुनिया त्यांना दिसली. तिथेही काही जीव सापडले, तेही त्यांनी संशोधनासाठी आणले आहेत. पण ही मोहीम जेवढी कठीण तेवढीच धोकादायकही होती. समुद्रात कोणतेही संवाद माध्यम काम करीत नाही. तरीही सोनर मेसेजवर ते संदेश पाठवत होते. पण त्याच्याही मर्यादा आहेत. शिवाय काही अपघात झाला तर कोणतीही मदत तिथे मिळू शकणार नव्हती. अशी अत्यंत कठीण मोहीम हार्डिंग यांनी सफल केली.

हार्डिंग यांनी अनेक विक्रम केलेले आहेत. गिनेस वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये त्यांचे नाव आधीच नोंदले गेले आहे. २०१६ मध्ये त्यांनी सर्वात वृद्ध आणि सर्वात तरुण यांना घेऊन दक्षिण ध्रुव गाठला होता. तेव्हा बझ अल्ड्रिन हे ८६ वर्षांचे, तर त्यांचा मुलगा गिल्स हा १२ वर्षांचा होता. ही खूपच कठीण कामगिरी त्यांनी पार पाडली. तेव्हा बझ यांना त्रास झाला, मात्र ते सुखरूप होते. २०१९ मध्ये त्यांनी जेट विमानातून उत्तर ते दक्षिण ध्रुव अशी प्रदक्षिणा केली होती. त्यामुळे हार्डिंग यांना विक्रमाचे एक प्रकारे वेडच आहे. केवळ पैसा आहे म्हणून ते करतात, असेही म्हणता येत नाही. कारण शेवटी काहीतरी नवे करण्याची ऊर्मीही असावी लागते. हार्डिंग यांच्याकडे ती भरभरून आहे. आता ते ४९ वर्षांचे आहेत. त्यांना मुलासह जगातील सर्वोच्च पर्वत किलीमांजारो सर करायचा आहे आणि त्यानंतर उत्तर ध्रुवाची मोहीम फत्ते करायची आहे. जसजसे वय सरते तशा आकांक्षा कमी होत जातात, पण हमीश हार्डिंग मात्र वेगळेच रसायन आहे.

loading image