दूरदृष्टी ठेवा...चष्मा घाला... 

सलील उरुणकर
मंगळवार, 1 नोव्हेंबर 2016

काही संशोधनांनुसार चष्म्याचा निगेटिव्ह नंबर असलेल्या व्यक्तींचा बुध्यांक इतरांपेक्षा जास्त असतो, असे निष्कर्ष काढले गेले आहेत. पण याच हुशार मुलांनी चष्मा घातला नाही तर ते स्वतः आणि समाजसुद्धा मागे पडेल. त्यांच्या बुद्धिमत्तेचा उपयोग समाजाला होणारच नाही. 
 

काही संशोधनांनुसार चष्म्याचा निगेटिव्ह नंबर असलेल्या व्यक्तींचा बुध्यांक इतरांपेक्षा जास्त असतो, असे निष्कर्ष काढले गेले आहेत. पण याच हुशार मुलांनी चष्मा घातला नाही तर ते स्वतः आणि समाजसुद्धा मागे पडेल. त्यांच्या बुद्धिमत्तेचा उपयोग समाजाला होणारच नाही. 
 

चष्मा आहे पण मित्र चिडवतात म्हणून तो वापरायचा नाही किंवा तशाच इतर कारणांमुळे वापरत नाही अशा शालेय विद्यार्थ्यांचे प्रमाण जवळपास 75 टक्के आहे. ही धक्कादायक बाब उघडकीस आली ती सामाजिक संस्थांमार्फत होणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांच्या नेत्रतपासणी शिबिरांमधून. चष्मा न घालण्याच्या या प्रवृत्तीमुळे शालेय विद्यार्थ्यांचे शैक्षणिक आणि सामाजिक नुकसान होत आहे. त्यामुळे समाजालाच बौद्धिक चष्म्याची गरज निर्माण झाली आहे, अशी खंत शहरातील नेत्रतज्ज्ञांनी व्यक्त केली. 

पौगंडावस्थेत डोळ्यांसह शारीरिक वाढीत झपाट्याने बदल होत असतात. बाल्य अवस्थेतून प्रौढावस्थेकडे जातानाचा हा महत्त्वाचा टप्पा असतो. त्यामुळे या वयातील मुले व मुली स्वतःबद्दल थोडे अधिक संवेदनशील झालेले असतात. आपण कसे दिसतो, आपल्याला चष्मा घातल्यावर कोणी चिडवेल का, असे अनेक प्रश्‍न त्यांच्या मनात घोळत असतात. आपल्या अन्य मित्र-मैत्रिणींना आपणच एकेकाळी चिडवले होते ते क्षण त्यांना आठवतात. अशी मुले मग चष्मा घरी 'विसरण्यास' किंवा तो खराब करण्यास सुरवात करतात, जेणेकरून त्यांना तो घालावा लागणार नाही. अनेकदा आपल्याला चष्मा लागला आहे हे मुला-मुलींसह त्यांचे पालकही नाकारत राहतात. पण चष्मा न घातल्यामुळे दीर्घकालीन दुष्परिणामांचे गांभीर्य त्यांना नसते. जगातला पहिला चष्मा इटलीत 1286 मध्ये तयार झाला होता. त्याकाळी चष्म्याचा वापर वयाच्या चाळिशीनंतर वाचता यावे एवढ्यासाठी होत होता. इतर प्रकारच्या नंबरने डोळ्याला कमी दिसू शकते हे ज्ञान त्यावेळी नव्हते. 

शिक्षक, पालकांची जबाबदारी 
चष्मा घालायचा नाही म्हणून अनेकदा मुले मुद्दाम खोटी कारणे देतात. त्यामुळे तपासणीसाठी डोळ्यांच्या दवाखान्यात येताना पालकांच्या मनातही तशीच भावना असते. अभ्यास टाळण्यासाठीच मुलांकडून ही कारणे सांगितली जात आहेत, असा पालकांचा ठाम समज असतो. पण खरं म्हणजे लसीकरण, पौष्टिक आहारासाठी पालक जेवढे आग्रही असतात तेवढेच डोळ्याच्या तपासणीसाठी त्यांनी आग्रही राहिले पाहिजे. शाळेतील शिक्षक यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. वेळोवेळी आणि मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांच्या डोळ्यांची तपासणी शालेय पातळीवर व्हायला हवी 

चष्मा न घातल्याचे धोके 
चष्मा न घातल्यामुळे डोळ्यावर ताण येतो. वाचण्यासाठी अधिक कष्ट घ्यावे लागतात. त्यामुळे डोके दुखण्याचे प्रमाणही वाढते. सायकल किंवा गाडीवरून जाताना दृष्टीदोषामुळे अपघात होण्याची दाट शक्‍यता असते. तसेच अभ्यास करताना कमी दिसत असल्यामुळे दडपणही येऊ शकते. वर्गातील अभ्यासक्रमात मागे पडणे, अन्य उपक्रमांतील सहभाग कमी होणे, फळ्यावर काय लिहिले आहे किंवा पुस्तकातील वाचताना अडचण येणे, खेळताना जवळचे, लांबच्या वस्तू दिसल्या नाहीत तर व्यवस्थित खेळूही शकणार नाही अशी परिस्थिती उदभवू शकते. त्यामुळे आपली कामगिरी खालावून अपेक्षित निकाल मिळत नाहीत. 'लेझी आय' किंवा 'क्रॉस्ड आय' असे आजार असलेल्या मुला-मुलींची नजर कायमस्वरूपी खराब होऊ शकते. 
मेडिलेसर कॅटरॅक्‍ट अँड लेसर सेंटरचे संचालक डॉ. संजय सावरकर म्हणाले, की ज्ञानाच्या कक्षा खूप रुंदावल्या आहेत. एखाद्या विषयात पारंगत होण्यासाठी आयुष्यही कमी पडते. आयुष्यभर नव्या वाचनाची आणि त्यातून सुधारणा करण्याची गरज असते. नाहीतर आपण व्यक्ती किंवा समाज म्हणून मागे पडण्याची भीती आहे. ज्यांना चष्म्याचा नंबर आहे ते चष्म्यामुळे शिकू व वाचू शकतात. आपल्या मेंदूला चालना मिळते. अभ्यासात आणि कामात सुधारणा होते. आपल्या शैक्षणिक आणि सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने मोठे नुकसान टाळण्यासाठी चष्मा घातला पाहिजेच. ज्या वयात आपल्याला स्वतःच्या क्षमतेची, गुणांची ओळख व्हावयास हवी त्याच वयात मुला-मुलींना नाउमेदीचा अनुभव येण्यास सुरवात होते. सलग दोन किंवा तीन शैक्षणिक वर्ष अपयश आले तर या मुलांचा स्वतःबद्दल गैरसमज होऊ शकतो. त्यांच्या बौद्धिक, शैक्षणिक, शारीरिक प्रगतीला खिळ बसू शकते. 

चिडवणाऱ्या मित्र-मैत्रिणींना काय सांगाल 

 • चष्मा घालण्यामागचे कारण समजावून सांगा. 
 • महात्मा गांधी, बाबासाहेब आंबेडकर, बिल गेट्‌स अशा असंख्य मोठ्या व्यक्ती चष्मा घालत. 
 • दुसऱ्या व्यक्तीच्या व्यंगाला हसणे हेसुद्धा मानसिक व्यंगच आहे. 

उपाय 

 • चष्मा लागल्यावर कुटुंबातील इतर व्यक्तींनी बाऊ करू नये. 
 • घरात, शेजारी, शाळेत चर्चा होऊ देऊ नका. 
 • कुटुंबीयांनी उगीच कीव करू नये. त्यामुळे न्यूनगंड निर्माण होतो. 
 • चष्मा घालण्याविषयी मुलांना आठवण करून द्यावी. 
 • 'रिलॅक्‍स स्माईल'सारखी वैद्यकीय शस्त्रक्रिया करून नंबर घालवावा. 

महत्त्वाचे मुद्दे 

 • इयत्ता पाचवी ते आठवीतील मुले-मुली चष्मा घालण्यास टाळाटाळ करतात. 
 • कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्ती, पालकांमधील गैरसमजांमुळे हे घडते. 
 • चष्मा न घातल्यामुळे होणाऱ्या मानसिक, शारीरिक आणि सामाजिक दुष्परिणामांविषयी मुलांसह पालक आणि अन्य कुटुंबीयांना गांभीर्य नसते. 
 • चष्मा असलेल्या मुलांना न चिडविण्याबाबतचे शिक्षण चष्मा नसलेल्या मुलांच्या पालकांनी त्यांच्या पाल्यांना द्यावे. 
 • चष्मा असलेल्या मुलांनी वर्गात असताना चष्मा घालावा, यासाठी शिक्षकांनी पुढाकार घ्यावा आणि वर्गातील अन्य मुलांनाही याबाबत शिस्त लावावी.
Web Title: Save your eyes, wear spectacles, writes Salil Urunkar